
- वैश्विक, [email protected]
पूर्वीच्या काळी समुद्रातील प्रवाशांना खडकाळ जागांचा अंदाज येण्यासाठी लाईट हाऊस उभारलं जायचं. दिवसा नावाडय़ांना त्याची कल्पना असायची, पण रात्रीच्या वेळी धोक्याचा इशारा आणि त्याबरोबरच किनारा जवळ आल्याचं दिशादिग्दर्शनही व्हायचं. असे सिग>ल किंवा संकेत विजेचे दिवे नव्हते तेव्हापासूनच होते. मशालीसारखी जळती ज्योत आणि त्याभोवती फिरणाऱया डब्यासारख्या चक्राला असणारी छिद्रं यातून ती ज्योत क्षणात दिसते तर क्षणात अदृश्य होऊन लक्ष वेधून घ्यायची. पुढे विजेचे दिवे आले आणि लाईटहाऊस म्हणजेच दीपगृहाचं काम सोपं झालं. असं दीपगृह केवळ समुद्रातच असण्याचा काळही विमानसेवा सुरू झाल्यावर मागे पडला. आमच्या राजावाडीतून पश्चिमेला दूरवर विमानतळाच्या दिशेने असलेल्या एका मधल्या टेकडीवर असा लाल दिवा संध्याकाळपासून चमकायला लागायचा. त्याचं ‘फ्लिकर’ होणं तेव्हा गमतीचं वाटायचं. पुढे ती टेकडीच भुईसपाट झाली आणि तो दीपस्तंभही गेला.
पृथ्वीवरची ही उदाहरणं ‘आभाळमाया’त एवढय़ासाठी दिली की दूरवरचे काही तारेसुद्धा दीपगृहातील दिव्यासारखे ‘स्पंदन’ (फ्लिकर) करणारे असतात. इंग्लिशमध्ये त्यांना पल्सार आणि मराठीत स्पंदक तारे म्हणतात. कारण ते ‘पल्सेटिंग’ म्हणजे बीप-बीप पद्धतीने चमकत राहताना आढळतात.
‘क्वेसार’ ताऱयांच्या लेखात आपण जाणून घेतलं की या अतिदूरच्या ताऱयांचा शोध 1950 मध्ये रेडिओ दुर्बिणीतून विश्वाच्या टोकाचे रेडिओस्रोत ग्रहण करणं शक्य झाल्यानंतर लागला. तशी क्वेसार, पल्सारची संकल्पना त्यापूर्वीच मांडली गेली असली तरी वैज्ञानिक संकल्पनांच्या सिद्धतेला अनुभवजन्य ठोस परिमाण असावं लागतं. त्यामुळे अदृश्य प्रारणांचे स्रोत ‘पकडण्या’ची यंत्रणा तयार झाल्यानंतर एक्स-रे, गॅमा-रे खगोलशास्त्र्ााच्या अभ्यासाचं दालन विस्तारलं. आपल्याकडे नारायणगावजवळच्या खोडद् गावी असलेल्या ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ऍस्ट्रॉनॉमी’च्या परिसराला आम्ही 1993 मध्ये भेट दिली. त्यावेळी तिथे असलेल्या प्रत्येकी 45 मीटर व्यासाच्या तीस विशाल ‘डिश’ दूरच्या अवकाशातील रेडिओ स्रोत ग्रहण करण्याचं कार्य करत होत्या. अशा रेडिओ स्रोतांमध्ये मिसळलेला इतर अवकाशी गोंगाट (स्काय नॉइज) गाळून योग्य तोच स्रोत पकडणं असं त्याचं तांत्रिक स्वरूप. क्रायोजेनिक कुलिंगद्वारे अवकाशस्थ संकेत अधिक विश्लेषणासाठी कॉम्युटराइज्ड यंत्रणेकडे पाठवले जात होते आणि तिथल्या एका ‘पल्सार प्रोसेसर’वर आपण हृदयाच्या ‘ईसीजी’चा ग्राफ बघतो तसे काहीसे उमटत होते. त्यावरून नंतर फोटोसारखी प्रतिमा तयार केली जात असे. फायबर ऑप्टिक अशासाठी की, संदेशवहनातील उणीव (ट्रान्समिशन लॉस) होऊ नये म्हणून. शिवाय तिथल्या इमारतीच्या भिंतींमध्ये तांब्याची जाळी बसवली होती आणि इतर प्रारणांचे आक्रमण होऊ नये म्हणून टय़ुब लाईट, रेडिओ, ट्रान्झिस्टर रेडिओ वगैरेंना तिथे मज्जाव होता.
अशा अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने दूरस्थ स्रोतांचा अभ्यास होतो. विश्वनिर्मितीच्या आरंभीच्या काळातील हायड्रोजनचा शोध लावण्याचं उद्दिष्ट असल्याचं तत्कालीन संचालक डॉ. कपाही यांनी आम्हाला सांगितले होते. आता या संस्थेने बरीच प्रगती केली असेल.
…तर पल्सारचा किंवा स्पंदक ताऱयांचा शोध जोसेलिन बेल या ऍन्टनी हेडिश यांच्या याच विषयावर काम करणाऱया तरुण शिष्येने लावला. 1967 मध्ये जोसेलिनला प्रथमच पल्सेटिंग तारा चमकताना दिसला तो पल्सेटिंग रेडिओ स्रोताच्या स्वरूपात. न्यूट्रॉन तारे अशी नियमित स्पंदन देतात. त्यांच्या स्पंदक प्रवृत्तीचा अभ्यासकांना फायदा होतो. सूर्यमालेबाहेरचे ‘ग्रह’ शोधण्यासाठी (1983) याच तंत्राचा उपयोग झाला तो पल्सारचा शोध लागल्यामुळेच. 6 ऑगस्ट 1967 रोजी जोसेलिनने पल्सार शोधल्यावर 28 नोव्हेंबरला तिने तिचे गुरुजी ऍन्टनी हेजिश यांच्यासह, फास्ट रेकॉर्डरचा वापर करून त्या ताऱयाच्या दोन स्पंदनातील वेळेची नोंद केली. आधी हे सिग्नल परग्रहावरच्या जीवसृष्टीकडून सातत्याने येत असल्याचं त्यांना वाटलं आणि त्यांनी त्याला एच.जी. वेक्सच्या कादंबरीतील कल्पनेनुसार ‘लिट्ल ग्रीन मेन’ असं नाव दिलं. परंतु तशी काही ‘जीवसृष्टी’ वगैरे नसून तो एक स्पंदक तारा आहे याची निश्चिती झाल्यावर 1968 मध्ये ‘पल्सार’ शब्द रूढ झाला. पुढे 1974 मध्ये हेडिश आणि राइल यांना क्रांतिकारी रेडिओ दुर्बिणीच्या शोधाचा नोबेल पुरस्कार मिळाला आणि पल्सारचा शोध लावणारी जोसेलिन बेल उपेक्षित राहिली. मात्र तिने गुरुजींचा सन्मान मनमोकळेपणाने मान्य केला, हे तिचे मोठेपण!





























































