
>> वैजयंती कुलकर्णी
समर्थ रामदासांनी आपल्या कार्याने महाराष्ट्रधर्म वाढविला. सर्वसामान्य जनतेत भक्तिमार्गातून शक्तीच्या उपासनेचा, संघटित होण्याचा मूलमंत्र दिला. श्री मारुतीच्या उपासनेतून त्या काळातील समाजाला शरीरस्वास्थ्याचा मार्गही दाखविला. समर्थांचा ‘दासबोध’ हा ग्रंथ म्हणजे विविध विषयांवरील तत्त्वचिंतनांचे मराठी भाषेतील साहित्याचे अमोल लेणे आहे. समर्थांनी या आध्यात्मिक ग्रंथाचे लेखन निबीड अरण्यातील शिवथरघळ सुंदर मठात निसर्गाच्या सान्निध्यात केले आहे. समर्थांच्या ‘दासबोध’ आणि जुन्या ‘दासबोधा’त त्यांच्या या निसर्ग प्रेमाची प्रचीती येते. समर्थांनी लोकजागरणांसाठी सामाजिक प्रबोधन केले. देशभरात अकराशे मठांची स्थापना करून श्रीरामाच्या उपासनेचा पंथ विस्तारित केला. समर्थ संन्यासी होते, निर्मोही होते. लोककल्याण हेच त्यांचे जीवनध्येय होते. पण सर्वस्वाचा त्याग करून संन्यासी झालेल्या समर्थांना निसर्गलावण्याची प्रचंड ओढ होती. दासबोधाचे लेखन करतानाही ते एकरूप, समरूप झाले होते.
चाफळच्या खोऱ्यात असताना त्यांचे वास्तव्य बहुतांश काळ जंगलात, झाडाझुडपात असे. डेरवणच्या डोंगरघळीत, वाघापूरच्या सड्यावर, भैरवगडच्या घळीत, चंद्रपूरच्या डोंगरावर आणि कळंब्याच्या घळीत ते एकांतवासात चिंतन करीत. एकांतवास प्रिय असलेल्या समर्थांनी चाफळला श्रीराममंदिराची बांधणी स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतली. अकरा मारुतींची स्थापना केली. त्यांनी स्थापन केलेल्या मठांत रामनवमी, हनुमान जयंती असे उत्सव होत, पण समर्थ मात्र ‘दास डोंगरी राहतो’ असे सांगत. निर्जन घळी आपला बहुतेक काळ वास्तव्य करीत. समर्थ म्हणतात –
‘अखंड एकांत सेवावा। अभ्यासची करीत जावा
काळ सार्थकची करावा । जनासहित ।।
दास डोंगरी राहतो । यात्रा देवाची पाहतो ।
देव भक्तासवे जातो । ध्यान रूपें ।।’
पुढे समर्थांनी शिवथर घळीत राहून दासबोधाचे लेखन केले. हा निसर्गरम्य, वनसृष्टीने लपेटलेला परिसर त्यांना विशेष आवडत असे. या घळीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात –
‘गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनी चालिली बळें ।
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळें ।
गर्जती मेघ तो सिंधू। ध्वनिकल्लोळ उठीला ।
कड्याशी आडळे धारा । वात आर्क्त होतसे ।
तुशार उठती रेणू । दुसरे रज मातले ।
वात मिश्रीत ते रेणू । सीत मिश्रित धुकटे ।।’
निसर्गाचे ते पूजक होते. निसर्गाचे हे रूप म्हणजे त्यांना मूर्तरूप वाटत असे. पक्ष्यांची सुमधूर गीते, वादळ संगीत, कोसळणाऱ्या पावसाच्या धारा, हिरवीगार वनराई, यात त्यांना संगीताची प्रचीती येत असे.
समर्थ रामदासांनी हिंदुस्थानच्या केलेल्या परिक्रमेत अनेक निबीड जंगल पाहिली. त्यांना जंगलातल्या वृक्ष, वेली आणि फुलांचे औषधी गुणही माहिती होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीनुसार त्यांनी परळीच्या किल्ल्यावर वास्तव्य केले. तोच हा सज्जनगड. समर्थ संप्रदायाचे मुख्य केंद्र झाले. सज्जनगडावर मठाची स्थापना केल्यावर उद्यान, बाग त्यांनी आपल्या देखरेखीखाली तयार करून घेतली. सुंदर मंदिरे आणि मंदिराचा परिसर कसा असावा हे सांगणाऱ्या समर्थांनी बागेच्या रचनेचा सांगितलेला तपशील वाचल्यावर त्यांच्या निसर्गप्रेमाची प्रचीती येते. जुन्या ‘दासबोधा’त असलेल्या ‘बागप्रकरण’ या शीर्षकाखाली त्यांनी लिहिलेल्या अठ्ठावीस ओव्या म्हणजे फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती, भाज्या या साऱ्या वनस्पतीच्या गुणांची साक्षच होय.
प्रसन्न निघाला स्वभावे। बागेमध्ये काय लावावे।
म्हणूनी घेतली नावे । काही एक ।
असा प्रारंभ करीत समर्थांनी बागेत लावावयाच्या फळा-फुलांची नावे सांगितली आहेत. ही झाडे कशी कुठे लावावीत हेही त्यांनी सांगितल्याने बागसंवर्धन आणि बागसंरक्षण या व्यवस्थापनाचेही सूत्र त्यांनी ‘बनकटी प्रकरणात’ सांगितले आहे. भुईचाफा, नागचाफा, मोगरा, बट मोगरा, जाई-जुई, शेवंती-मालती बकुळी, मखमल, दवणा, विविध रंगांची जास्वंद, विविध रंगांची कमळे याबरोबरच तुळस, बेलफळ या देवपूजेसाठी लागणाऱ्या झाडांचाही समावेश बागेसाठीच केला आहे. तळबं, गोरक्षचिंच, फणस, चिंच, पपई, वड-पिंपळ, उंबर, आंबा, लिंबू, साखरलिंबू, डाळिंब, केळी, नारळ, पोफळी, जांभूळ, आवळा ही फळे देणारी झाडे बागेत असायला हवीत असे ते सांगतात. वेत, कळकी, शिवारी, पानवेल, गुळवेल अशा वेलींचाही उल्लेख ते करतात. बागेच्या भोवती निवडुंग, कावेटी, काटेशिवरी, पांगेरा, निर्गुडी, करवंदीची झाडे लावावीत. म्हणजे बागेतल्या वृक्षसंपदेचे जतन करता येते असं समर्थांचे म्हणणे आहे. इतक्या उपयुक्त वनस्पतींची माहिती सांगून शेवटी समर्थ सांगतात
अठराभार वनस्पती । नामें सांगवि किती ।
अल्प बोललो श्रोती । क्षमा केली पाहिजे ।।
समर्थ लोककल्याणकारी संत होतेच, पण ते थोर निसर्गप्रेमी, निसर्गपूजक आणि निसर्गाच्या सौंदर्यात आनंद, समाधान मानणारेही होते. निसर्ग हाच त्यांचा देव आणि गुरूही होता.




























































