प्रासंगिक – लहान मुलांमधील मनोविकार

425

>> डॉ. मिलन बाळकृष्णन

प्रौढांप्रमाणेच लहान मुलांनाही मानसिक समस्यांचा धोका असतो व त्यांनाही मनोविकारांचा सामना करावा लागू शकतो. हिंदुस्थानमध्ये सुमारे 12 टक्के मुलांना वर्तणुकीशी संबंधित समस्या तसेच मानसिक आरोग्याशी निगडित प्रश्न भेडसावत असतात. मात्र यापैकी 95 टक्के मुलांच्या या समस्यांवर सामाजिक कलंकाच्या भीतीमुळे किंवा निव्वळ मदतीच्या अभावामुळे उपचार मिळू शकत नाहीत.

आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न त्यांच्या स्वभावाचाच एक भाग असल्याचे गृहीत धरून पालक बहुतांश वेळा त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा मदत मागायला घाबरतात. त्यामुळे मनोविकाराचे निदान लांबते आणि मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच लहान मुलांना भेडसावू शकणाऱया मानसिक समस्यांविषयी पालकांनी जागरुक असणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना अधिक सुलभतेने मदत मिळू शकेल व त्यामुळे उपचारांचे अधिक चांगले परिणाम मिळू शकतील.

मुलांमधील मानसिक आरोग्याचे प्रश्न मोठय़ा विचित्र रूपात अभिव्यक्त होऊ शकतात. अलीकडेच गेमिंगचे व्यसन लागलेल्या शुभमला (नाव बदलले आहे) त्याचे पालक आमच्याकडे घेऊन आले होते. पण शुभमच्या या वागण्याचे सखोल परीक्षण केल्यानंतर आमच्या लक्षात आले की, त्याला तीव्र स्वरूपाच्या एन्क्झायटी डिसॉर्डरची समस्या होती आणि गेम्स हा त्याने भोवतीच्या जगापासून व आपल्या मनातल्या चिंतांपासून दूर जाण्यासाठी शोधलेला एक मार्ग होता. त्याच्या एन्क्झायटीवर उपचार झाले तसे त्याचे गेम खेळण्याचे वेड खूपच कमी झाले आणि गेमिंगला पळवाट म्हणून वापरण्याऐवजी प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून वापरणे त्याला जमू लागले.

लहान मुलांमधील अशा मानसिक समस्या वेळी ओळखण्याचे काम पालक आणि शिक्षकांना सर्वात चांगल्याप्रकारे जमू शकते, कारण त्याच मुलांच्या सर्वात जवळच्या व्यक्ती असतात, त्यामुळे मुलांचे वागणे धोकादायक वळणावर जात असल्याचा लाल झेंडा त्यांना सर्वात स्पष्टपणे दिसू शकतो.

धोक्याची काही लक्षणे

  • शाळेतील कामगिरी खालावणे, मार्क्स किंवा ग्रेड्समध्ये घसरण, एकाग्रता ढळणे, लक्ष न लागणे, एका जागी बसता न येणे आणि पाल्याच्या वागण्याबद्दल शाळेमधून वारंवार तक्रारी येणे हे काही महत्त्वाचे बदल आहेत.
  • लहान मुले आपल्या समस्या मोठय़ांप्रमाणे स्पष्ट बोलून दाखवू शकत नाहीत, पण त्यांच्या वर्तणुकीतून बरेचदा काहीतरी बिनसल्याचे इशारे मिळत असतात. आक्रमक होणे, शाळेमध्ये किंवा घरामध्ये रागाचा उद्रेक होणे, भांडण काढणे आणि सतत वाद घालणे अशा वागण्यातून हे इशारे मिळू शकतात. लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक चाळ्यांसारख्या धोकादायक वर्तनातही वाढ होऊ शकते.
  • एखादे मूल नेहमीसारखे इतरांमध्ये मिसळत नसेल, खूप काळासाठी एकटे एकटे राहात असेल तर ही धोक्याची सूचना मानायला हवी. दोन आठवडय़ांहून अधिक काळ असे लहरी वागणे, मुडीपणा तसाच राहिला आणि त्याचा प्रभाव शाळेत किंवा घरामध्ये दिसू लागला तर पालकांनी किंवा शिक्षकांनी हा इशारा गांभीर्याने घ्यायला हवा. मूल अचानकपणे खेळायला जाणे टाळू लागले किंवा घरातच कोंडून राहू लागले तर हीसुद्धा धोक्याची सूचना मानावी.
  • रोजची कामे करताना मुलांच्या मनाला भीतीने, निराश करणाऱया भावनांनी ग्रासले असेल व जोडीला त्यांच्या हृदयाची धडधड वाढली असेल, श्वास जलद झाला असेल तर या गोष्टींकडे काळजीपूर्वक पाहायला हवे.
  • अचानक भूक लागेनाशी होणे किंवा खूप भूक लागणे हेसुद्धा भावनिक समस्येचे लक्षण असू शकते. सतत उलटय़ा होणे किंवा लॅक्सेटिव्ह्ज घ्यावी लागणे यातून इटिंग डिसॉर्डर म्हणजे खाण्याशी संबंधित समस्येचा इशारा मिळू शकतो. बरेचदा गंभीर अवस्थेला पोहोचेपर्यंत या समस्येचे निदान होत नाही.
  • मुलांमधील निराशा आणि चिंतेची लक्षणे मोठय़ांसारखी नसतात. मुलांमध्ये ती सततची डोकेदुखी आणि पोटदुखी यांच्या रूपातही दिसू शकतात. या समस्यांमुळे मुलांचे झोपेचे आणि भुकेचे वेळापत्रकही बिघडते.
  • काही वेळा मानसिक समस्येमुळे मुले स्वतःला इजा, दुखापत करून घेतात. उदाहरणार्थ, स्वतःला भाजून घेणे, स्वतःवर वार करणे किंवा मनात आत्महत्येचे विचार घोळणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न. ज्या मुलांच्या बोलण्यात सतत मृत्यूचा विषय असतो किंवा जी मुले स्वतःला इजा करून घेतात अशा मुलांचे वागणे गांभीर्याने घ्यायला हवे आणि त्यावरील उपचारासाठी वैद्यकीय मदत घ्यायला हवी.
  • बरेचदा, तरुण मुले आपल्या प्रश्नांपासून पळवाट शोधण्याच्या नादात अमली पदार्थ किंवा दारूच्या प्रभावाखाली येऊ शकतात. यामुळे ती कोवळ्या वयातच व्यसनाधीन होऊ शकतात.
आपली प्रतिक्रिया द्या