ठसा – राजाभाऊ पोफळी

921

>>  महेश उपदेव

ग्राहक पंचायतीच्या कार्याचा विस्तार हिंदुस्थानात पोहोचविण्यात मोलाच वाटा असलेले अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे माजी राष्ट्रीय सचिव, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ पोफळी यांचे नुकतेच निधन झाले. आपल्या आक्रमक शैलीने ग्राहक चळवळीला ताकद देणारे राजाभाऊ ग्राहक चळवळीचा मानबिंदू ठरले. राजाभाऊ ग्राहकांचे कैवारी होते. ग्राहक चळवळ घराघरात पोहोचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. राजाभाऊंनी दै. ‘महाराष्ट्र’मधून पत्रकारितेस प्रारंभ केला होता. त्यानंतर त्यांनी ‘हिंदुस्थान समाचार’, ‘तरुण भारत’ दैनिकांत काम केले. आपल्या लेखणीतून कामगार चळवळ व ग्राहक चळवळ जिवंत ठेवली एवढेच नाही, तर श्रमिक पत्रकारांच्या चळवळीत ते सक्रिय होते. 1974 साली अ.भा. ग्राहक पंचायत या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण कायदेविषयक खासगी विधेयक ऍड. गोविंदराव मुंदडा यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. ग्राहक पंचायतीसाठी व ग्राहकांना जागृत करण्यासाठी अख्खा विदर्भ पिंजून काढला. अ.भा. ग्राहक पंचायत संघटनेला देशव्यापी स्वरूप दिले. ग्राहकांवर होणाऱया अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी राजाभाऊंनी 1971 च्या दरम्यान उपभोक्ता मंच उभारला. सतत आपल्या लेखणीतून त्यांनी ग्राहकांच्या हितासाठी लढा दिला व ग्राहकांच्या हिताचा कायदा पास करून घेतला. साधी राहणी आणि उच्च विचार यातूनच राजाभाऊंचे मोठेपण दिसून येत होते. 1972 साली नागपुरात उसळलेल्या धान्य दंगलीवर त्यांनी लिहिलेले ‘ही दंगल नव्हे, ग्राहक उठाव’ हे वार्तापत्र विशेष गाजले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवरही त्यांची पकड होती. कामगार नेते दत्तोपंत ठेंगडी यांच्याशी त्यांची जवळीक होती.त्यांनी कामगार चळवळीतून कामगारांच्या समस्या जगासमोर आणल्या. राजाभाऊंनी विपुल लिखाण केले. स्वा. सावरकर स्मृती पुरस्कार, बापू लेले स्मृती राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कारांनी त्यांना गौरविले होते. राजाभाऊ पोफळी यांच्या जाण्याने ग्राहक चळवळ पोरकी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या