प्रासंगिक – रक्षाबंधन : पवित्र धाग्यांनी बांधलेले ‘रक्षासूत्र’

>> बी. के. नीता (www.brahmkumaris.com)

हिंदुस्थान एक असा देश आहे की, ज्यामध्ये अनेक सण, उत्सव, जयंती. साजरे केले जातात. प्रत्येक सणापाठीमागे काही पौराणिक कथा आणि त्यांचे आध्यात्मिक कारणे आहेत. जन्माष्टमी, रामनवमी, दसरा, बुद्ध जयंती, महावीर जयंती, दीपावली. प्रत्येक सण हा कर्तृत्वाचे तसेच विजयाचे प्रतीक आहे. परंतु रक्षाबंधन हा एक असा सण आहे की, ज्याचा कोणता इतिहास नाही. तरीसुद्धा वर्षोनुवर्षे हा सण साजरा केला जातो. या सणामध्ये कोणताही आवाज नाही, धूमधडाका नाही. अत्यंत शांततेत, परंतु उत्साहाने हा सण साजरा केला जातो.

खरं तर हा पवित्र सण आहे. ज्यामध्ये धर्माचे, नात्याचे कोणतेही बंधन नाही. रजपूत घराण्याची राणी कर्णावती हिने मुगल सम्राट हुमाँयू याला राखी पाठवली आणि त्याने आपले सर्वस्व पणाला लावून तिची रक्षा केली. इंद्रायणीने इंद्राला हे रक्षासूत्र बांधले, त्यामुळे त्याची रक्षा झाली. यांचा संबंध पती-पत्नीचा होता. तसेच अभिमन्यू जेव्हा युद्धाच्या मैदानावर जात होता तेव्हा कुंतीने त्याला राखी बांधली. जेव्हा हे रक्षासूत्र तुटले तेव्हा त्याचा वध झाला. अशा अनेक कथा सांगितल्या जातात. आज बहीण भावाला राखी बांधून आठवण देते की तुला माझी रक्षा करायची आहे. पण अशी रक्षणाची आवश्यकता फक्त बहिणींनाच आहे का? आणि फक्त भाऊच रक्षा करू शकतो, कोणी दुसरा का नाही? कंस आणि देवकी यांचा संबंध भाऊ-बहिणीचा असूनही तो रक्षकाच्या ऐवजी भक्षक बनला.

कोणत्याही नात्यामध्ये व्यक्तीला बंधन आवडत नाही. पण रक्षाबंधनाची राखी बांधायला मात्र सगळे प्रेमाने तयार होतात. हिंदू धर्मामध्ये घरी ब्राह्मण येऊन यजमानांना राखी बांधून जायचे. ही राखी पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. ‘रक्षाबंधन’ला विषतोडक पर्व किंवा पुण्यप्रदायक पर्व असेही म्हटले जाते. याचा अर्थ असा की, या सणाचा संबंध पुण्यात्मा बनण्याशी आहे. राखी ही फक्त नायलॉन किंवा रेशमी धाग्यांची नाही, परंतु पवित्र संबंधांच्या धाग्यामध्ये एक दुसऱ्याला बांधणारी आहे.

या दिवशी टिळा लावणे, आरती ओवाळणे आणि तोंड गोड करणे अशा काही गोष्टी केल्या जातात. ‘तिलक’ हा आत्मस्मृतीचे प्रतीक आहे. शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे आपले ललाट. दोन भुवयांच्या मध्ये हा टिळा लावला जातो. शरीराला चालवणारी चेतना ही हायपोथॅलॅमस आणि पिटय़ुटरी ग्लॅन्ड यांच्या मध्यभागी राहते. त्यामुळे इथे तिलक लावण्याची प्रथा आहे. आत्मा अजर, अमर, अविनाशी आहे. तसेच सर्वांना समभाव आणि सन्मानाच्या दृष्टीने बघितले तर आपापसात प्रेम आणि जिव्हाळा नेहमी राहील याची जाणीव करून देणारा हा टिळा. आरती ओवाळणे हे विजयाचे प्रतीक आहे तर तोंड गोड करणे हे मधुरतेचे प्रतीक आहे. अर्थात फक्त गोड खाणे महत्त्वाचे नाही, परंतु मुखाद्वारे गोड शब्दांचा वापर करणे जरुरीचे आहे. ज्याने आपले संबंध नेहमीच सुमधुर राहावे हा त्यापाठीमागचा उद्देश आहे. या गोड संबंधांच्या जोरावर आपण वाईट वृत्तींवर विजय मिळवू शकतो. परंतु या कलयुगी दूषित वातावरणामध्ये मनोविकारांवर विजय मिळविणे थोडे कठीणच नाही का? आज संबंध कोणताही असो, परंतु सगळय़ांची ऐहिक दृष्टी वाढत चालली आहे. या दृष्टीला पवित्र बनवणारा रक्षाबंधन हा दिवस. समाजामध्ये नारीचे स्थान सन्माननीय राहिले आणि तिच्याबद्दलचा श्रेष्ठ दृष्टिकोन जर वाढत गेला तर नक्कीच खूप सकारात्मक बदल होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, आज कोणी मनुष्य कोणाची रक्षा करू शकत नाही. आपली रक्षा आपले कर्म आणि ईश्वर हेच करू शकतात. पुण्य कर्मांची पुंजी जितकी आपल्याकडे जमा असेल तितकी परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी मदत मिळते. त्याचबरोबर ईश्वराच्या नामस्मरणाने नेहमीच आपली रक्षा होते. ईश्वराची प्रेमाने, श्रद्धाभावनेने आठवण केली तर तो भक्ताचे रक्षण करण्यासाठी धावत येतो असे नेहमीच म्हटले जाते. राखीच्या धाग्यांना जसे बांधले जाते तसेच आपण या राखीबरोबर आपल्या मन-बुद्धीच्या धाग्यांना ईश्वरांबरोबर घट्ट बांधूया. विषय-विकारांना भस्म करून मनाला पवित्र करूया. कारण आपल्या दुःखाचे कारण फक्त आपली दूषित विचारधारा आहे. म्हणूनच रक्षाबंधनाच्या निमित्ताने पवित्र विचारांचा प्रवाह सदैव या मनामध्ये वाहू दे, निर्मल मनाने सर्व संबंध, कार्य श्रेष्ठ बनवण्याचा शुभ संकल्प आपण करूया.

आपली प्रतिक्रिया द्या