जागर – ‘रीचरखा’ची इको सर्जनशीलता

>> सुवर्णा  क्षेमकल्याणी

बिस्किट पुडय़ाचे रॅपर्स, प्लॅस्टिकच्या विविध प्रकारच्या पिशव्या, गिफ्ट पेपर्स इत्यादी टाकाऊ पदार्थ, प्लॅस्टिकचा कचरा याचे नेमके काय करता येईल याचा विचार करत असतानाच अमिता देशपांडे-परांजपे यांनी सर्जनशीलतेतून वेगवेगळे प्रयोग केले आणि ‘रीचरखा’ संस्थेने पर्यावरण संतुलन राखण्यास हातभारच लावला.

निसर्गात मानवनिर्मित कचऱयात ‘प्लॅस्टिक’ हा महत्त्वाचा घटक आहे. प्लॅस्टिकचे विघटन होण्यासाठी कित्येक वर्षं लागतात, पण याच कचऱयापासून काही उपयुक्त वस्तू तयार करता आल्या तर… या विचाराने अमिता देशपांडे-परांजपे यांच्या डोक्यात एक अनोखी कल्पना आली. पर्यावरणातल्या या घटकाचा कच्चा माल म्हणून वापर करून त्यापासून जीवनोपयोगी वस्तूंची निर्मिती करता येऊ शकते हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. बिस्किट पुडय़ाचे रॅपर्स, प्लॅस्टिकच्या विविध प्रकारच्या पिशव्या, गिफ्ट पेपर्स इत्यादी टाकाऊ पदार्थ वापरून त्यापासून मजबूत, टिकाऊ, आकर्षक अशा वस्तू तयार केल्या जातात. या वस्तू पुण्याच्या ‘रीचरखा इकोसोशल’ या संस्थेमार्फत अतिशय सर्जनशीलतेने तयार केल्या जातात.

संस्थेच्या संस्थापिका अमिता देशपांडे-परांजपे यांच्या कल्पनेतून ‘रीचरखा इकोसोशल’ची सुरुवात झाली. आपण ट्रेकिंगला किंवा समुद्रकिनारी प्लॅस्टिकचे थरच्या थर पाहतो. काही संस्था यासाठी कामही करतात. मात्र अमिता यांनी यावर अभ्यास केला. या कचऱयाचे नेमके काय करता येईल याचा वापर करून काही जीवनावश्यक वस्तू तयार करता येतील का? याचा विचार करताना त्याअनुषंगाने त्यांना मार्ग मिळाला. संस्थेच्या प्रवासाविषयी सांगायचं तर 2015 साली ‘आरोहणा’ची स्थापना झाली. मात्र कोरोनानंतर ‘आरोहणा’ बंद करावी लागली. दरम्यान संस्थेच्या टीमची पुनर्रचना करण्यात आली आणि सप्टेंबर 2020 ला ‘रीचरखा इकोसोशल’ची स्थापना झाली. संस्थेच्या कार्यामुळे प्लॅस्टिक कचऱयाचे ढीग कमी होण्यास मदत होतेय. शिवाय ही संस्था जनजागृती करण्याचं महत्त्वाचं कामही करतेय. प्लॅस्टिकचा पुनर्वापर तसेच आदिवासी आणि तत्सम लोकांना रोजगार या दुहेरी हेतूने हे काम अविरतपणे सुरू आहे. पूर्वी हातमागावर कापड विणले जात असे, पण कालांतराने आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात हे हातमाग कुठेतरी मागे पडले. अमिता यांनी प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या तंतूंना बांधण्यासाठी मात्र हातमाग अर्थात चरख्याचा वापर केला. हिंदुस्थानी संस्पृतीत या चरख्याचे स्थान अढळ आहे हे आपण जाणतोच.

टाकाऊ प्लॅस्टिक, ज्यात प्लॅस्टिक पॉलिथिन बॅग्स बिस्किट कुडय़ाचे रॅपर, ऑडिओ-व्हिडीओ पॅसेट टेप्स याशिवाय घरात वापरल्या जाणाऱया पिठाच्या पिशव्या, साबणचुऱयाचे रॅपर्स वापरून त्यापासून पर्यावरणपूरक बॅग्स, टेबल मॅट तसंच रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱया अनेक महत्त्वपूर्ण वस्तू इथे तयार केल्या जातात.

‘रीचरखा इकोसोशल’च्या संस्थापिका अमिता यांनी सुरुवातीस आयटी क्षेत्रात काम केलं. त्यानंतर मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन त्यातही काही वर्षं काम केलं. हे करत असताना आपल्या पर्यावरणासाठी काही करता येईल का? असा विचार करून त्यांनी भटपंती केली, त्यादृष्टीने अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, काही ठिकाणी प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून ते हातमागावर विणतात. यातून काहीतरी टिकाऊ आणि आकर्षक करावं हे निश्चित झालं. या व्यवसायासाठी त्यांच्या वडिलांना त्यांनी आदर्श मानलं. शिवाय त्यांच्या पतीचेही पाठबळ होते आणि या कामात त्यांना अजून एका सखीची मदत झाली ती म्हणजे जाई जाधव यांची. त्यांच्या या संपूर्ण टीमचे जोमाने हे काम सुरू झाले. ‘रीचरखा इकोसोशल’मध्ये अजूनही काही मंडळींचा हातभार आहे. हळूहळू या संस्थेचं काम लोकांपर्यत पोहोचतंय. आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून या संकल्पनेचा विचार करायला हवा. अमिता यांनी सुरू केलेल्या या कामात त्यांना आपणही शक्य ती मदत करून त्यांना हातभार लावू शकतो. अधिक माहितीसाठी www.recharkha.org या वेबसाईटला आपण भेट देऊ शकता. त्यांची विविध उत्पादने, उत्पादनांची प्रक्रिया, संस्थेचे इतर कार्य या सगळ्याविषयी आपण जाणून घेऊ शकता. नवीन वर्षाची सुरुवात आपण पर्यावरणपूरक वस्तूंनी करून आपणही निसर्गाचं काही देणं लागतो याचं भान राखूया.

आपली प्रतिक्रिया द्या