हवा का रुख…!

154

>> शैलेश माळोदे

प्रा. रवींद्रनाथ. त्यांना वाऱयाची दिशा समजते. त्याचबरोबर ऊर्जानिर्मितीतत त्यांचे कार्य खूपच मोलाचे आहे.

जुलै महिना युरोपमधील सर्वात उष्ण महिना ठरल्याचे आपण जाणतोच. गेल्या काही दिवसांत हिंदुस्थानमधील बहुतांश राज्यांत पुराचे थैमान सुरू आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ वगळता विशेषतः दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ दिसून येतोय. या सर्व घटना म्हणजे हवामान बदलाचे वास्तव असून याबाबत आपण करत असलेले प्रयत्न पुरेसे नाहीत. पॅरीस कराराप्रमाणे सरासरी तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअस राखावी लागणार असली तरी हिंदुस्थानने ही तापमानवाढ लवकरच प्रत्यक्षात येण्याइतपत पातळी गाठली असावी, असे मत इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या सेंटर फॉर सस्टेनेबल स्टडीजचे प्रा. एन. एच. रवींद्रनाथ यांनी व्यक्त केलंय. संस्थेत व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून सेंटर ऑफ कॉन्टेम्पररी स्टडीजमधील माझ्या वास्तव्यात प्रा. रवींद्रनाथ यांच्याशी ओळख झाली आणि बऱयाचदा चर्चा करण्याची संधी मिळाली. पुढे दिल्लीत विविध परिषदांदरम्यान देखील काही वेळा गप्पा मारण्याचा योग झाला.

1981 पासून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये दाखल झाल्यापासून सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि 2000 पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. रवींद्रनाथ हे हवामान बदलविषयक संशोधक म्हणून जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी शाश्वत तंत्रज्ञान हे क्षेत्रातदेखील मुलगामी संशोधन केलंय. आपल्या संशोधन परिघाविषयी सांगताना प्रा. रवींद्रनाथ म्हणाले, ‘हवामान बदल, वनं, ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) आणि इकोसिस्टम सेवा या क्षेत्रात प्रामुख्याने मी काम केलंय आणि करत आहे. आतापर्यंत मी 140 पेक्षा जास्त शोधनिबंध विविध शास्त्र्ााrय शोधनियतकालिकांतून प्रकाशित केलेत. यापैकी 60 हवामान बदलांविषयी आहेत. मी हवामान बदल आणि पर्यावरणविषयक चार शोधनियतकालिकांच्या संपादक मंडळावरदेखील आहे. हवामान बदलांविषयक विकसनशील देशांमधून जाणीव जागृती निर्माण करण्याच्या कामी मी प्रमुख भूमिका बजावली असून 1990 सालापासून जेव्हा हवामान बदल हा काही महत्त्वाचा मुद्दा मानला जात नसे, तेव्हापासून हरितगृह वायूंची उत्सर्जनाच्या दृष्टीने यादी बनविण्यात मी पुढाकार घेतला. आज याच वायूंमुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांचे संकट ओढावलंय.

मनुष्यनिर्मित विकासप्रक्रिया निसर्गाच्या मुळावर आल्यामुळे आणि आपण निसर्गाचा भाग नसून त्याचे स्पर्धकच नव्हे तर मालक असल्याची माणसाची भावना आणि त्याच दृष्टिकोनातून घडलेली कृती यामुळे समस्त मानव जातीवर आता हवामान बदलाचे संकट ओढवले असून त्याचा फटका अर्थातच गरीबांना मोठय़ा प्रमाणात बसणार आहे, बसतोय, हवामान बदलविषयक चार पुस्तकांसहित नऊ पुस्तकांचे लेखन प्रा. रवींद्रनाथ यांनी केले आहे. त्यात सामाजिक वनीकरणविषयक दोन, नवीकरणीय ऊर्जेविषयी एक आणि जैवऊर्जेविषयी एक अशा पुस्तकांचाही समावेश आहे. हिंदुस्थानमध्ये अद्यापही अनेक कुटुंबांना विज उपलब्ध नाही. त्यातही पुरेशा प्रमाणात ती मिळणे दुरापास्त आहे. हे लक्षात घेता अनेकांना जैवऊर्जेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जैवभारासाठी जंगल कटाई होते त्यातून हरितगृह वायूंचे प्रमाण वाढणे, जमिनीचा ऱहास होणे यांसारख्या संकटांना आमंत्रण लाभते. प्रा. रवींद्रनाथ यांनी ग्रामीण क्षेत्रातील परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, धोरणे आणि जैवऊर्जेच्या प्रसारासाठीचे उपाय याबाबत मूलभूत संशोधन करून अनेक शोधनिबंध लिहिले आहेत.

दक्षिण हिंदुस्थानमधील दोन गावांत त्यांनी विकेंद्रित जैवऊर्जा आधारित वीजनिर्मिती प्रकल्प स्थापन केले आहेत. या ठिकाणी गावातील सर्व घरांना वीजपुरवठा करण्यासाठी गॅसीफर्स (जैवभाराधारित) उभारून वीजनिर्मिती करून प्रत्येक घराला वीजपुरवठा करण्यात येतो. ग्रामीण ऊर्जाविषयक निकड मागविण्यासाठी जैवभार आधारित ऊर्जाप्रणालीचे हे दोन मूलगामी मॉडेल्स आहेत.

प्रा. रवींद्रनाथ यांच्या गटाने केलेले अनेक अध्ययन अहवाल देशाच्या कार्बन उत्सर्जनविषयक धोरण निश्चितीसाठी केंद्रीय मंत्रालयामार्फत वापरण्यात येत आहेत. हवामान बदलाचे संकट आता केवळ परिषदांमधून चर्चा करण्यापलीकडे तर गेलेच आहे, पण त्याहीपुढे जाऊन ते आपल्यासमोर फेस-टू-फेस उभे आहे. त्यामुळे आता आपल्याला एकाचवेळी भविष्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ नये म्हणून कराव्या लागणाऱया उपायांसहित सध्याच्या अरिष्टाला तोंड देण्यासाठी तयारी आणि कृती करावी लागणार आहे. सांगली आणि कोल्हापुरातील पुराबाबत आपण कमी पडल्याचे दिसून आलेच आहे नव्हे, आपण त्यादृष्टीने तयार नसल्याचेही प्रत्ययास आलेय. हिंदुस्थानच्या हवामान बदल अभ्यासाविषयीचा एक सुज्ञ चेहरा असलेल्या प्रा. रवींद्रनाथ यांच्या कृतिशील संशोधनातून आपण उपाययोजना करण्यासाठी पावले उचलायला हवीत, हीच काळाची गरज आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या