शब्दचित्र – कणा राखलेला लेखक!

544

>> विजय तापस

शब्द, साहित्य, चित्रकला, नाटक हा ज्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होता असे ज्येष्ठ लेखक, साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक चतुरस्र लेखक, साहित्यिकांचा आधारवड गमावला आहे.

एखाद्या इच्छेच्या परिपूर्तीच्या निमित्ताने आपल्याच जीवाचा तुकडा असलेला मुलगा किंवा मुलगी देवाला वाहण्याची किंवा देवाच्या नावाने सोडून देण्याची आपल्या लोकसंस्कृतीत पूर्वापार प्रथा आहे. अर्थात अशी देवाला वाहिलेली मुलं पुढच्या आयुष्यात देवाला किती जुमानतात ते मला माहिती नाही, पण शब्ददेवाला म्हणा, की साहित्यदेवाला म्हणा वाहिलेला (स्वतःला निष्ठापूर्वक वाहवून घेतलेला) एक माणूस मी वर्षानुवर्षं पाहात होतो. तो माणूस म्हणजे रत्नाकर मतकरी! त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शब्ददेवाच्या पायावर घातलं होतं की, मतकरींनी स्वतःच स्वतःला शब्ददेवाच्या पायांवर निष्ठापूर्वक वाहवून घेतलं होतं कुणास ठाऊक. एक मात्र अस्सल सत्य की, एखाद्या कठोर, कडव्या वारकऱयाप्रमाणे ते अखेरच्या घटकेपर्यंत शब्द-विठ्ठलाचा हात घट्टपणे धरून होते. ज्या शब्द-देवाच्या पायांवर त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं आणि ज्या देवाच्या नावाने त्यांनी आयुष्यभर साहित्य-भंडारा उधळला त्याच शब्दांच्या अनंत अवकाशात ते आता विसावले आहेत.

मतकरी काल-परवा गेले ते अत्यंत अकस्मात आणि अकल्पित. मला 1970 च्या अगोदरचे मतकरी फारसे माहिती नाहीत, पण त्यानंतरचे… अगदी कालपरवाचे मतकरी चांगले माहीत आहेत. मला हजार टक्के खात्री आहे की, त्यांनी लेखनाच्या विचाराशिवाय, कथा-कादंबरीच्या विचाराशिवाय, गूढकथेच्या एखाद्या कल्पनेशिवाय, एखाद्या पेंटिंगच्या कल्पनेशिवाय, एखाद्या पटकथेशिवाय, एखाद्या नव्या नाटकाच्या मानसिक जुळवाजुळवीशिवाय, कोणत्यातरी तालमीच्या विचाराशिवाय आणि मुख्य म्हणजे एखाद्या सामाजिक-राजकीय आंदोलनात उतरण्याच्या निश्चयाशिवाय इतक्या वर्षांत साधा एक श्वासही कधी घेतला नसेल. अष्टोप्रहर जीवनात असणं, अत्यंत सजगता बाळगत कायम लेखनात असणं हे रत्नाकर मतकरी तब्बल सत्तरेक वर्षं करू शकले यात मला आश्चर्य वाटत नाही. देवनिष्ठांना जसा मुद्दामहून देव आठवावा लागत नाही, तो जसा त्यांच्यात कायम वसतीलाच असतो, तसं मतकरींच्या बाबतीत होतं.

शब्द, साहित्य, चित्रकला, नाटक हा त्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होता. खरं तर त्या सामर्थ्यावरच ते बेताज बादशहासारखे जगले. मतकरी ज्या काळात लेखक म्हणून उदयाला आले, विकासले आणि एका मुक्कामाला पोहोचून स्थिरावले तो सगळा काळ अतिशय आव्हानात्मक होता. तो बदलांचा आणि पूर्वापारच्या सगळ्या जीवनकल्पनांच्या मोडणीचा, कालबाह्य होण्याचा काळ होता. अशा काळात ठामपणे उभं राहाणं, लिहितं राहून एक नवी दिशा शोधून काढणं, एका नव्या दृष्टीचा माग घेणं ही अजिबातच सोपी गोष्ट नाही. मतकरी या कसोटीला शंभर टक्के कसे उतरले याची साक्ष त्यांचं साहित्य सर्वांगाने देतं आहे यात कणमात्र संशय नाही. आपण एक चतुरस्र लेखक गमावला आहे, तरुण साहित्यिकांचा एक आधारवड गमावला आहे हेच आजचं निव्वळ सत्य आहे.

