सच्चा विज्ञान प्रसारक

36

>> शैलेश माळोदे

जैवरसायन शास्त्रज्ञ प्रा. पी. बलराम. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांच्या वैज्ञानिक होण्याचा पाया रचला गेला. त्यामुळे बलरामांना महाराष्ट्राविषयी विशेष आस्था आहे.

2005 साली सेंटर फॉर कन्टेम्पररी स्टडीज या आंतरशाखीय अध्ययन केंद्रांमध्ये दोन महिने ‘‘व्हिजिटिंग सायंटिस्ट’’ म्हणून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये बेंगळुरूला व्यतीत केलेले दोन महिने माझ्या करियरमधले ‘पाथबेकिंग’ महिने ठरले . त्याचवेळी संस्थेच्या संचालकपदासाठी कोणाची नियुक्ती होणार हा विषय चर्चिला जात होता. प्रा. राघवेंद्र गदगकर आणि प्रा. पी. बलराम हे जैवशास्त्र डिव्हीजनचे वैज्ञानिक, त्यांची नवे चर्चेत अग्रभागी होती. दोघांशी मी या संबंधी बोललो, पण अंतिमतः दोघांनी ताकास तूर लागू दिला नाही. पण नंतर कळलं की, प्रा. पी. बलराम हे संचालकपदी नियुक्त झाले. ‘करंट सायन्स’ या हिंदुस्थानी एका प्रतिथयश शोधनियतकालिकाचे ते संपादकही होते. बंगळुरू वास्तव्यात त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी बरेचदा लाभली. नंतर मुंबईला परतल्यावर संधी मिळेल तशा उडत उडत तर कधी थोडय़ा सावकाश गप्पादेखील झाल्या.

प्रा. पी. बलराम म्हणजे पद्मनाभन बलराम यांचा महाराष्ट्राशीदेखील संबंध आहे. ते त्यांनीच स्वतःच्या शैक्षणिक कारकीर्दीविषयी सांगताना हे स्पष्ट केलं तेव्हा ते म्हणाले, ‘‘जैवरसायनशास्त्रात म्हणून माझी आज जी ओळख आहे ती पुणे विद्यापीठातील फर्ग्युसन कॉलेजमधील पदवीमुळे फर्ग्युसनची रसायनशास्त्र्ाातील पदवी माझ्या शैक्षणिक करिअरचा पाया आहे. देशातील तिसऱया क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण त्यांना 2014 साली तर थर्डवल्ड ऍकॅडमी ऑफ सायन्सेस पारितोषिक 1994 साली मिळाले.

न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनेन्स स्पेक्ट्रोग्राफी, इफ्रारेड, स्पेक्ट्रोस्कोपी आणि डायक्रॉयसस ही तंत्रेदेखील क्ष-किरण क्रिसलोग्राफी तंत्राबरोबर वापरून पेप्टाईड्स या रासायनिक पदार्थांच्या जीवांमधील स्थानाविषयी मौलिक संशोधन केले. अमायनो आम्ल हादेखील त्यांच्या संशोधनाचा एक महत्त्वाचा विषय राहिला.
आयआयएस्सीच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर शैक्षणिक प्रशासक म्हणून त्यांनी आंतरशाखीय अध्ययनाचे महत्त्व लक्षात घेऊन संस्थेत अशी अनेक केंद्रे स्थापनेवर भर दिला. ते म्हणाले, ‘आयआयएस्सीसारख्या 800 वर्षांपेक्षा जुन्या संस्थेपुढे सध्या खूप आव्हाने आहेत. 30-40 वर्षांपूर्वी ती नव्हती. तीक्र स्वरूपाची स्पर्धा लक्षात घेता या जुन्या संस्थेला प्रदीर्घ इतिहासाबरोबरच लवचिकताही मिळवावी लागते. आम्ही याबाबत सुदैवी आहोत. सेंटर फॉर अर्थ सायन्सेस आणि सेंटर फॉर न्युरोसायन्स आम्ही सुरू केली आहेत. विद्यार्थ्यांनाही या अत्यंत आंतरशाखीय बनलेल्या संशोधन पद्धतीशी जुळवून घ्यावे लागेल. सध्या विज्ञान आणि अभियांत्रिकी एकमेकांशी खूप निगडीत झाले आहेत. म्हणून आम्ही नॅनो सायन्स इंजिनीयरिंग आणि इतर जैवशास्त्राrय अभियांत्रिकी पर्याय उपलब्ध केलेत. मला वाटतं हे आंतरशाखीय विषयच भविष्य आहेत!

