महिलांची प्रेरणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

केसांना अनुभवाची चंदेरी महिरप आल्याशिवाय राजकारणात मोठय़ा पदापर्यंत जाता येत नाही हे आपले तसे जुनेजाणते आणि आवडते मत. हिंदुस्थानात तर साठोत्तरी नेत्यांची परंपरा आहे. त्यामुळे एका तरुणीने देश चालवावा ही कल्पना फारशी रुचणारी नाही. ज्या वयात कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्याचे शहाणपणही पुरेसे आलेले नसते, जे वय प्रगल्भतेच्या व्याख्येत मोडत नाही अशा वयात एक स्त्री देश कसा सांभाळणार, हा प्रश्न अनेकांच्या मनात सना मरीन यांनी फिनलँडच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा तरळून गेला असेल.

एक 34 वर्षीय तरुणी देश सांभाळते हा नाही म्हटलं तरी कुतूहलाचा विषय आहे. तिच्या कर्तृत्वाच्या बाबतीत भले भविष्यात बोलता येईल, मात्र जगभरातील सगळ्या स्त्रियांना अभिमानाने मान ताठ करायला लावणारी ही घटना आहे. राजकारणामध्ये येऊ पाहणाऱ्या अनेक स्त्रियांसाठी ही प्रेरणादायी घटना आहे. सना (जन्म 19 नोव्हेंबर 1985, हेलसिंकी शहर, फिनलंड) ही कर्तबगार तरुण स्त्री राजकारणाबाबत कमालीची जागरुक आहे. त्यांनी 2012 मध्ये ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली. त्याच वर्षी म्हणजे वयाच्या 27 व्या वर्षी राजकारणामध्ये पाऊल ठेवले. राजकारण हे देशाला, देशातील नागरिकांना विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारे अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे याची पूर्ण कल्पना सना यांना आहे. 2012 मध्ये पहिल्यांदा नगर परिषदेची निवडणूक टेम्पर येथून त्या जिंकल्या. नंतर त्यांनी 2013 ते 17 या काळात महापौर म्हणून काम पाहिले. 2015 मध्ये त्यांनी फिनलंडच्या संसदेमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला. 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पक्षाला मताधिक्य मिळाले. एन्टी रिने पंतप्रधान झाले आणि सना मरीन या वाहतूक आणि संपर्क मंत्री झाल्या. मात्र रिने यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षामध्ये नवीन चेहऱयाचा शोध सुरू झाला आणि त्यावेळी सना मरीन यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे सोपवली गेली. राष्ट्रभक्ती, कामाचा उरक, आक्रमक कार्यशैली, सडेतोड स्वभाव, स्पष्टवत्तेपणा या नेतृत्वगुणांमुळे सना अल्पावधीतच देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकल्या. काम करण्याचा झपाटा आणि सडेतोड स्वभाव यामुळे महिला असण्याचा त्यांना कधी त्रास झाला नाही. तरीही हिंदुस्थानप्रमाणेच जगभरातल्या लोकांच्या मनात शंका आहेतच. एकदा एका पत्रकाराने त्यांना याविषयी छेडलं तेव्हा सना म्हणाल्या, ‘‘मी माझ्या स्री असण्याचा, तरुण असण्याचा विचार करत नाही. माझ्या लेखी त्याला महत्त्व नाही. ज्यावर लोकांनी विश्वास ठेवून आम्हाला मतं दिली, आम्हाला निवडून दिलं त्या मुद्दय़ांना धरून काम करणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे!’’ सना यांच्या या व्यापक दृष्टिकोनाची आणि उदार मतांची पाळेमुळे फिनलँड येथील शिक्षण व्यवस्थेत आहेत. संपूर्ण देशाने एका नव्या दमाच्या उत्साही चेहऱयाला दिलेली संधी हे तेथील नागरिकांच्या प्रगल्भतेचे लक्षण मानले जावे. फिनलँड हा नागरी हक्कांबाबत जागरुक देश आहे. विद्यार्थीकेंद्रित शिक्षणासाठी तो प्रसिद्ध आहे. कोणत्याही देशाची जडणघडण ही तेथील शिक्षण व्यवस्थेचा परिणाम असते असे मानले तर सना यांची भूमिका आणि फिनलँडच्या नागरिकांची प्रगल्भता याचे उत्तर मिळते.

राज्यकर्ती स्त्री हिंदुस्थानसाठी नवीन नाही. हिंदुस्थानमध्ये महिला नेतृत्वाचा पायंडा 50 वर्षांपूर्वीच पोलादी स्त्री, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घालून दिला आहे. राजकारणावर पुरुषी वर्चस्व असूनही आक्रमक स्वभाव, आत्मविश्वास आणि प्रखर देशनिष्ठा या जोरावर इंदिराजींनी दीर्घकाळ राज्य केले. अर्थात इंदिराजींच्या नेतृत्वामुळे देशाच्या राजकारणामध्ये महिलांची संख्या लक्षणीय वाढण्याची अपेक्षा होती ती मात्र फारशी पूर्ण झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. 33 टक्के आरक्षणामुळे जरूर काही महिला राजकारणात आल्या. मात्र त्यांच्याआडून त्यांचे पतिदेव कारभार सांभाळतात हे उघड गुपित आहे. फिनलँडमध्ये त्यामानाने उशिरा महिलाराज सुरू झाले आहे. तब्बल 50 वर्षांनंतर तिथे महिला स्वातंत्र्याचा सूर्य उगवला.

या पार्श्वभूमीवर गेल्या पन्नास वर्षांमध्ये फिनलँडने राजकारणातील महिलांच्या सहभागावर सातत्यपूर्ण काम केले आहे. सना मरीन या त्यांच्या देशातील एकमेव राजकारणी स्त्री नाहीत. तेथील आघाडी पक्षात सामील असलेल्या पाच पक्षांपैकी चार पक्षांच्या प्रमुख महिला आहेत आणि त्याही 32-34 वर्षे या वयोगटातील. त्यामानाने हिंदुस्थानचा इतिहास उज्ज्वल असला तरी वर्तमान फारसे आशादायी नाही असे खेदाने म्हणावे लागेल. सना यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘‘देशाची 50 टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांना त्यांच्या हक्कांबाबत, अधिकारांबाबत जागरुक राहण्यासाठी राजकारणातील सहभाग हाच एक पर्याय आहे.’’ बुद्धी, तर्क आणि संवेदना या त्रयीमुळे देश शाश्वत विकासाच्या दिशेने प्रयत्न करू शकतो. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानसारख्या देशांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

[email protected]