आभाळमाया – संजीवक तारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक 

वयाच्या पन्नाशीला आलेला आपला सूर्य हा आपल्याला दिवसा आणि रात्रीच्याही आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांमधला सर्वात तेजस्वी तारा. त्याच्या सुमारे दहा अब्ज वर्षांच्या आयुष्यापैकी पाच संपली म्हणूत तो माणसाच्या शतायुष्याच्या हिशेबात पन्नाशीला आला असं म्हणायचं. एरवी त्याचा तेजतर्रार ‘स्वभाव’ तसाच आहे. तो पूर्वीसारखाच ऊर्जेचा अखंड स्रोत म्हणून काम करतोय. प्रकाशाच्या रूपात सूर्य निर्माण करणारी ऊर्जा मंदावली तर आपल्या पृथ्वीचा बर्फाचा गोळा होईल आणि कदाचित अतिसूक्ष्म जीवांपलीकडे त्यावर कोणतीही जीवसृष्टी राहणार नाही.

सूर्यानंतर काही कोटी वर्षांनी पृथ्वीचा जन्म झाला. या निळय़ा ग्रहाचं वयसुद्धा 4 अब्ज 60 कोटी वर्षांचं आहे. सूर्य कायमचा ‘अस्ता’ला जाण्यापूर्वीच पृथ्वीही त्याच्या प्रसरण होणाऱ्या रूपात बुडून जाणार. म्हणजे साधारण पाच अब्ज वर्षांपूर्वीच ही प्रक्रिया सुरू होऊन पृथ्वी आणि इतर ग्रह (त्यातही मंगळापर्यंतचे अधिक) ‘वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा’ या तत्त्वानुसार ‘संपून’ जातील. म्हणजे आजच्या स्वरूपात असणार नाहीत. सूर्यसुद्धा नंतर श्वेत खुजा होईल.

मात्र त्याला प्रचंड काळ जावा लागेल. तेवढा विचार आताच करून टेन्शन घेण्याचं गरज नाही. सध्या आपल्याच कर्माने होत असलेल्या ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला कसा आळा घालायचा, हा यक्षप्रश्न आहे आणि त्याचा लक्ष्यभेद करण्याची नुसती चर्चा होतेय. या वॉर्मिंगबद्दल जाणून घेणं हा वेगळा प्रदूषणाधारित विषय आहे, पण सूर्याची नेमकी किती आणि कशी ऊर्जा आपल्याला मिळते ते वैज्ञानिक पद्धतीने जाणून घेणं महत्त्वाचं.

आपल्या तेजोनिधी सूर्यगोलकाची त्रिज्या 6 लाख 96 हजार किलोमीटर आहे. म्हणजे सूर्याच्या व्यासावर सलग 109 पृथ्वींची रांग आरामात सामावेल! एवढय़ा प्रचंड विस्ताराचा सूर्य ही एक अफाट ऊर्जा निर्मिती करणारी नैसर्गिक ‘अणुभट्टी’ आहे. सूर्याचं पृष्ठभागावरचं तापमान सुमारे 5500 सेल्सिअस इतकं असतं. त्यावरील काळय़ा डागांच्या भागात (सन स्पॉटस्) ते साडेतीन हजारांपर्यंत घसरलं तरी तेही भस्मसात करायला पुरेसं आहेच, परंतु त्याच्या गाभ्यातील तापमान अतिप्रचंड म्हणजे 14 कोटी सेल्सिअस (खरं तर केल्विन) इतकं असतं. तिथे अब्जावधी टन हायड्रोजन वायू ‘कोंडलेला’ आहे. त्याचं अणु प्रक्रियेतील ‘फ्यूझन’ म्हणजे सम्मीलन पद्धतीने ज्वलन होऊन हायड्रोजनचं हिलियम वायूत रूपांतर होतो. यामध्ये प्रचंड ऊर्जा तयार होऊन निर्माण झालेली उष्णता सूर्याला सतत निखाऱ्यासारखी जाळते आणि त्यातूनच उजळत ठेवते. अर्थात ‘फ्यूझन’ प्रक्रियेत आपण म्हणतो त्या अर्थाने ज्वलन होत नसतं, पण अणुगर्भ सम्मीलनातून निर्माण होणारी अफाट ऊर्जा ‘प्रकाश’ निर्माण करते. सूर्याच्या गर्भात तयार झालेला ‘प्रकाशकण’ आजूबाजूच्या तप्त वायूंच्या घनतेमुळे सारखा अडखळतो. ‘गहूभर पुढे नि तिळभर मागे’ अशी त्याची धडपड चाल किंवा रॅन्डम वॉक करत तो सूर्याच्या पृष्ठभागावर यायलाच दहा लाख वर्षे लागतात. तिथून मग तो सुसाट सुटतो आणि 15 कोटी किलोमीटरचं अंतर पार करून आपल्याला पृथ्वीवर स्पर्श करतो. थोडक्यात, सूर्य निर्माण करतो ती ऊर्जा थर्मोन्यूक्लिअर प्रक्रियेतून (औष्णिक) तयार होते. ती पृथ्वीवर येते प्रकाशाच्या रूपात. आपण एखादी ज्वलनशील गोष्ट पृथ्वीवर पाहतो ती कालांतराने ऊर्जा संपून थंड होते. धगधगणारी निखाऱ्यांची शेगडी नंतर मंदावत जाते. सूर्याच्या गाभ्यातील अणुभट्टी मात्र सहजासहजी कमी होणारी नाही. तेथील अणुसम्मीलन प्रक्रियेत अब्जावधी वर्षे पुरेल एवढा साठा आहे. शिवाय, त्यात ऊर्जा निर्मितीचा एक समतोल (हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम) असल्याने त्याची ऊर्जा निर्मिती अखंड सुरू राहणार आणि आपल्याला सूर्यप्रकाश मिळतच राहणार.

आपल्या जीवसृष्टीच्या जन्मासाठी आणि संवर्धनासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे. सूर्य नसेल तर ग्रहमालेला अस्तित्व असलं तरी अर्थ नसेल. त्यामुळे इतर गॅलॅक्सी पिंवा दीर्घिकांमध्ये असलेल्या सूर्यासारख्या ताऱ्यांभोवतीच्या ग्रहमालिकांचा अभ्यास करताना तिथे पृथ्वीसारखी जीवसृष्टीला ‘जन्म’ देऊ शकणारी परिस्थिती (हॅबिटेबल झोन) आहे का, तेही तपासावं लागतं. अशा ग्रहमाला अनेक ‘सूर्यांभोवती’ आढळल्या आहेत. मात्र त्यातल्या एखाद्या ग्रहाला आपल्यासारखा ‘संजीवन’ वर मिळालेला आढळत नाही. हे आपल्या सूर्याचं नि पृथ्वीचं नातं! पुढच्या भागात सूर्याच्या ‘शिळय़ा-ताज्या’ प्रकाशाविषयी आणखी रंजक माहिती घेऊ.

 [email protected]