मला नाटक कळायला, उमजायला केव्हा लागलं ते नक्की सांगता येणार नाही. पण एक मात्र खरं की, त्याच्या खूप अगोदर माझी मतकरींच्या नाटकांशी घट्ट ओळख झाली होती. अर्थात ती सगळी होती त्यांची बालनाटकं. अगदी आजही प्रचंड चालणारी, आजही हवीहवीशी वाटणारी. अलीकडे या नाटकांचे जे प्रयोग झाले आणि त्याला आजच्या मुलांचा जो प्रतिसाद मिळाला तो पाहिल्यावर मतकरी हे ‘प्लेराईट फॉर जनरेशन्स’आहेत यावर शिक्कामोर्तब झालं. पिढय़ांना बांधून ठेवणारी कोणती जादू या नाटकांमध्ये आहे याचा आता नव्याने विचार करावा लागेल. सुधाताई करमरकर आणि रत्नाकर मतकरी ही दोन माणसं नसती तर मराठीतली बालरंगभूमी बरीचशी दुबळीच राहिली असती यात शंका नाही.

मतकरींनी ज्या उत्साहाने, जोमाने, जिद्दीने बालरंगभूमी टिकवली, जगवली आणि बहरवली त्याची किंमत या बालरंगभूमीच्या आजच्या ओसाड काळात विशेष जाणवते. त्या रंगभूमीवरही त्यांनी प्रयोगशीलता दाखवली आणि ती रंगभूमी त्यांनी अगदी शहरातल्या झोपडपट्टीपर्यंत नेली. मला मतकरींचा मोठेपणा हा वाटतो की, त्यांनी प्रौढ रंगभूमीला स्वतःच्या आयुष्यात जितकं महत्त्व दिलं, तितकंच त्यांनी बालरंगभूमीला महत्त्व दिलं.

व्यावसायिक रंगभूमीला त्यांनी अनेकानेक यशस्वी नाटकं देऊन मराठी रंगभूमीला विषयांची विविधता बहाल केली. व्यावसायिक रंगभूमीवर जसं त्यांनी दर्जेदार कार्य केलं, तसंच त्यांनी प्रायोगिक रंगभूमीवर अनेक अव्वल नाटकं, अनेक चाकोरीबाह्य प्रयोग केले. ‘आरण्यक’ आणि ‘लोककथा 78’ यांनी रंगभूमीला नवी ऊर्जा, नवी उमेद दिली. त्यांनी गिरणी कामगारांचा संप आणि त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ‘ट्रक थिएटर’ चा प्रयोग करून नाटकाच्या कक्षा विस्तारल्या.

रत्नाकर मतकरी यांच्या कथा, कादंबऱया हा मराठी साहित्यातला एक लक्षणीय ठेवा आहे. मराठीत ‘भयकथा’हा प्रकार त्यांनी ज्या सामर्थ्याने आणि ज्या संयमाने हाताळला, रुजवला आणि जोपासला त्याला खरोखरच तोड नाही. मला त्यांच्या सर्व लेखनात एक विलक्षण संयम, मानवीयता आणि मूल्यांची भक्कम बैठक दिसते. अत्यंत तीव्र सामाजिक भान असलेला, निर्भयपणे अन्यायाच्या विरोधात उभा राहाणारा, रास्त आणि तर्कशुद्ध भूमिका घेणारा हा माणूस कलावंत, नागरिक म्हणून अत्यंत खंबीरपणे जगला! या लढाऊ कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली!

रत्नाकर मतकरी यांनी लेखक म्हणून, चित्रकार म्हणून, सिनेमावाला किंवा नाटककार म्हणून एक गोष्ट अगदी प्राणपणाने केली, ती म्हणजे लेखनाचं वा कोणत्याही कामातलं गांभीर्य त्यांनी कधीही सोडलं नाही. जे जे केलं ते एक प्रकारच्या बांधिलकीच्या जाणिवेतून केलं. व्यावसायिक रंगभूमीवर मतकरी जेव्हा नाटककार म्हणून रुजू झाले आणि पुढे रुळायला लागले तेव्हा तो काळ एकापेक्षा एक सरस नाटककारांचा होता. कानेटकर-तेंडुलकर-जयवंत दळवी-बाळ कोल्हटकर- विद्याधर गोखले हे त्यातले प्रमुख. मतकरी यांपैकी पहिल्या तिघांच्या नाटय़जाणिवांच्या जवळचे. या सगळ्यांशी झुंज घेत, त्यांच्या तोडीस तोड नाटक उभं करून त्यांनी स्वतःचा म्हणून एक प्रेक्षक उभा केला, घडवला.

आपली प्रतिक्रिया द्या