लेख : मन-दर्पण

58

>> दिलीप जोशी   

जुन्या क्रमिक पुस्तकात एक गोष्ट होती. आईने घरकाम सांगितलेला एक मुलगा रागावून आईकडे आपल्या कामाचा ‘हिशेब’ देतो. अमुक कामाचे अमुक पैसे असल्याने चिडून लिहिलेलं असतं. आई रात्री त्याच्या उशाशी एक कागद ठेवते. त्यात त्याच्या संगोपनासाठी केलेल्या ‘कामां’ची माहिती असते, पण त्या कष्टांची ‘किंमत’ आईने शून्य अशी लिहिलेली असते. ते वाचून मुलाचे डोळे पाणावतात. रागाच्या भरात आपण केवढी गफलत केली हे त्याच्या लक्षात येतं आणि अपराधी भावनेने आईपाशी जाताच ती त्याला क्षमा करते. क्षमा करणे हे तर मोठ्या मनाचं लक्षण झालंच, पण आपल्या चुकीची कबुली देणंही निरोगी मनाचंच लक्षण. भल्याभल्यांना ते जमत नाही. उलट ‘आपणच कसे बरोबर असं उच्चरवाने सांगितलं जातं. तरी अंतर्मन सांगत असतं की, समोरची व्यक्ती म्हणतेय ते बरोबर आहे, पण चूक मान्य करण्यात इगो आडवा येतो. इंग्रजी भाषा सर्वदूर पसरल्यापासून त्यांचा ‘सॉरी’ हा शब्द तसा सोपा वाटतो. माफी मागायला पुरेसा ठरतो, पण अनेकदा तो औपचारिक असतो. ‘म्हटलंय ना सॉरी, मग आता काय?’ असा आविर्भाव त्यात अनेकदा दडलेला दिसतो.

एकदा एका गप्पांच्या मैफलीत नवीन, पण बुद्धीला चालना देणारं काहीतरी करूया असं ठरलं. आम्ही दहा-बारा जण. प्रत्येकाने आपल्या आयुष्यातली एक तरी चुकीची गोष्ट जाहीरपणे मान्य करायची म्हटल्यावर सारे गप्प झाले. तसं सांगण्यासारखं काही नाही, विनाकारण कोण कशाला बोलेल? नकळत चूक घडली असेल तर आठवत नाही वगैरे युक्तिवाद सुरू झाले. आमच्यात एक ज्येष्ठ उद्योजक मित्र होते. ते म्हणाले, माझा अनुभव सांगतो, ‘‘एकदा फॅक्टरीतून घरी आल्यावर लक्षात आलं की, हाताला ऑइल लागलं. म्हणून हात धुताना काढून ठेवलेली सोन्याची अंगठी आणि मौल्यवान घड्याळ तिथेच बेसिनपाशी राहिलंय. रात्रभर झोप नव्हती. कारण मी घरी निघाल्यावर सफाइं कामगारानं ऑफिस साफ करण्याची पद्धत होती. तोसुद्धा दोन-तीन दिवसांनी एकदा यायचा. वाटलं, त्याला हा ऐवज मिळाला तर तो परत देईल?… उद्या तर त्याचा येण्याचा वारही नाही. बरं, सेलफोनवरून विचारण्याचा तो काळ नव्हता. सकाळी लवकर जाऊन स्वतःच फॅक्टरी उघडली. अंगठी, घड्याळ कोणाला सापडलं का याची चौकशी केली. सर्वांनी नकारार्थी उत्तर दिलं. तो सफाई करणारा वेळेवर येऊन गेल्याचंही सांगितलं. बेचैन अवस्थेत कामाला सुरुवात केली आणि थोड्या वेळात तो सफाई कामगार आला. म्हणाला ‘साहेब, तुमची अंगठी आणि घड्याळ कुठे जाऊ नये म्हणून मी जपून ठेवलंय. त्या कपाटावर एका कागदात गुंडाळून! तुमचा फोन लागला नाही म्हणून खाडा करून आलो.’ मला विलक्षण अपराध्यासारखं वाटलं. त्याला बाहेर बोलावून सर्वांदेखत मी त्याची क्षमा मागितली. मनात काय आलं होतं तेही मोकळेपणाने कबूल केलं. त्याचे डोळे पाणावले. त्याला योग्य बक्षीस  त्याचा ‘खाडा’ झाला होता तोही भरून दिला. तो म्हणाला ‘साहेब, मी गरीब आहे, पण अप्रामाणिक नाही. काम करून जेवढं मिळतं त्यात भागवतो, पण वाईट विचार करणार नाही…’’ हे सांगताना त्या ज्येष्ठ मित्राचे डोळे भरले होते. ते म्हणाले, ‘‘तो खरा सुसंस्कृत माणूस होता आणि मी…?’

