आभाळमाया – ‘रिकरन्ट’ नोव्हा पुन्हा दिसेल?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक, [email protected]

सन 1954 च्या जुलै महिन्यात वृषभ राशीच्या ताऱयांमधील एका अतिनवताऱयाचा महाविस्फोट झाला. तो एवढा तेजस्वी होता की, अनेक रात्री आणि भरदिवसाही ‘दुसऱया’ सूर्यासारखा तेजस्वी ‘तारा’ आकाशात दिसत होता. चीनमध्ये तेव्हा फारसा पाऊस नसल्याने त्याचं निरीक्षण आणि नोंद केली गेली. मात्र हिंदुस्थानातला पावसाळा त्या वेळी ऐनभरात असल्याने ढगाआडचा हा दुसरा ‘सूर्य’ जाणवला नसावा. मात्र कश्मीरमध्ये आढळलेल्या एका आदिवासी गुंफांचित्रात आकाशात ‘दोन’ सूर्यासारख्या वस्तू तळपत असल्याचं दाखवल्याचं काही संशोधकांना आढळलं आणि त्यावरून ‘क्रॅब नेब्युला’च्या विस्फोटाचं ते चित्रण असावं असं त्यांना वाटलं.

वृश्चिक राशीतला ज्येष्ठा (ऍन्टॅरेस) हा लालसर दिसणारा तारा असाच एक लाल महातारा असून त्याचा विस्फोट कोणत्याही क्षणी होऊ शकतो. वृषभ राशीतला रोहिणी (अल्देबेरान) हा तारासुद्धा नारिंगी रंगाचा असून त्याचं लाल ताऱयात आणि विस्फोटक ‘सुपरनोव्हा’त रूपांतर होऊ शकतं. सर्वात महत्त्वाचा आहे तो ‘मृग’ नक्षत्रातील बीटेलज्युज किंवा ‘काक्षी’ हा लाल तारा. तो रेड-जायन्ट होऊन मृत्युपंथाला लागलेलाच आहे. त्याचाही विस्फोट कोणत्याही क्षणी झाला तर आपल्याला एक अद्वितीय तेजस्वी अवकाशस्थ गोष्ट पाहायला मिळू शकते. मध्यंतरी तो ‘कॉस्मिक डस्ट’मध्ये गुरफटल्याने थोडा मंदावला आणि निरीक्षकांना वाटलं की, त्याचा महाविस्फोट होण्याऐवजी तो ‘डीम’ का होतोय? परंतु पुढे त्या ‘वैश्विक धुळवडी’चा खुलासा झाला.

सध्या चर्चेत आणि वैज्ञानिक वृत्तांमध्ये चमकण्याआधीच चमकतोय तो उत्तर मुकुट किंवा ‘कोरोना बोरिऑलिस’ या भूतप (बूटेस) तारकासमूहाच्या पूर्वेला आणि ज्या ‘शौरी’ तारकासमूहात आपण 1974 मध्ये रेडिओ संदेश पाठवला आहे त्याच्या पश्चिमेला हा लहानसा, पण मुकुटाच्या आकाराचा सुंदर तारकासमूह आहे. याच तारकासमूहातील एका तेजस्विता वाढवणाऱया अजब ताऱयाची करामत काही महिन्यांत पुन्हा दिसणार आहे.
तो ज्येष्ठासारखा ‘सुपरनोव्हा’ होणारा तारा नसला तरी त्याला पुनः पुन्हा तेजाळणारा रिकरन्ट नोव्हा म्हणतात. येत्या सप्टेंबरपर्यंत तो दिवसा दिसू शकेल इतका तेजःपुंज होईल असंही म्हटलं जातं. त्यापूर्वी जरा तो तारा जिथे आहे त्या ‘उत्तर मुकुटा’ची माहिती यानिमित्ताने घेऊ या.

