प्रेमळ संत ‘भायजी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य 

माणूस आणि प्राणी या दोहोंवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या श्रीभायजी महाराजांच्या दानशूर वृत्तीचा परिचय करून देणारा हा लेख.

विदर्भाची पंढरी’ म्हणून सर्वदूर ख्यातकीर्त असलेले ‘श्रीक्षेत्र शेगांव’ ज्यांच्या वास्तव्य आणि अवतारकार्यामुळे अध्यात्मजगताचे लक्ष वेधते झाले ते संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराज ‘म्हैसांग’ या गावी आले असतानाचा हा प्रसंग. भक्तमंडळींच्या आग्रहाखातर श्रीमहाराजांचे पंचक्रोशीतील अनेकविध गावांमध्ये अनेकदा जाणे होत असे, तर कधी मुक्कामही होत असे. अशातच श्रीमहाराजांचे म्हैसांग येथे आगमन झाले असता त्यांच्या दर्शनार्थ हजारो भक्तगणांची झुंबड उडाली.

एका डेरेदार वृक्षाखाली ठेवलेल्या बाजेवर श्रीगजानन महाराज स्वानंदी निमग्न बसले होते. कुण्या भक्ताने त्यांच्या वस्त्रविहिन देहावर प्रेमळपणे अंगरखा घातला, मात्र श्रीमहाराजांकरिता ते जाणिवेच्याही पलीकडले होते, चेहऱ्यावर अपार प्रसन्नता असलेली ती श्रीमहाराजांची वात्सल्यमूर्ती पाहून आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून भक्तमंडळी कृतार्थ भावनेने माघारी परतत होती. मात्र काही काळानंतर, देहभान हरवलेल्या श्रीमहाराजांनी डोळे उघडले. श्रीमहाराजांची दृष्टी गर्दीत उभ्या असलेल्या एका तरुणावर स्थिरावली तशी त्यांनी हाताच्या इशाऱ्यानेच त्या व्यक्तीला आपल्यापाशी बोलावले.

उंचापुरा, बांधेसूद आणि अतिशय देखणा असा तो तरुण श्रीमहाराजांपाशी आला अन् त्यांच्या चरणांस वंदन करता झाला. श्रीमहाराज त्याच्याकडे पाहात राहिले. श्रीमहाराजांच्या चेहऱ्यावर वात्सल्यभाव प्रकटले होते. त्यांनी त्या तरुणाचे मस्तक कुरवाळले, आणि एकाएकी कुण्या भक्ताने त्यांच्या देहावर पांघरलेला लाल रेशमी अंगरखा काढला आणि त्या तरुणाच्या हाती सोपवला. त्या तरुणाच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पसरला होता. अवतीभवतीची मंडळी आश्चर्यचकित होऊन हे दृश्य पाहती झाली. त्या तरुणाने तिथेच त्याचवेळी त्याच्या अंगावरील सदरा काढला आणि प्रसादरूपाने मिळालेला अंगरखा चढवला. श्रीमहाराजांना वंदन करून तो तरुण समाधानाने माघारी परतला. श्रीगजानन महाराजांनी परिधान केलेला, स्वहस्ते दिलेला अंगरखा आयुष्यभर अभिमानाने मिरविणारा आणि देहत्याग करतेवेळी तोच अंगरखा धारण करणारा हा तरुण म्हणजेच कालांतराने पुढे प्रसिद्धीस आलेले संतसत्पुरुष श्रीभायजी महाराज.

भायजी बाळकृष्ण तिडके नावाचा शुक्ल यजुर्वेदी शाखेचा हा घरंदाज ब्राह्मण गृहस्थ अध्यात्माची अनवट व अनघड वाट धुंडाळत पुढे ‘श्रीभायजी महाराज’ कसे झाले आणि अनेक भाविकांसाठी ‘आदर्श सत्पुरुष’ कसे ठरले त्याला वर उल्लेखलेला प्रसंग कारणीभूत होता. वाशिम जिह्यातील मंगरूळनाथ (मंगरुळपीर) तालुक्यातील तऱ्हाळे गावी जन्मलेले भायजी सधन, घरंदाज, शालीन होते. पित्याचे छत्र हरपले तरीही आईने भायजीबाळास ददात पडू दिली नाही.

