लेख – ‘आपला’ किपलिंग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी 

जगप्रसिद्ध असलेल्या महत्त्वाच्या काही विदेशी व्यक्तिमत्त्वांचा थोडक्यात परिचय असं आपलं यंदाचं लेखनसूत्र. इंग्रजी अमदानीत बऱ्याच ब्रिटिश, युरोपियन आणि अमेरिकन लोकांचा हिंदुस्थानशी परिचय झाला. त्यातील काही सांस्कृतिकदृष्टय़ा तर काही स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने हिंदुस्थानच्या जवळ आले. अभिनेता टॉम ऑल्टरसारखे तर हिंदुस्थानीच झाले. काहींचा जन्म आणि बालपण हिंदुस्थानात गेलेलं असल्याने त्यांना आपल्या देशाविषयी आत्मीयता होती. त्यामुळे कालांतराने मायदेशी परत गेल्यावरही त्यांच्या मनातून हिंदुस्थानच्या आठवणी पुसल्या गेल्या नाहीत. इंग्लिश क्रिकेट टीममध्ये कॅप्टन झालेला डग्लस जॅर्डीनही मुंबईत जन्मलेला ब्रिटिश होता.

मुंबईत जन्मलेला प्रसिद्ध इंग्लिश कवी, लेखक म्हणजे रुडयार्ड किपलिंग. 30 डिसेंबर 1865 रोजी त्याचा मुंबईत जन्म झाला. 18 जानेवारी 1936 पर्यंतचा त्याचा जीवनपट. अखेरच्या काळात किपलिंग लंडनला राहात होते. त्यांना ‘आपला’ किपलिंग म्हटलं कारण बालपणाचा पाच-सहा वर्षांच्या त्यांच्या मुंबईतल्या आठवणी गहिऱ्या होत्या. त्यांची आया त्यांना हिंदुस्थानी बालगीतं आणि गोष्टी सांगायची. दुपारच्या वेळी या गोष्टीत बाल रुडयार्ड गुंगून जायचा, मात्र आईकडे जाताना ‘आता मात्र इंग्लिशमध्येच बोल’ असं आया त्याला बजावत असे! त्यानंतर त्याची रवानगी इंग्लंडमधल्या साऊथसी येथे शिक्षणासाठी करण्यात आली. ‘कडक उन्हाचे दिवस आणि काळोख्या रात्री’ मुंबईत अनुभवलेल्या रुडयार्डला इंग्लंडमधलं ढगाळ (डल्) वातावरण आणि शाळेची कठोर शिस्त यामुळे तिथलं वास्तव्य ‘हॉरिबल’ वाटलं होतं. मातृनगरी मुंबईविषयी त्याने लिहिलंय.

‘Mother of cities to me,

For I was born in her gate.’

म्हणजेच ‘जन्मलो मी तिच्या द्वारी, ती माझी मातृनगरी’ अशा आशयाची किपलिंग यांची भावना त्या कवितेतून व्यक्त झालेली आहे, पण घरच्या शिस्तीपुढे काही चालण्यासारखं नव्हतं. सतराव्या वर्षापर्यंत इंग्लंडमध्ये शिक्षण घेतल्यावर नवतरुण रुडयार्ड, लाहोरमधल्या एका म्युझियममध्ये संचालक (क्युरेटर) म्हणून हिंदुस्थानकडे परत येण्यासाठी निघाला आणि 18 ऑक्टोबर 1882 रोजी आपल्या आवडत्या मुंबई बंदरात उतरला. मुंबईच्या रस्त्यांवरून पायी फिरताना बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या वेळचे सवंगडीही भेटले, पण सतत कात टाकत बदलत्या जगाबरोबर चालणाऱ्या मुंबईत त्याला बदल झालेला जाणवला. काही दिवस मुंबईत घालवून त्या वेळच्या अखंड हिंदुस्थानमधल्या लाहोरला त्याने प्रयाण केलं.

त्यानंतर 1883 मध्ये सिमला येथे किपलिंग वास्तव्याला होते. आताच्या म्यानमार, म्हणजे तेव्हाच्या बर्मा किंवा ब्रह्मदेशातील मंडालेपर्यंत त्यांची भ्रमंती झाली होती. आता तरुण रुडयार्डमधला  लेखक, कवी प्रकर्षाने जागा झाला. अलाहाबादच्या एका नियतकालिकात त्यांचं लेखन प्रसिद्ध होऊ लागलं. कोलकात्याच्या एका प्रकाशकाने त्यांच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी त्यांचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध केलं. हिंदुस्थानी वातावरणाची पार्श्वभूमी असलेलं त्यांचं जगभर गाजलेलं पुस्तक म्हणजे ‘जंगल बुक’. राजस्थान आणि मध्य प्रदेशात असताना तिथले डोंगर आणि त्या काळातील घनदाट अरण्याची पार्श्वभूमी असलेलं हे कथानक आता आपल्याकडे त्यावरच्या कार्टून फिल्ममुळे नव्या पिढय़ांनाही ठाऊक आहे. त्याच्या हिंदी रूपांतरात, गुलजार यांनी त्यातल्या जंगली प्राण्यांनी वाढवलेल्या ‘मोगली’साठी लिहिलेलं ‘जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है’ हे गाणं आठवून पहा त्या कथेतल्या व्हिलन टायगर शेरखान, बिबटय़ा बगिरा, अजगर ‘का’ आणि भालू ही पात्रं जगात गाजली. 1893-94 मध्ये प्रसिद्ध झालेल्या किपलिंग यांच्या कथेला रेखाचित्रांनी सजवलं होतं त्यांचे चित्रकार वडील जॉन किपलिंग यांनी.

मुंबईत असताना किपलिंग कुटुंब जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या परिसरात राहात होतं असं म्हटलं जातं. मध्य प्रदेशातल्या त्यांच्या सिओनी येथील जंगल भागावर बेतलेली काल्पनिक कहाणी लहान मुलांच्या भाविश्वात इतर प्राणीसृष्टीविषयी कुतूहल आणि ममत्वही निर्माण करते. त्यांच्या या कथेवर हिंदुस्थानी ‘पंचतंत्रा’तल्या गोष्टींचाही प्रभाव होता असंही म्हटलं जातं. रुडयार्ड किपलिंग यांचा आपल्या संस्कृतीशी असलेला परिचय लक्षात घेतला तर ते अशक्य नाही.

विख्यात लेखक पु. ल. देशपांडे इंग्लंडला गेले असताना एका बस प्रवासात त्यांना, महाराष्ट्रात साताऱ्याला काही काळ वास्तव्य केलेल्या इंग्लिश आजी भेटल्या ‘आपण मऱ्हाटी आहात का?’ असं विचारून त्यांनी पु. ल. आणि सुनीताबाईंना घरी येण्याचं आमंत्रण दिलं. दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्रजांना घालवणं क्रमप्राप्तच होतं, परंतु त्या काळात आलेल्या काही जणांचे आपल्या देशाशी कायमचे भावबंध जुळले. रुडयार्ड किपलिंग त्यापैकीच एक.

[email protected]