नेकी कर दर्यामें डाल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> समीर चौघुले (अभिनेता)

लॉकडाऊन काळात मुलाखती घेण्याचे अनेक पेव फुटले होते. त्यावेळी मीही अनेक मुलाखती दिल्या. पण मी केवळ मुलाखती न देता त्याचा मोबदला घेत होतो. पण तो माझ्यासाठी नव्हे तर माझ्या बॅकस्टेज कलाकार बंधूंसाठी घेत होतो. मग ते पैसे शंभर वगैरे असतील तरी चालतील. तरच मी तुम्हाला लाइव्ह मुलाखत देतो. मग अशी अनेकांनी मदत केली. लॉकडाऊनमध्ये अनेक मुलाखती घेतल्या जायच्या किंवा काही कार्यक्रम करायचो. नाटय़वाचन केले जायचे तर ते फुकट करण्यापेक्षा त्याच्याऐवजी तुम्ही जे काही मोल द्याल ते नाटय़ परिषद संस्थेला द्या.

नाटय़ परिषदेने जे नंबर दिले होते त्याच्यावर पैसे ट्रान्स्फर करायला सांगायचो. अनेक लोकांनी ते केले होते. तेवढं तर आपण घरच्या घरी करूच शकतो. बाहेर पडत नसल्यामुळे घरबसल्या काय करायचे तर असे कार्यक्रम, मुलाखती करून जे काही पाचशे तर पाचशे, हजार तर हजार जे काही असेल ते मदत करायला सांगायचो. कारण यादरम्यान आमचे नाटकातले काही कलाकार आहेत, बॅकस्टेज कलाकार आहेत त्यांची सगळ्यांची घरं बंद होती. अजूनही नाटय़क्षेत्र बंद आहे. अशा वेळी नाटय़ परिषदेने नंबर दिला होता त्यामुळे थोडा पुढाकार घेऊन मी केलं होतं. मग ज्यांना कळत होते ते कार्यक्रम द्यायचे. त्यात मी परदेशातले पण दोन लाइव्ह शो केले. त्यांनीही काही चांगले पैसे दिले. हे मी माझ्या समाधानासाठी आणि कर्तव्य म्हणून करत होतो. शिवाय केवळ असे न करता आम्हीही दोन-चार ठिकाणी आम्हाला शक्य झाली तेवढी मदत केलेली आहे.

या काळात मला एक अतिशय छान अभिप्राय मिळाला होता. छाया जोशी नावाच्या महिलेने आम्हाला व्हॉटस् ऍपवर मेसेज केला होता की, त्यांना कोरोना झाला होता. त्या एका वॉर्डला ऍडमिट होत्या. दिवसभर काय करायचे या विचाराने दोन-तीन दिवसांनी त्या हास्यजत्रा पाहायला लागल्या. त्या हास्यजत्रेचे एपिसोड बघून एकटय़ाच हसत होत्या तर शेजारच्या खॉटवर असलेल्या महिलेने विचारले काय बघून हसताय. तर त्यांनी त्यांचा नंबर घेऊन त्यावर ती लिंक पाठवली.

हळूहळू संपूर्ण वॉर्ड हास्यजत्रा पाहत होता. सगळे खळखळून हसायचो. संध्याकाळी एकमेकांशी गप्पा मारायचो. त्या वेळेला छान हे बघितलं का, ते बघितलं का यावर चर्चा करायचे. त्यावेळी डॉ. म्हणाले, असे जर रुग्ण आनंदी राहत असतील तर दहा दिवसांच्या आतच घरी जातील. मला वाटतं ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.