
>> संध्या शहापुरे
आपण शरीर सुदृढ करण्यासाठी योगासन, प्राणायाम, वर्कआउट ,झुंबा, मॉर्निंग वॉक, ईव्हीनिंग वॉक असं सर्व काही करत असतो. पण मन सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करतो का? मन कमकुवत असेल तर समोर उभ्या ठाकलेल्या बऱ्यावाईट प्रसंगांना कसे तोंड देणार? यासाठी रामदासांनी सांगितलेल्या मार्गाचा विचार करूया. मन सुदृढ करण्याचा श्रेष्ठ मार्ग धारिष्ट म्हणजेच अभय. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, ‘अभय हा सर्वश्रेष्ठ गुण आहे.’ दैवी सद्गुणांतील पहिला गुण अभय याला सर्व सद्गुणांचा सेनापती म्हणतात. निर्भय याचा अर्थ कोणाची भीती नसणे. अभय म्हणजे मला कोणाची भीती नाही आणि माझी कोणाला भीती नाही.
यासंदर्भात एक गोष्ट आठवते. संत तुकाराम भंडाऱ्याच्या टेकडीवर भजन गाण्यासाठी रोज जात असत. सुरुवातीला जेव्हा त्यांचे भजन सुरू होई, तेव्हा तेथील पक्षी घाबरून उडून जात. पण जसजशी रोज त्यांना या भजनाची, आवाजाची सवय झाली तसे ते स्वच्छंदपणे बागडायला लागले. खरंतर अज्ञानात भय दडलेलं असतं. म्हणजे पहा अभ्यास केला नाही तर परीक्षेचं भय असणारच. अनाचारी भोग केले तर रोगाचे भय असणारच. तसेच मृत्यूचे भय, संपत्तीचे भय, अपयशाचे भय अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की ज्या आपल्याला भयभीत करीत असतात. शोध घ्या!
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे।
मना बोलणे नीच शोषित जावे ।
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीवावे ।।