वेब न्यूज – रेलयात्रीचा डाटा लीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

सध्या ज्या वेगाने कोरोना पसरतो आहे त्याच्या दुप्पट वेगाने सायबर गुन्हे घडत आहेत असे म्हणायला हरकत नाही. कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून अनेक उद्योगधंद्यांना त्याची झळ पोहचली, अनेक उद्योग बंद पडले, लाखो लोक घरात बसून राहिले आणि याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी उद्योगांसह लोकांनाही लक्ष्य करायला जोरदार सुरुवात केली आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे आता रेलयात्रीचा डाटा लीक झाला आहे. तब्बल सात लाख लोकांची वैयक्तिक माहिती यामुळे सार्वजनिक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये तिकिट बुक करणाऱया व्यक्तीचे लोकेशन, यूपीआय आयडी, पेमेंट लॉगिन, बस बुकिंग, ई-मेल ऍड्रेस, नाव आणि कॉण्टॅक्ट नंबर आदी सर्व वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. ‘Safety Detectives’ या एका सायबर सिक्युरिटी फर्मने दिलेल्या माहितीनुसार रेलयात्रीने हा सर्व प्रवाशांचा डाटा एका अनसिक्युअर सर्व्हरवर साठवलेला होता. सायबर चोरटय़ांनी या सर्व्हरला भगदाड पाडत हा सर्व डाटा चोरला. या सर्वामागे रेलयात्रीचाच निष्काळजीपणा असल्याचा ठपका या सायबर सिक्युरिटी फर्मने ठेवला आहे. Safety Detectiने च्या रिपोर्टनुसार रेलयात्रीने हा सर्व प्रवाशांचा डाटा एका अनइक्रिप्टेड आणि पासवर्ड नसलेल्या सर्व्हरवर साठवलेला होता. तब्बल 43 जीबी इतकी या डाटाची साइज होती. या लीक झालेल्या डाटामध्ये सर्वाधिक माहिती ही हिंदुस्थानी प्रवाशांची आहे. या सर्व आरोपांनंतर आणि डाटा लीकच्या बातमीनंतर रेलयात्रीने कोणताही खुलासा दिलेला नाही. मात्र आपला सर्व्हर तातडीने बंद केला आहे. या लीक नंतरदेखील या रेलयात्रीच्या अनसिक्युअर सर्व्हरवर ‘Meow’ बॉटचा हल्ला झाला होता आणि त्या सर्व्हरवरील सर्व डाटा डिलीट झाला होता. Meow हा नवीन प्रकारचा सायबर हल्ला असून यात  Elasticsearch, Redis आणि MongoDB सारख्या अनसिक्युअर सर्व्हरला लक्ष्य केले जाते आणि त्यावरील माहिती डिलीट केली जाते.