प्रासंगिक – फटाके फोडताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. प्रीतीश भावसार, प्लॅस्टिक व कॉस्मेटिक सर्जन

 दिवाळी हा बालवृंदासाठी आनंद घेऊन येणारा सण आहे. फराळ, नवीन कपडे, रोषणाई आणि विशेषतः फटाके हे दिवाळीचे मुख्य आकर्षण असते. परंतु या आनंदावर फटाक्याने होणाऱ्या इजांचे सावट येऊ शकते. फटाके वाजवताना काळजी घेणे गरजेचे आहे. मोठय़ांनी फटाके वाजवताना लहानांबरोबर असावे. 

फटाके हातात फोडू नये. पेटता फटका कुणाच्या अंगावर फेकू नये. जे फटाके पेटून फुटत नाहीत त्यांच्या जवळ जाऊ नये किंवा हाताने उचलू नये. त्यावर एकतर पाणी किंवा वाळू टाकून विझवावे. उडवलेले फुलबाजे पाण्याने किंवा वाळूने भरलेल्या बादलीत टाकावेत. परंतु काळजी घेऊनही कधी अपघात टाळता येत नाहीत. असे झाल्यास योग्य प्रथमोपचार करणे आवश्यक आहेत. योग्य प्रथमोपचार न मिळाल्यास दुखापत अधिक गंभीर होऊन बरे होण्यास विलंब लागू शकतो. फटाक्यांमुळे डोळे, त्वचा, हात आणि केस या अवयवांना गंभीर इजा होऊ शकते. 

डोळा हा महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. फटाके उडून डोळ्याला जखम होऊ शकते. फटाक्यातील रसायन जितके जास्त वेळ डोळ्यात राहील तितके जास्त नुकसान होते. असे झाल्यास डोळे अजिबात चोळू नयेत. त्यामुळे डोळ्याला अधिक इजा होते, डोळे ताबडतोब दहा मिनिटे पाण्याने धुवावेत. डोळे धुतल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे फटाक्याने त्वचा जळल्यास आग कमी होईपर्यंत जखमेवर भरपूर पाणी ओतावे. जखमेवर लेप, टूथपेस्ट, शाई किंवा कुठल्याही झाडाची पाने लावू नयेत. त्यामुळे जखम किती खोल आणि गंभीर आहे हे ठरवता येत नाही. जळल्यानंतर अंगावरील दागिने जसे अंगठी, बांगडय़ा, कडे, पैंजण लागलीच काढून टाकावेत. जळालेल्या अवयवास सूज येऊन हे दागिने काढणे कठीण जाते. हे न काढलेले दागिने अवयवास रक्तपुरवठा मिळण्यास अडथळा निर्माण करतात.