लेख : संत तुकाराम : प्रभावी लोकशिक्षक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साहेबराव निगळ  

संत तुकारामांसारखे सत्पुरुष हे खर्‍या अर्थाने प्रभावी लोकशिक्षक व तेजस्वी लोकप्रबोधक असतात. म्हणूनच खर्‍या संतांविषयी तुकोबा लिहितात : जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह झिजविती परोपकारे। ईश्वराची भक्ती ही वृत्ती आहे, अभिवृत्ती आहे. या वृत्तीचा आविष्कार संतांच्या विचार, वाणी व वर्तनामध्ये होतो. अर्थात तुकाराम महाराजांनीही लिहून ठेवलेले आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले। आम्हाला संत व सत्पुरुष पूजनीय का आहेत? कारण त्यांच्या उच्चार, विचार आणि आचारात ऐक्य असते. संत तुकाराम हे ‘बोले तैसा चाले’ या कोटीतील सत्पुरुष होते.  

समाजात राजकारणच सर्वकाही असते काय? राजकीय व्यवस्था ही महत्त्वाची जरूर आहे, परंतु तिच्या मुळाशी समाजव्यवस्था असते व समाजव्यवस्थेच्या मुळाशी ‘नैतिक व्यवस्था’(Moral Order) असते. तुकारामादी संतांनी समाजाला नैतिक व्यवस्था दिली. त्यांनी समाजात मानवी मूल्ये रुजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. प्रत्येकाने आपले विहित कर्तव्य चोखपणे पार पाडावे व त्याचबरोबर हृदयस्थ परमेश्वराचे कृतज्ञतापूर्वक स्मरणही ठेवावे असाच संदेश त्यांनी समाजाला दिला.

संत तुकोबांचे पाईकांचे अभंग आहेत. पाईक म्हणजे सेवक, सैनिक होय. पाईकांनी आपले काम चोखपणे कसे करावे यासंदर्भात त्यांनी पाईकांना उपदेश केलेला आहे. पाईकी सोडून ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणत बसा असा सल्ला त्यांनी सेवकांना दिलेला नाही. लहानपणी शिवरायांनी मातोश्री जिजाबाईंसोबत तुकोबांची कीर्तने ऐकलेली होती. त्यांच्या मनावर त्याचे सुसंस्कार झालेले होते. कर्तव्यनिष्ठा व ईश्वर स्मरण या परस्परविरोधी बाबी नाहीत. कर्तव्य पार पाडीत असतानाही ‘नामस्मरण’ करावे असाच त्यांचा उपदेश होता.

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे

उदास विचारे वेंच करी

असे तुकाराम महाराज शिकवितात.

जे कां रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले

तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा.

या रचनेत नैतिक जीवनाची उदात्त संकल्पना तुकोबांनी मांडलेली आहे. महाराजांनी केलेली दयेची व्याख्या तर लोकविलक्षण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, दया करणे जे पुत्रासि, तेचि दासा आणि दासी. त्याही पुढे जाऊन महाराज लिहितात, दया तिचे नाव भूतांचे पालन, आणिक निर्दालन कंटकांचे। ही व्याख्या तर सामाजिक व राजकीय नेत्यांना मार्गदर्शक आहे. आपल्या मुलाबाळांविषयी जी आपली भावना असते, जी आपली अभिवृत्ती (Attitude) असते तशीच भावना वा अभिवृत्ती आपल्या नोकराचाकराविषयी असावी. संत तुकारामांसारखे निःस्पृह व निर्भय कीर्तनकार व प्रवचनकार समाजात असतील तर बहुसंख्य लोक विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराकडे वळणारच नाहीत.

संत तुकारामांसारखे सत्पुरुष हे खर्‍या अर्थाने प्रभावी लोकशिक्षक व तेजस्वी लोकप्रबोधक असतात. म्हणूनच खर्‍या संतांविषयी तुकोबा लिहितात : जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह झिजविती परोपकारे। ईश्वराची भक्ती ही वृत्ती आहे, अभिवृत्ती आहे. या वृत्तीचा आविष्कार संतांच्या विचार, वाणी व वर्तनामध्ये होतो. अर्थात तुकाराम महाराजांनीही लिहून ठेवलेले आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले।

आम्हाला संत व सत्पुरुष पूजनीय का आहेत? कारण त्यांच्या उच्चार, विचार आणि आचारात ऐक्य असते. ते आजकालच्या राजकारण्यांसारखे वा काही पुस्तकी पंडितांसारखे दुतोंडी नव्हते.

