आभाळमाया – ‘ह्युमनॉइड’ अंतराळवीर

506

सध्या कृत्रिम प्रज्ञेचा, आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा जमाना आहे. त्याची सुरुवात विसाव्या शतकात झाली. माणसासारखीच कृत्रिम ‘व्यक्ती’ बनवता आली तर… यावर डोकं लढवलं जाऊ लागलं. निसर्गाने तयार केलेल्या सजीव पेशींचा माणूस प्रयोगशाळेत करण्याच्या प्रयोगात फारशी प्रगती झाली नाही, पण कृत्रिम मानव ऊर्फ रोबोट (पूर्वी नुसतं रोबो म्हणत) हा यंत्रमानव माणसासारखाच वागेल अशी कल्पना केली गेली. त्याला कोणी ‘यांत्रव’ असंही समर्पक नाव दिलं.

1920 मध्ये झेकोस्लोव्हाकियातील लेखक कॅरेल कॅपेक यांनी आर.यू.आर. नावाचं नाटक लिहिलं. त्याचा अर्थ रोझ्युम्स युनिव्हर्सल रोबोटस्. झेक भाषेतील रोबोटी शब्दावरून आलेला रोबोट हा शब्द 25 जानेवारी 1921 रोजी रूढ झाला. एका कारखान्यात कृत्रिम माणसं बनवली जातात. त्यांना ‘रोबोटी’ म्हणतात. मात्र ते माणसांसारखेच दिसतात व वाटतात अशी कथावस्तू असलेलं हे कॅपेक यांचं नाटक किती गाजलं ठाऊक नाही, पण त्यातून निर्माण झालेला रोबोट शब्द आधी वैज्ञानिक जगाने आणि मग साऱ्या जगाने स्वीकारला. त्याचा इंग्लिश उच्चार पूर्वी ‘टी’ सायलेंट ठेवून ‘रोबो’ असा केला जायचा. आता ‘अमेरिकन’ इंग्लिशच्या प्रभावामुळे रोबोट किंवा रोबा…ट’ असेही उच्चार ऐकू येतात.

…तर गोष्ट कृत्रिम माणसाची. पुढच्या काळात खरोखरच निर्मिती करण्यात माणसाला यश मिळालं. त्याच्या डोक्यात ही संकल्पना पार तीन हजार वर्षांपासून घोळत होती. जगातल्या अनेक महाकाव्यांत अशा जादुई कृत्रिम माणसांचे उल्लेख आढळतात. परंतु आधुनिक काळातला इलेक्ट्रॉनिक मेंदू आणि धातूचं शरीर असलेला प्राथमिक रोबोट 1961 मध्ये जनरल मोटर्सकडे युनिमेट नावाने कार्यरत झाला. ही एका विलक्षण तंत्रक्रांतीची नांदी होती.

1966 मध्ये स्टॅनफर्ड येथे ‘शॅन्की’ नावाचा रोबोट तयार करण्यात आला. त्याला स्वतःच्या अकलेने वागता येत होतं. त्यानंतर जपानी होंडा (किंवा हंडा) कंपनीचा ‘असिमो’ वगैरे बुद्धिमान रोबोट अवतरण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर हॉलीवूडच्या चित्रपटात रोबोट दिसू लागले. ते बरेचसे यांत्रिकच दिसत. डोळय़ांच्या जागी दिवे आणि एकसुरी (मोनोटोन्स) आवाज असं त्यांचं चालत्याबोलत्या यंत्रांचं रूप असायचं. यात प्रगती होत होत 2016 मध्ये हाँगकाँगच्या ‘हॅन्सन रोबोटिक्स’ने अगदी माणसासारखा दिसणारा रोबोट बनवला, तो एका तरुणीच्या रूपात. तिचं नाव सोफिया! 14 फेब्रुवारी 2016 रोजी ‘सोफिया’ ही कृत्रिमकन्या थेट लोकांसमोर आली. अमेरिकेतील ऑस्टीन शहरात भरलेल्या साऊथवेस्ट फेस्टिव्हलमध्ये तिने मंचावर पदार्पण केलं आणि चेहऱ्यावर माणसासारखे 50 भाव दाखवत (फेशियल एक्प्रेशन्स) प्रेक्षकांची मनं जिंकली. पुढे तर सौदी अरेबियाने 2017 मध्ये तिला नागरिकत्व दिलं. माणसांच्या जागातली ती पहिली यंत्र नागरिक किंवा यांत्ररिक.

असाच एक रशियन ह्युमनॉइड किंवा कृत्रिम मानव आता थेट अंतराळातील स्पेस स्टेशनवर पोचला आहे. त्याचं नाव फेडर! ‘फायनल एक्स्पेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन ऑब्जेक्ट रिसर्च’ या लांबलचक गोष्टीचं ‘फेडर’ हे संक्षिप्त रूप. सोयूज-एमएस-15 या यानातून त्याला अंतराळस्थानकावर पाठवण्यात आले. पायलटच्या जागी असलेल्या फेडरने आपली बुद्धीची चमक यान सुरू होताच दाखवली. ‘लेटस् गो’ म्हणत त्याने उड्डाण केले. 5 फूट 11 इंच उंचीचा हा चिरतरुण रोबोट 160 किलो वजनाचा आहे. त्याला इन्स्टाग्रॅम, ट्विटर वगैरे वापरता येतं. पाण्याची बाटली उघडून तो पाणी ‘पितो.’

अत्यंत विरळ गुरुत्वाकर्षणात मानवी शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यावेळी या अशा रोबोटचा वापर उत्तम ठरू शकतो. पुढच्या काळात बरीच अंतराळी कामं असे रोबोट करतील. 22 ऑगस्टच्या स्पेस स्टेशनवर सुखरूप पोचलेला फेडर 30 ऑगस्टपर्यंत तिथे स्पेस स्टेशनबाहेर स्पेसवॉक करीत केबल दुरुस्तीचं काम करीत होता.

सर्व कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करून फेडर महाशय 6 सप्टेंबरला पृथ्वीवर सुखरूप परतले. त्याला स्पेस स्टेशनवर ऍलेक्झांडर स्क्वोर्स्टाव यांनी मार्गदर्शन केलं.

युरी गागारिन नावाच्या पहिल्या माणसाला अंतराळात पाठवण्याचा विक्रम रशियाने 61 वर्षांपूर्वी केला. तसाच पहिला ‘यांत्रराळवीर’ही त्यांनीच पाठविला. त्याचा चेहरा मात्र माणसासारखा नव्हता.

आपली प्रतिक्रिया द्या