सर्व तारकासमूहांच्या, नक्षत्रांच्या जशा प्राचीन कथा आपल्याकडे आहेत तशाच त्या प्राचीन ग्रीक वाङ्मयातही आहेत. त्यांचा उपयोग आपल्याला एखादा तारकासमूह किंवा तारा लक्षात ठेवण्यासाठी होतो. त्या वेळीही कदाचित चतुर निरीक्षकांनी याच हेतूने या कथा रचल्या असतील. उदाहरणार्थ आपण ज्याला ‘मृग’नक्षत्र म्हणतो तोच तारकासमूह ग्रीक कथेत ‘ओरायन’ नावाचा ‘शिकारी’ म्हणून दाखवला जातो. दोन्ही प्रकारचे आकार त्या तारकासमूहात चपखल बसवता येतात. काही तारकासमूहांचे कथेनुसार होणारे आकार मात्र ओढून-ताणून ‘बसवावे’ लागतात, ती गोष्ट वेगळी.

उत्तर मुकुटाचा एकूण आकार मुकुटासारखा दिसतो. त्यातला महत्त्वाचा ‘अल्फा’ तारा ‘मुकुटमणी’ आहे. त्याला ‘जेम्मा’ म्हणतात. या ताऱयाचं वैशिष्टय़ म्हणजे ते दोन किंवा द्वैती म्हणजे परस्परांभोवती फिरणारे वर्णालीय द्वैती (स्पेक्ट्रल बायनरी) तारे आहेत. शक्तिशाली दुर्बिणीतून त्यांचं दर्शन घडू शकतं.

आता चर्चेत आलेला तारा मात्र याच ‘उत्तर मुकुटा’तील ‘टी’ प्रकारचा ‘ब्लेझ’तारा असून तो सुमारे 80 वर्षांच्या कालावधीनंतर तेजस्वी होत जातो आणि मंदावतो. रेल्वेत कामगार असलेल्या ऍलेक्से या व्यक्तीने हा तारा 1866 मध्ये प्रथम रात्री घरी परतताना सहज पाहिला आणि रोज तो न्याहळण्याची त्याला सवय लागली. तशी नोंदही त्याने करून ठेवली. तो काही खगोल अभ्यासक नव्हता, पण त्याला दिसलेले अवकाशी आश्चर्य तो नोंदवत होता. तेव्हा आपण पुढील संशोधनाच्या दृष्टीने मोठं काम करतोय याची त्याला जाणीवही नसेल.

एरवी पंधना प्रतीचा (व्याधाच्या तुलनेत) म्हणजे अगदीच असलेला हा तारा ‘रिकरन्ट’ किंवा पुनः पुन्हा तेजाळणारा नवतारा असल्याने (नोव्हा) तो ऍलेक्से यांनी पाहिला तेव्हा दुसऱया प्रतीपर्यंत तेजस्वी झाला होता. त्यानंतर 1938 मध्ये तो थोडा तेजाळला. 1946 मध्ये परत दुसऱया प्रतीचा आणि दुर्बिणीतून खूपच तेजस्वी दिसणारा झाला.

आता पुन्हा त्याचा ‘नोव्हा’ होण्याचा काळ आला आहे. खगोल अभ्यासकांच्या दृष्टीने ही पर्वणीच असली तरी आता आकाश निरीक्षकांची आणि दुर्बिणी विकत घेणाऱयांची संख्याही वाढलेली असल्याने सप्टेंबरमध्ये आकाशाकडे चौकस नजरेने पाहायला हवं.

या वेळी आपल्याकडे काळ सरत्या पावसाचा असेल. अधूनमधून आकाश निरभ्र होईल. हा ‘रिकरन्ट’ नोव्हा चमकदार होण्याच्या आठवडय़ाभराच्या काळात केव्हातरी तो नक्की ‘अनुभवता’ येईल. त्यासाठी नजर आकाशाकडे वळवायला हवी. विश्वातील गहन, पण गमतीदार गोष्टींनीच संशोधनात रुची निर्माण होऊ शकते. पुन्हा सप्टेंबरमध्ये त्याविषयी माहिती घेऊच.