मग मीही एका कार्यक्रमातली गोष्ट सांगितली. माझ्या व्याख्यानाआधी निवेदक जे सांगत होता त्यात काही चुका होत्या. मी बोलण्याच्या सुरुवातीला त्यांचा उल्लेख करून निवेदन अभ्यासपूर्ण असावं असा शेरा मारला. तो तरुण नर्व्हस झाला. जेवणाच्या वेळेला मला भेटला आणि म्हणाला, ‘‘मला जे लिहून दिलं होतं ते मी बोललो. तुम्ही मला उगाच बोललात.’’ माझे डोळे खाड्कन उघडले. मीच ‘अभ्यासपूर्वक’ बोलायला हवं होतं. तो पुढचं निवेदन करायला बिचकत होता. मग त्याला स्टेजवर घेऊन गेलो आणि त्याची क्षमा मागितली. या कृतीने तो भारावला. ‘‘अशी सगळ्यांसमोर माफी नसती मागितली तरी चाललं असतं.’’ या त्याच्या म्हणण्यावर, ‘‘तुला दोष दिला तो सर्वांसमक्ष, मग  त्याचं परिमार्जन तसंच करायला नको!’’ असं म्हणताच तो हसला. ‘‘मीसुद्धा हे लक्षात ठेवेन’’ असं म्हणाला.

आयुष्याच्या प्रवासात आपल्या सर्वांच्याच काही ना काही चुका होतात. कधी कळत तर कधी नकळत. वेळच्या वेळी क्षमा मागून त्यांचा निचरा केलेला चांगला. नाही तर त्यावर पांघरुण घालण्याची चतुराई दाखवण्याच्या नादात, मनातली अपराधी भावना (गिल्ट) वाढत जाते. चुका कधी भावनेच्या भरात होतात तर कधी ‘इगो’मुळे. कारण काही असो. ‘‘माझं काहीच चुकलेलं नाही’’ असं काही वेळा युक्तिवादाने पटवूनही देता येतं, पण मुळात आपण चुकलोय हे मनात रेंगाळतच. या मन-दर्पणाचं काय करायचं? काही गाण्यांमध्ये दोन-चार ओळीत मोठं तत्त्वज्ञान सामावलेलं असतं ‘मनसे कोई बात छिपे ना, मन के नैन हजार’ हे आशाताईंनी गायिलेलं गाणं आठवून पहा. तो मनाचा आरसा भावभावनांच्या धुळीने सारखा डागाळत असतोच. त्याच मनातील निरोगी भावनेने तो स्वच्छही करता आला पाहिजे. परदेशातल्या काही ‘सेलिब्रिटी’नी आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितल्याची एक बातमी वाचली. खरंच, प्रसिद्ध व्यक्ती चांगला पायंडा पाडू शकतात. तो क्रमिक पुस्तकातला ‘धडा’ शिकवल्यावर आमचे मास्तर म्हणाले होते ‘तुम्हीही एखादी चुकीची गोष्ट कळत-नकळत केली असेल तर एका कागदावर लिहा. मीही लिहिणार आहे. वाचल्यावर आपण कागद फाडून टाकू. कारण तोपर्यंत मनं स्वच्छ झालेली असतील…’ ते विदेशी ‘सेलेब’ तरी वेगळं काय करतायत!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या