
‘रस्ता सुरक्षा’ हा प्रश्न सतावू लागला आहे. रस्ता सुरक्षा आणि मानवी जीवन याचा विचार शासन स्तरावर सकारात्मक केला जातो. एका अल्प चुकीमुळे मोठे आर्थिक नुकसान व जीवितहानी होत असते. यामुळे ‘रस्ता सुरक्षे’चा मुद्दा ऐरणीवरचा असला तरी व्यक्ती, प्राणी, वृक्ष, वाहन या सर्वांच्या सुरक्षेचादेखील आहे.
‘रस्ता सुरक्षे’बाबत 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारीदरम्यान जनजागृतीचा कार्यक्रम प्रादेशिक परिवहन विभागातर्फे राज्यभर राबविला. सदरचा जनजागृतीचा कार्यक्रम राज्यभर यशस्वी झाला आहे. अभियान काळात राज्यातील परिवहन कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टीव्ह लावण्यात आले. वाहनधारकांना पत्रके वाटण्यात आली. ज्या शहरांमध्ये प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालय आहेत अशा शहरातील विविध वाहतूक संघटनांच्या वतीने शहरातील मुख्य चौकांमध्ये पत्रके, वाहनधारकांना पुरवून वाहनांना रिफ्लेक्टर्स लावले आहेत.
मोटार ड्रायव्हिंग स्कूल वाहने, कर्मचारी व अधिकारी यांचे संचलन, राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील विविध वाहतूक संघटनांच्या वतीने पत्रके वाहनधारकांना वाटप करण्यात आले. त्याचबरोबर वाहनांना रिफ्लेक्टर्स लावण्यात आले आहेत. राज्यातील विविध सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असणाऱ्या बैलगाडी, ट्रक, ट्रक्टर, ट्रेलर या वाहनांना सुरक्षा रिफ्लेक्टर, घोषवाक्य लावण्यात आलेले आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालनासाठी जागृती व प्रबोधनपर व्याख्याने संपन्न झालेली आहेत.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा पुरवठा कमी होत असल्याने रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले आहे. राज्यामध्ये असणाऱ्या विविध ठिकाणच्या पेट्रोल पंपावर दर्शनीय भागात व वाहनचालकांच्या सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी बॅनर लावून प्रबोधन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्गावर असणाऱ्या टोलनाक्यावर दर्शनीय भागात बॅनर लावून प्रबोधन करण्यात आले आहे.
वाहनचालकांच्या दृष्टीने नेत्र सुरक्षित असणे गरजेचे आहे. यासाठी नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे राज्यभर वाहनचालकांची नेत्र तपासणी झालेली आहे. दरम्यान अपघातप्रसंगी प्रथमोपचाराबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अपघातग्रस्त व्यक्तीचे हृदय बंद पडल्यानंतर 3 मिनिटांच्या आत प्राथम्याने करावयाच्या उपचाराबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलेली आहेत. सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने वाहनचालकांना हेल्मेट वाटप केले गेले आहेत. महामार्गालगतच्या गावांमध्ये वाहन कशा पद्धतीने चालवावे याविषयी माहिती देण्यात आली आहे. परिवहन कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या जनतेस शपथ देऊन, प्रबोधनपर पत्रके वाटण्यात आली. अधिकृत वाहन वितरकांच्या बैठका झाल्या. यामध्ये वाहन खरेदी करताना वाहनचालकाला रस्ता सुरक्षाविषयी मार्गदर्शन करून अपघात होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहनाचा अति वेग व रस्त्यावरील नियमांचे पालन न करणे या मुख्य कारणामुळे घडल्याचे दिसून येते. भविष्यात अपघात रोखण्यासाठी प्रत्येक महिन्याला एक जनप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प केला आहे.
- गोरख तावरे


























