संत तुकाराम हे ‘बोले तैसा चाले’ या कोटीतील सत्पुरुष होते. म्हणून तर जगप्रसिद्ध संस्कृततज्ञ प्राच्यविद्याविशारद डॉ. भांडारकर आणि महान विद्वान अर्थशास्त्रज्ञ व इतिहासकार न्या. म. गो. रानडे यांनी तुकोबांना आध्यात्मिक क्षेत्रातील आपला आदर्श म्हणून (Role Model) स्वीकारलेले होते. न्यायमूर्ती रानडेंनी संत तुकारामांवर व्याख्यानेही दिलेली होती. डॉ. भांडारकरांनी आपल्या वानप्रस्थाश्रमी जीवनात ‘तुकाराम सोसायटी’ नावाचे अभ्यास मंडळ स्थापून त्यात तुकोबांच्या अभंगांचा चिकित्सक अभ्यास सुरू केला होता. नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ जीवन जगण्यात व पारमार्थिक जीवन जगण्यात जो संघर्ष असतो त्याला सामोरे कसे जायचे, गृहस्थी जीवनातील संकटांना तोंड कसे द्यायचे याचा बोध तुकोबांच्या जीवनातून मिळतो. प्रामाणिक माणसाच्या जीवनात असे संघर्ष येतातच. खरे तर जीवन हेच संघर्षमय असते. अशा संघर्षमय व संकटग्रस्त जीवनात नैतिक चारित्र्य टिकवून ठेवायचे, मोहांना बळी न पडता व संकटांना न घाबरता ध्येयनिष्ठ जीवन जगायचे ते कसे याचे उत्तर संत तुकोबांच्या जीवनात पाहावयास मिळते.

तुकोबांची भक्ती दृढ व तीव्र होत होती. मंबाजी व रामेश्वर भट यांच्यासारखे सनातनी तुकोबांना त्रास देऊ लागले. तुकोबासारख्यांना उपदेश देण्याचा अधिकार कुणी दिला? हे कलियुग आहे. या युगात दोनच वर्ण आहेत असे म्हणू लागले. याच प्रवृत्तीचा त्रास छत्रपती शिवरायांनाही होत होता. तो वेदबंदीचा काळ होता. अशा काळात तुकोबांनी गर्जना केली,

वेदांचा तो अर्थ आम्हासीस ठावा,

इतरांनी वाहावा भार माथा।

अर्थात पुढे अनेक ब्राह्मणांनी तुकोबांचे शिष्यत्व स्वीकारले. संत बहिणाबाईंनी तुकारामांना गुरू मानले. हे जेव्हा मंबाजीला कळले तेव्हा मंबाजींनी ब्राह्मणकुलोत्पन्न संत बहिणाबाईंनाही त्रास दिला. तुकाराम महाराजांना दांभिकतेची फार चीड होती तसेच ते अत्यंत  निःस्पृह होते. छत्रपती शिवरायांनी त्यांना आदरपूर्वक नजराणा पाठविला. तो नजराणा तुकोबांनी नम्रपणे साभार परत केला. इतकी निःस्पृहता व तेजस्विता कीर्तनकार, प्रवचनकार व विचारवंतांमध्ये असल्यास सत्ताधारी व धनदांडगे यांच्यावरही त्यांचा वचक असतो. परिणामतः अशा तेजस्वी संतांच्या विचारांमुळे समाजात चारित्र्यसंपन्न व कर्तृत्ववान नेतृत्व निर्माण होऊ शकते.

म्हणूनच संत तुकारामादी सत्पुरुषांचे व छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांचे कृतज्ञ स्मरण हे आपले नैतिक कर्तव्य ठरते.