
>> आसावरी जोशी
सुंदर… रुबाबदार… नितांत माधुर्य असलेली आपली संस्कृत भाषा. खरे पाहता अगदी सोपी… सहजच वाचा शुद्ध करणारी. 14 ऑगस्ट रोजी असलेल्या संस्कृत दिनानिमित्त आपल्या भाषेच्या काही रंजक गोष्टी
तिन्हीसांजेला अजूनही घराघरात शुभंकरोती म्हटले जाते. संस्कृतातातील त्या चार मधुर ओळी मावळतीची हुरहुर कमी करून दीपज्योतीच्या तेजाने सारा आसमंत आणि आपले मनही उजळून टाकतात.
रावणाने संस्कृतमध्ये रचलेले शिवतांडव स्तोत्र. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवमंदिराचा गाभारा भारून आणि भरून उरतेच. पण याच संस्कृत शब्दांनी आजच्या आधुनिक संगीतकारांनाही भुरळ घातली आहे. बऱयाच तरुणाईच्या फोनची रिंगटोन ही शिवतांडव स्तोत्र आहे.
संस्कृतमधील गायत्री मंत्र येता जाता सहजच म्हणताना मी अनेकांना पाहिले आहे. अर्थ समजत नसतानाही अनेक संस्कृत स्तोत्रं, श्लोक म्हटले जातात. वाचले जातात. बाप्पाचे धीरगंभीर अथर्वशीर्ष तर प्रत्येकालाच हवेहवेसे. या साऱया भक्तीची, तरल संवेदनांची, आर्ततेची अभिव्यक्ती अजूनही आपल्या मधुर, सुंदर, अभिजात संस्कृत भाषेतून होते.
मग तरीही या रुबाबदार भाषेविषयी अनाठायी भीती, आकस, फटकून राहण्याची वृत्ती… असे का?
आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीचा सर्वात प्राचीन, समृद्ध आणि अभिजात वारसा आपल्या लयबद्ध बोलीतून सहजच अभिव्यक्त करणारी आपली संस्कृत भाषा. येत्या बुधवारी 14 ऑगस्टला संस्कृत भाषा दिन आहे. काय आहे, आज आपल्या या भाषेची सद्यस्थिती आणि तिचे खरे आपल्या संस्कृतीतील स्थान.
अनेक अर्थपूर्ण सुभाषितांनी ही भाषा सजलेली आहे. व्याकरणतज्ञ पाणिनीने आपल्या ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथातून संस्कृत भाषेला प्रमाणित केले. तिच्यातील अनेक शब्द हिंदुस्थानी भाषांमध्ये जसेच्या तसे आपण वापरतो. संस्कृतमधूनच उत्तर हिंदुस्थानी भाषा जन्मल्या आहेत.
संस्कृत अर्थात गीर्वाण वाणी ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. महाकवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी मानले जातात. त्यांचे रामायण हे महाकाव्य संस्कृतातून रचले आहे.
ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख, आणि जैन धर्माच्या उपासनेची भाषा आहे. हिंदुस्थानच्या 23 शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला विशेष महत्त्व आहे.
एका शब्दाला अक्षरशः असंख्य प्रतिशब्द केवळ संस्कृतमधूनच सापडतात. उदाहरणार्थ स्त्री या एका शब्दाला नारी, वामा, योषिता असे कितीतरी शब्द सापडतील. शिवाय हा प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आणि स्त्रीचे स्थान, दर्जा दर्शविणारा आहे.
आपल्याकडे संस्कृतचा प्रसार करणाऱ्या आनंद पत्रिका- नियतकालिक, सज्जनगड- वेदपाठशाला, कालिदास संस्कृत विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था- पुणे
देववाणी, सुरभारती, देविवाक, देवभाषा, अमरभारती, संस्कृत, सरस्वती लिपी अशी अनेक नावे आहेत.
ही खरी आपल्या देशाची अध्ययनाची भाषा. जेव्हा आपल्याकडे राष्ट्रभाषा कोणती ठेवावी, हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा एका फ्रेंच तत्त्वज्ञाने आपल्याला सांगितले की, तुम्ही भाषेचा वाद विनाकारण घालत आहात. संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषाच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी असे वाटे.
संस्कृतची प्राचीन लिपी ही सरस्वती होती, मग ती ब्राम्ही झाली आणि आता ती देवनागरी आहे. तरीही आपल्याकडे अजूनही काही ग्रंथांत रोमन लिपीत संस्कृत लिहिली जाते.
संस्कृत वाक्यात शब्द कोठेही असला तरी अर्थ बदलत नाही. उदा. रामः आम्रं खादति. हे वाक्य कसेही लिहिले तरी ते बरोबरच असते. पण जेव्हा इंग्रजीमधून rama eats mango ऐवजी mango eats rama असे होते तेव्हा त्याचा अर्थ आमुलाग्र बदलतो.
सध्या आपल्याकडे संस्कृत भाषेची विनाकारण पीछेहाट झाली आहे. लोक संस्कृत भाषा शिकण्याचा किंवा जाणून घेण्याचाही प्रयत्न करीत नाही.
आज शिक्षणाची, जगाची भाषा इंग्रजी आहे. त्याआधी ते स्थान संस्कृतचे होते. संस्कृत ही कधीही एका विशिष्ट वर्गाची मत्तेदारी नव्हती. ती जनभाषा होती. रामायणाचे रचयिते वाल्मीकी पारधी होते. भवभूतीच्या नाटकांमध्ये तर ती जत्रेत सादर केली जात असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. जत्रेतील प्रेक्षक हा सर्वसामान्यच असतो. सर्व थरांतील असतो.
अजूनही आयुर्वेदाचा अभ्यास संस्कृतातूनच करावा लागतो. जर्मन, डच, इंग्रजांनी संस्कृत भाषा जाणीवपूर्वक शिकून घेतलेली दिसते. व्हिएन्ना, फ्रान्स येथे आजही संस्कृत भाषेचा अभ्यास केला जातो.
आपल्याकडील प्राच्यविद्याकार संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी जर्मनीला गेले असता हिटलरने त्यांना ऐकविले होते. स्वतःची विद्या शिकण्यासाठी तुम्हाला परदेशात यावे लागते यासारखी अपमानास्पद गोष्ट कोणती!
आज अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये संस्कृतचा अभ्यास केला जातो; पण आपल्याकडे मात्र तिला ठरावीक समुदायाचे रंग देऊन हेतूपुरस्सर डावलेले जाते.
ध्वनिमाधुर्य हे तिचे आणि ग्रीक भाषेचे वैशिष्टय़. म्हणूनच श्लोक, आर्या कानाला मधुर वाटतात.
हिटलरच्या या वाक्याचा आपल्यापैकी प्रत्येकाने विचार करायला हवा. आपण हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे कधी सोडणार? अजूनही आपले असंख्य ज्ञानग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. जेव्हा ते अभ्यासासाठी सामान्यांकडून हाताळले जातील तेव्हा त्यांचा खऱया अर्थाने प्रसार होईल. वाचाशुद्धीसाठी, संस्कारांसाठी संस्कृतहून सुयोग्य भाषा ती कोणती! आपले वैभव जपणे आपल्याच हाती असते. आपली ही देशाची संस्कृती राखायची की काळाच्या पडद्याआड झाकोळून टाकायची हे आपणच ठरवायला हवे..

























