बऱयाचदा एखादी संस्था एखाद्या विशिष्ट काळात नावारूपाला येते ती तिच्या करिश्मा लाभलेल्या लीडरमुळे. नंतर ती मागे पडते, पण इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या बाबतीत मात्र झालेलं नाही. तिने आपला दर्जा कसा काय टिकवलाय. प्रा. बलराम म्हणाले, ‘‘खरं तर मलादेखील नेहमी या स्थितीनं गोंधळून टाकलंय. आयआयएस्सीला देखील इतर संस्थांप्रमाणेच किंबहुना त्याहून जास्तच समस्यांना सामोरं जावं लागलंय. हिंदुस्थानमध्ये विशिष्ट ठरलेल्या शैक्षणिक दर्जा टिकविण्यात मात्र तिला यश लाभलंय. इतर राष्ट्रीय प्रयोगशाळांप्रमाणे ही संचालककेंद्री संस्था नाही. फॅकल्टी/शिक्षकवर्ग संपूर्णपणे मुक्त / स्वतंत्र असतो आणि त्यांचे मूल्यमापन केवळ त्यांच्या संशोधनात कामगिरीवरच करण्यात येते. काही लोक चांगलं संशोधन करतात. तर काही तितकसं चांगलं संशोधन करीत नाही तर काही अजिबात संशोधन करीत नाहीत. सुदैवानं या संस्थेस चांगली लोकं येत गेली. निवृत्त होणाऱयांची जागा त्यांनी भरून काढली.’’

संशोधक म्हणून कोणत्या विषयात, क्षेत्रात संशोधन करावं असा प्रश्न तरुणांना नेहमी पडतो. हा प्रश्न प्रा. बलराम यांनी कसा सोडवला हे त्यांच्याच शब्दात. ते म्हणाले, ‘‘आपण बऱयाचदा जाणीवपूर्वक एखादा निर्णय घेत नसतो. आपण वाहत जाते आणि काही तरी घडतं. जेव्हा एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असल्यास निवडीची समस्या उद्भवते. जेव्हा तुमच्याकडे एकाच ठिकाणी प्रवेशाची शक्यता असते तेव्हा तुम्ही आनंदी असता. तुमच्याच वयाचे असताना मला तुम्हाला सध्या जितकं ठाऊक आहे तितकं ठाऊक नव्हतं. आम्ही बहुतांश संदर्भात आनंदाने अज्ञानी होतो आणि जे आम्हाला लाभलं त्यात खूप खूश होतो. मला वाटतं नोकरी हा खरच ‘ड्रायव्हिंग कोर्स’ होता आणि संशोधन हे दुय्यम स्थानी वा बॅकसीटवर होतं. तुम्हाला काय करायचंय हे निश्चितपणे ठाऊक असल्यास मी चिंतीत होईन,’’ असे मिश्कील स्वभावाचे पी. बलराम विज्ञान प्रसाराविषयी अत्यंत आग्रही होते. म्हणून त्यांनी एस. रामशेषन या संस्थेच्या माजी संचालकांच्या नावे तरुण विज्ञान लेखकांसाठी फेलोशिप्स इंडियन सायन्स ऍकॅडमीत सुरू केल्या 2003 साली. अशा या विज्ञान क्षेत्रातील सायंटिस्ट नेक्स्टडोअरची इमेज लाभलेल्या प्रा. पी. बलराम यांचा आदर्श घेण्यासारखाच नव्हे, तर प्रत्यक्षात आणण्यासारखा आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या