प्रॉमिसिंग…नवी ओळख!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  गणेश आचवल

रहस्यमय मालिका पाहायला अनेकांना आवडतात आणि सध्या झी मराठीवर ‘चंद्रविलास’ ही मालिका खूप उत्कंठावर्धक ठरत आहे. या मालिकेत ‘शर्वरी’ ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे आभा बोडस… एक प्रॉमिसिंग चेहरा.

आभाचे शालेय शिक्षण डोंबिवली येथील विद्यानिकेतन शाळेत झाले. तिचे बाबा कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून आई गृहिणी आहे. तिची मोठी बहीण मृगा बोडसदेखील अभिनयाच्या क्षेत्रात आहे. घरातून दोघींनाही कायम प्रोत्साहन मिळते. आभाने सर्वप्रथम बालकलाकार म्हणून केलेली मालिकादेखील झी मराठीवरील ‘तू तिथं मी’ ही मालिका. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये तिने लहान वयातील येसूबाईंची भूमिका साकारली होती.  ‘पेइंग घोस्ट’, ‘गुरू’ या चित्रपटांत तिच्या भूमिका होत्या.

आभा सध्या जोशी बेडेकर महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत आहे. याच वर्षी जोशी बेडेकरमधील एका महत्त्वपूर्ण स्पर्धेत ‘प्रिन्सेस’ होण्याचा तिने मान मिळवला. ‘चंद्रविलास’मधील भूमिकेविषयी ती म्हणते, ‘‘चंद्रविलासमधील माझी व्यक्तिरेखा ही सोळा वर्षांच्या शर्वरीची आहे. त्यामुळे माझ्या वयाशी जुळणारी ही व्यक्तिरेखा आहे. या भूमिकेला अनेक पैलू आहेत. शर्वरी संवेदनशील आहे आणि मुख्य म्हणजे तिचे सर्वस्व तिचे बाबा आहेत. आपल्या बाबांच्या आयुष्यात पूर्वी काय घडलं होतं, हे तिला जाणून घ्यायचं आहे. जेव्हा तिला तिच्या आजोबांविषयी कळतं, तेव्हा ती एकटीच ‘चंद्रविलास’मध्ये जाण्याचा निर्णय घेते. यात तिचे धाडसदेखील आहे. ही शर्वरी सर्वांची मनं जपणारी आहे. या मालिकेमुळे अनेक मान्यवरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे यात माझ्या बाबांची भूमिका सागर देशमुख करत आहेत. त्यांना मी ऑफस्क्रीनसुद्धा ‘बाबा’ अशीच हाक मारते. त्यांच्याकडून मला खूप काही शिकता येत आहे. त्यांची आणि माझी ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील उत्तम आहे. ‘चंद्रविलास’मुळे माझ्या चेहऱ्याला एक नवीन ओळख मिळाली आहे.’’ भविष्यात अभिनय आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी होण्याचे तिचे ध्येय आहे.