घर सुखवस्तू होते तरीही भायजींची वृत्ती उदासीन होती आणि मन सतत विरक्तीकडे ओढ घेत होते. बालपणापासूनच ‘दानशूरते’चा वसा घेतलेले भायजी ‘कर्णा’लाही हेवा वाटावा अशा रितीने दानधर्म करीत असत. गावातील फकीरबुवांच्या सूचनेनुसार भायजी ‘भरतभेट आणि रावणदहन’ हे दोन सोहळे मोठय़ा प्रमाणात साजरे करू लागले. या निमित्ताने अन्नदानाला महापूर येत असे. याच दरम्यान भायजींना बार्शीटाकळी येथील सत्पुरुष गोविंदबुवा टाकळीकर यांचा अनुग्रह प्राप्त झाला. ‘लौकिक सुखाचा त्याग करून भविष्यात केवळ दानधर्म व अन्नदान करीत राहावे. श्रीरामकृपेने तुम्हांस कसलीही कमतरता भासणार नाही’ असे गोविंदबुवांनी भायजींना ठामपणे सांगितले.

गुरुसंकेतानुसार भायजी पुढे सर्व यात्रा, उत्सव भव्य स्वरूपात करते झाले मात्र या कारणाने गाठीशी असलेले द्रव्य संपले तेव्हा ते कर्ज काढून उत्सव करू लागले. श्रीरामरायावर पूर्णतः विसंबून राहिलेल्या भायजींनी दानकार्याचा वसा अखंडित ठेवला. पुढे तर भक्तांच्या दिलेले द्रव्य व शिधा यावर उत्सव साजरे करीत. द्रव्य आणि साधनसामग्रीची कमतरता भायजींना अनेकदा जाणवत असे, मात्र त्याचवेळी अवचितपणे केलेल्या मदतीमुळे भायजींची अडचण दूर होऊन उत्सव दणक्यात साजरा होत असे.

भायजींचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता. त्यांच्या उत्सवामध्ये विदर्भातील अनेक प्रख्यात संतसत्पुरुष उपस्थित राहात. भायजींच्या अन्नदान यज्ञामध्ये अनेकदा अनेक प्रकारच्या अडचणी येत. कधी पैसे आणि धान्य मिळत नसे. कधी तूप संपत असे तर कधी रोडगे अपुरे पडत, मात्र दर खेपेस श्रीरामरायाच्या कृपेने उत्सव झोकात संपन्न होत असे. भायजी येणारा प्रत्येकजण जेवला की नाही हे जातीने पहात असत याचे कारण ते येणाऱया प्रत्येक अतिथींमध्ये श्रीरामाला पाहात असत. भायजी केवळ माणसांसाठीच नाही तर प्राण्यांसाठीही अन्नदान करीत. अवतीभवतीच्या प्राण्यांना त्यांचा त्यांचा आवडता चारा-धान्य-फळे-भाज्या खाऊ घालण्यात भायजींना समाधान वाटत असे. त्यांनी वानरांना खेळण्यासाठी झोपाळे व घसरगुंडय़ा बांधल्या होत्या. कुण्या प्राण्याने ग्रामस्थांच्या पिकांचे नुकसान केल्याची बातमी कानी आली तर त्या ग्रामस्थांचे झालेले नुकसान भायजी स्वतः एकरकमी भरून देत असत. भायजी विलक्षण सहृदयी संत होते.

श्रीभायजी महाराजांना लहान मुलांविषयी अपार प्रेम आणि जिव्हाळा होता. मुलंदेखील या प्रेमळ, मातृहृदयी ‘देव’माणसाला बिलगून असत. अवतीभवती सतत बाळगोपाळांचा मेळा जमविणाऱया भायजींनी एकदा त्या मुलांमधील नारायण नामक सात्त्विक अन् सालस अशा मुलाला एके दिवशी आपल्या मांडीवर बसवले आणि कानांत फुंकर घालीत त्याचे ‘रघुपती’ असे नामकरण केले. लौकिक आयुष्यात ‘कलेक्टर’ पदापर्यंत पोहोचलेला हा ‘रघुपती’ प्रत्यक्षात मात्र ‘संत’वृत्तीचे अलौकिक आयुष्य जगला. या रघुपतींनी पुढे १२ अध्याय आणि १९३७ ओव्यांमधून चरित्ररूपाने तसेच स्तोत्र, स्तवन आणि करुणाष्टकांमधून ‘भायजीमाऊली’ची जीवनगाथा साकारली.

अपार प्रेमवृत्तीने काठोकाठ भरलेले हे मातृहृदय सन १९१६ च्या आषाढ चतुर्दशीला पिंपळखुटा संगमावर कायमचे रिते झाले. मात्र देहत्यागाची जाणीव होताच भायजींनी ग्रामस्थांच्या हाती श्रीफळ देत यात्रा-उत्सवाची जबाबदारी अन् दानधर्माचा वसा सोपवला. गुरुमंत्राचे पठण करीत देह त्यागणाऱया भायजींना दिलेला ‘अखेरचा शब्द’आजही ‘तऱहाळा-पिंपळखुटा’ येथे पाळला जातो हे कौतुकास्पद आहे.

[email protected]