आपली किल्ली सुरक्षित ठेवा

54

>> अमित घोडेकर

समाजमाध्यमांच्या प्रचंड विळख्यात आपला पासवर्ड कसा सुरक्षित ठेवायचा…?

फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, ई मेल, इंटरनेट बँकिंग, फ्लिपकार्ट, ऍमेझोन, झोमॅटो अशी कित्येक ऑप्लिकेशन आपण दररोज मोबाईल तसेच संगणकावर वापरत असतो. प्रत्येक ऑप्लिकेशनमध्ये एक गोष्ट लागतेच आणि ती म्हणजे पासवर्ड. कोणतीही ऑप्लिकेशन तुम्ही पासवर्डशिवाय वापरू शकत नाही. अगदी तुमचा मोबाईल किंवा संगणक जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हादेखील तुम्हाला सगळ्यात प्रथम तुमचा पासवर्ड टाकावा लागतो आणि मगच तुम्ही संगणकात प्रवेश करू शकता. हे म्हणजे आपल्या घरासारखंच आहे. घरात प्रवेश करताना आपल्याला कुलूप उघडावं लागतं, नंतर मग घरातील तिजोरी, चोरकप्पा आणि इतर अनेक गोष्टींसाठीदेखील आपल्याला कुलूप लावावे लागते आणि ते उघडण्यासाठी लागते ती म्हणजे ‘चावी’. आजच्या डिजिटल युगातील आपली चावी म्हणजे आपला पासवर्ड.

जर तुमच्या घरात अनेक गोष्टींना तुम्ही कुलूप लावले असेल तर तुम्हाला त्याची चावी शोधायला वेळ लागतो. असंच काहीसं आजकाल झालं आहे. सतराशे साठ मोबाईल ऑप्लिकेशनमध्ये आपण शेकडो वेगवेगळे पासवर्ड टाकतो आणि मग ज्या वेळेस एखाद्या ऑप्लिकेशनमधून काहीतरी व्यवहार करायचा असतो किंवा मोबाईल हरवल्यावर परत नवीन सुरुवात करायची असते तेव्हा आपल्याला पासवर्डच आठवत नाही. त्यात प्रत्येक ऑप्लिकेशनमध्ये पासवर्ड ठेवण्याची पद्धत वेगवेगळी असल्यामुळे बऱयाच वेळेस पासवर्ड सांभाळणे म्हणजे एखाद्या चक्रव्यूहात अडकण्यासारखं असतं, ज्यातून कधीही बाहेर पडता येत नाही आणि मग आपण पासवर्ड सांभाळताना अनेक चुका करतो, ज्याचा फायदा सायबर चोर घेतात.

एका अहवालानुसार, 2018 साली जगातील सगळ्यात जास्त वापरला जाणारा पासवर्ड होता 123456. त्यानंतर सगळ्यात जास्त PASSWORD हा शब्द पासवर्ड म्हणून वापरला गेला. त्यानंतर 12345678, नंतर ILOVEYOU. जिथे अवघड पासवर्ड वापरायला सांगितलं होतं, तिथे ! आणि त्यानंतर 10 पैकी 8 लोकांनी त्यांचा जन्मदिवस किंवा बायकोचा जन्मदिवस, मुलांचा वाढदिवस, त्यांचा घर क्रमांक किंवा अशी माहिती जी कोणीही थोडा अभ्यास केला तर सहज ओळखू शकेल अशी ठेवली आणि त्याचा जो व्हायचा तो परिणाम गेली कित्येक वर्षे होत आहे. दरवर्षी सायबर चोरांचं या अशा सोप्या पासवर्डमुळे खूपच फावलं आहे आणि मोठय़ा प्रमाणात सायबर चोरीच्या तक्रारी वाढल्या आहेत आणि यात खूप लोकांची फसवणूकदेखील झाली आहे.
भविष्यात आपण जेवढय़ा ऑप्लिकेशन वापरतो, त्यापेक्षा कित्येक अधिक अनेक ऑप्लिकेशन वापरणार आणि मग याचा गुंता वाढत जाणार. म्हणूनच की काय, स्टीव्ह जॉब्सने हे एका दशकापूर्वीच ओळखलं आणि त्याने थेट आयफोनच्या स्क्रीनवर एक बटन ठेवलं, जे तुमच्या बोटाचे बायोमेट्रिक वापरून तुम्हाला कोणतीही गोष्ट वापरायला परवानगी देत असे. पुढे ही पद्धत खूप लोकप्रिय झाली आणि आता तर चक्क फक्त मोबाईल समोर ठेवला तर तुमच्या चेहरा बघून मोबाईल चालू करून देतो. आजच्या घडीला सगळ्यात सुरक्षित पासवर्ड हा आहे, भलेही मग तुमचा मोबाईल कोणी चोरला तरी तो वापरू शकणार नाही. फेस डिटेक्शन, फिंगर पासवर्ड आणि डोळ्यांचा वेध घेऊन वापरलेले आयरिस पासवर्ड हे जगातील सगळ्यात सुरक्षित पासवर्ड आहेत आणि आता तर हे लॅपटॉपमध्येदेखील वापरले जाऊ शकतात.

आजकाल आपल्या संगणक किंवा मोबाईलमधील ऑण्टिव्हायरसमध्ये एक नवीन वैशिष्टय़ देण्यात आले आहे, ते म्हणजे पासवर्ड मॅनेजर. हे फीचर गुगल क्रोममध्येदेखील देण्यात आले आहे. याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे तुम्ही यात स्वतः किंवा स्वयंचलितपणे आपले पासवर्ड सेव्ह करू शकता. त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवायची झंझट राहत नाही, पण यातील सगळ्यात मोठा धोका म्हणजे जर चुकूनदेखील तुमच्या पासवर्ड मॅनेजरचा पासवर्ड चोराला गेला तर मात्र तुमच्या सगळ्या आर्थिक तसेच इतर सगळ्या ऑप्लिकेशनचा पासवर्ड सहज चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे आजकाल सायबर चोर पासवर्ड मॅनेजरवर लक्ष ठेवून असतात. आपले सगळे पासवर्ड कुठेतरी संगणकात सुरक्षित ठेवणेदेखील खूप चुकीचे आहे. जर तुमचं संगणक किंवा मोबाईल जर कोणी वापरला तर सहज तुमचा पासवर्ड कोणीही वापरू शकतो. त्यामुळे यातदेखील धोका आहे.

पासवर्ड सुरक्षित कसा ठेवाल –
जास्तीत जास्त बायोमेट्रिक पासवर्डचा वापर करा. फेस डिटेक्शन, फिंगर आणि आयरिस प्रणालीचा जास्तीत जास्त वापर मोबाईल आणि संगणकात करा. जिथे जिथे आर्थिक व्यवहार करत असाल, तिथे ओटीपी किंवा दुसऱया पासवर्डचा वापर करा.
एकदा वापरलेला पासवर्ड परत दुसऱयांदा वापरू नका.
जन्मतारीख, मुलांचे नाव किंवा घर क्रमांक किंवा सहज ओळखू येऊ शकतील असे पासवर्ड वापरू नका.
बँक खाते, ईमेल, मोबाईल ऑप्लिकेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पासवर्ड वापरा.
पासवर्ड मॅनेजर वापरत असाल तर त्याचा पासवर्ड अतिशय अवघड आणि फक्त तुम्हाला माहीत असेल असाच पासवर्ड ठेवा.
वेळोवेळी तुमचा पासवर्ड बदलत रहा.

आपली प्रतिक्रिया द्या