
>> नीलिमा ताटके
लहानपणी वार लावून जेवाव लागलं. इतरांच्या उपकारांवर जगावं लागलं तर माणूस ते दिवस शक्यतो विसरायचा प्रयत्न करतो. पण नुकतीच माझी गाठ अशा एका व्यक्तिमत्त्वाशी पडली ज्यांनी ही कृतज्ञता आयुष्यभर जपली. त्यांचे नाव आहे सदाशिव अच्युत मालशे. त्यांना हरिओम काका म्हणूनही ओळखतात. ते ग्रामीण भागातून पुण्यात आले. पुण्यात आल्यावरही ते दुसर्या कुटुंबात वाढले. त्यामुळे अनाथ मुलांचे प्रश्न काय असतात, ते शिक्षणात का मागे पडतात याची जाणीव त्यांना कायम राहिली. म्हणून नोकरीला लागल्यावर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा विद्याथ्र्यांना घरी जेवायला ठेवून घेतलं. ग्रामीण भागातील शालेय विद्याथ्र्यांना फी, पुस्तकं, वह्या द्यायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी मदत करणारे हात शोधले. या हातांनी त्यांना दानशूरपणे मदत केली. त्यामुळे त्यांच्या कामाची व्याप्ती वाढत गेली. ते अंध, अपंग, अनाथ, मतिमंदांसाठी काम करणार्या संस्थांच्या गरजा कशा पूर्ण होतील यासाठी समाजात वेगवेगळ्या मान्यवरांना भेटतात. आणि मदतीची विनंती करतात. अशावेळी अनेकदा मदत देणार्याचा पहिला प्रश्न असायचा की ज्या कामासाठी मदत देतो ती त्याच संस्थेला मिळेल ना? यासाठी मालशे यांनी आधी आणि नंतर संस्थांची माहिती घेतली. शिवाय संस्थांना मदत दिल्यावर ते नेहमी भेटी देतात. ज्या कामासाठी पैसे दिलेत तेच काम उभे राहिले आहे ना हे स्वत: बघतात. एक गोष्ट ते कटाक्षाने पाळतात की ज्या शाळांना सरकारी अनुदान मिळत नाही, ज्यांना खर्च भागवणे फार अवघड असते त्यांनाच मदत करतात.
करहे वागज येथे निवासी मूकबधिर विद्यालय आहे. या शाळेला त्यांनी वर्ग बांधून दिले, पिण्याच्या पाण्याची सोय केली. याशिवाय त्यांच्या पुनर्वसनासाठीही प्रयत्न सुरू आहेत. उरळी कांचनजवळ बोरीभडक येथील शाळेला वर्ग खोल्या बांधून दिल्या. स्वच्छतागृहे बांधली. पाण्याची सोय करून दिली आणि हे सगळं एक-दोन नाही तर साठ-सत्तर शाळांसाठी त्यांनी केले आहे. रत्नागिरी, चिपळूण येथील शाळांना संगणकांची गरज होती, तेही त्यांना मिळवून दिले. 2018 पासून त्यांनी एक वेगळाच उपक्रम सुरू केला आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना दिवाळी बोनस मिळत नाही, पण दिवाळी तर त्यांनाही आहेच. म्हणून हरिओम काका दानशूर व्यक्तींकडून पैसे जमा करून अशा शिक्षकांना देतात. मागच्या वर्षी 86 शिक्षकांना मदत दिली गेली. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे लग्नात अक्षता पायदळी तुडवल्या जातात. ते टाळण्यासाठी ते ज्या कुटुंबात लग्न आहे तेथील यजमानांची आणि वधूवरांची भेट घेऊन ते त्यांना या नासाडीबाबत अवगत करतात. त्यावर त्यांनी असा उपाय काढला आहे की, स्टेजवर जे लोक येतील ते चार अक्षता डोक्यावर टाकतील आणि जी रक्कम वाचेल ती संस्थेला मदत म्हणून द्यावी. या उपक्रमाला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. पण या कामासाठी त्यांना मनुष्यबळ हवे आहे. स्वत:च्या 75व्या वाढदिवशी ज्यांनी शिक्षणासाठी मदत केली त्यांचा त्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार केला. अनेकजण आपल्या वाढदिवसाला तुला करतात. त्या लोकांना भेटून काका त्यांच्याकडून मदत घेतात. नुकतीच त्यांनी आगळी वेगळी शालेय साहित्याची तुला करायची विनंती करून ती मदत विद्यार्थ्यांना दिली. आतापर्यंत 83 जणांनी तुला रुपाने त्यांना मदत केली आहे. मदतीचे आणखी हात त्यांना जोडले गेले तर त्यांचा कार्यवृक्ष आणखी बहरेल.





























































