
>> दिलीप देशपांडे
दरवर्षी 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन आणि मृत्युदिन 23 एप्रिल आहे. 23 एप्रिल 1923 रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी हा दिवस साजरा केला. प्रत्येक देशात हा दिवस साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
आज रोजी जवळपास सर्वच तालुके आणि जिह्याच्या ठिकाणी वाचनालये आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातही ती पोहोचली आहेत. यातील बऱ्याच ठिकाणी वाचन वाढीस लागावे म्हणून तर कार्यक्रम राबवले जातात, तर जिह्याच्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन भरवून वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचतील अशी व्यवस्था केली जाते. वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचवण्यासाठी आणि वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी म्हणून 1975-76 च्या सुमारास ग्रंथाली वाचक चळवळीची स्थापना करून महाराष्ट्रभरात अगदी तालुका पातळीपर्यंत ही चळवळ पोहोचवली आणि तीही स्वस्त दरात. तसेच पुस्तक वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी नवनवीन प्रयोग केले. ढवळे ग्रंथयात्रा, अक्षरधाराची पुस्तक प्रदर्शनांद्वारे प्रयत्न झाले. त्याचबरोबर नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे विश्वस्त विनायक रानडे यांनी बारा वर्षांपासून सुरू केलेला ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा नवीन प्रयोग. जवळपास 50हजारांहून अधिक वाचक याच्यात जोडलेले आहेत. पुंडलिक पै यांची डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररी हीसुद्धा वाचकांसाठी नवनवीन कार्यक्रम करून वाचन संस्कृती वाढीस मोलाचे योगदान देत आहे. त्याचबरोबर बदलापूर येथील श्याम जोशी यांच्या ग्रंथसखा वाचनालयाचाही उल्लेख करावा लागेल. त्यांनीसुद्धा सुरुवातीला व्यक्तिगत भांडवलातून हे वाचनालय सुरू केले.
अनेक जण वैयक्तिक पातळीवर वाचनासाठी प्रयत्न करीत आहेत. सोलापूर जिह्यामध्ये काशीराम कोळी नावाचा तरुण बैलगाडीत पुस्तक घेऊन फिरतो. गावोगावी तो पुस्तके घेऊन फिरतो आणि लोकांना वाचायला प्रवृत्त करतो. गाडीमध्ये पाचशे-सहाशे पुस्तके असतात. अकोला शहरात गजानन नारे यांचेही असे फिरते वाचनालय आहे. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून ते पुस्तकांची गाडी घेऊन फिरतात. विद्यार्थीदशेतच वाचनाची आवड निर्माण व्हावी हा प्रामाणिक हेतू आहे असे ते सांगतात. अशी ही साहित्यप्रेमी मंडळीसुद्धा सेवा करून वाचन संस्कृती रुजवत आहेत ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे.
जीवन इंगळे यांची लहानाबरोबर मोठय़ांनी पुस्तक वाचावे हीच तळमळ आहे. पुणे आणि सातारा जिह्यांतील अनेक गावांना त्यांनी भेट दिली आहे. पुस्तके ही सर्वात जवळचे मित्र असतात आणि त्यांच्या सान्निध्यात राहिलो तर आपण विचारांनी समृद्ध होऊ अशी त्यांची भावना आहे.
विदर्भातील वर्धा येथे सचिन सावरकर हे शिक्षक यांनी ‘पुस्तक दोस्ती जागर’ म्हणून कल्पना पुढे आणली आहे. पाच ते वीस वर्षे वयोगटातील बालक व युवकांना एकत्र आणून त्यांना पुस्तके वाचायला द्यायची आणि युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करायची. वाचन हा संस्कार असून लहानपणापासून मुलांवर रुजवण्याची गरज आहे ही त्यांची त्यामागची भूमिका आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तकांविषयी फार प्रेम होते. ज्या वेळी त्यांच्याकडे पुस्तक खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते, त्या वेळी ते ग्रंथालय उघडे त्या वेळी जात व त्याची वेळ संपेपर्यंत तिथे वाचन करीत. नंतरच्या काळात मुंबई दादर येथील राजगृह या ठिकाणी बाबासाहेबांनी पन्नास हजारांहून अधिक पुस्तकांचा संग्रह केला होता आणि जगातील हे त्यांचे सर्वात मोठे व्यक्तिगत ग्रंथालय होते. त्यात विविध ग्रंथांचा समावेश आहे. त्यांच्या ‘वाचाल तर वाचाल’ या विचाराने अनेकांना प्रेरणा मिळाली. बाबासाहेब नेहमी म्हणत ‘‘तुमच्याकडे दोन रुपये असतील तर त्यातील एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल, तर पुस्तक तुम्हाला कसे जगावे हे शिकवेल.’’ आज या जागतिक पुस्तक दिनानिमित्त संकल्प करू आणि आपण असं वाचन करू की, त्यातून स्फूर्ती व प्रेरणा मिळेल. वाचाल तर समृद्ध व्हाल.





























































