लेख – स्मरण सरदार पटेल आणि इंदिराजींचे!

>> विलास पंढरी

भारतीय राजकारणात लोहपुरुष (आयर्न मॅन) म्हणून ओळखल्या जाणाऱया सरदार वल्लभभाई पटेलांची आज 150 वी जयंती तर आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱया इंदिरा गांधींची आज 41 वी पुण्यतिथी. सरदार पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संघराज्याच्या एकसंधीकरणात मोठे योगदान दिले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगळं वळण देणारा बँक राष्ट्रीयीकरणाचा धाडसी निर्णय घेऊन व पहिला अणुस्फोट करून इंदिराजींनी आपण लढाऊ राजकारणी असल्याचे दाखवून दिले होते.

महात्मा गांधी, लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी या विभूतींना, महात्मा गांधी वगळता त्यांनी केलेल्या कार्याला कुठल्याही धर्माचे किंवा राजकीय विचारसरणीचे न मानता राष्ट्रीय नेते म्हणून सन्मान मिळायला हवा, पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. भारतीय राजकारणात लोहपुरुष (आयर्न मॅन) म्हणून ओळखल्या जाणाऱया वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संघराज्याच्या एकसंधीकरणात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळेच त्यांना ‘सरदार’ या पदवीने संबोधित केले आहे. वकिली करीत असताना ते महात्मा गांधींच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचारांविरुद्ध सत्याग्रह केल्यानंतर त्यांची गणना गुजरातच्या व काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. ‘भारत छोडो’ आंदोलनात ते आघाडीवर होते. वल्लभभाई पटेल हे हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. हिंदुस्थानातील 565 संस्थानांचे भारतीय संघराज्यात केलेले विलीनीकरण हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. सरदार पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने  सरकारने विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे भारतात विलीनीकरण घडवून आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली व त्यामुळे एकसंध आधुनिक भारताची निर्मिती झाली. ‘राष्ट्रीय एकता दिवस’ ही एक लोकप्रिय चळवळ व्हावी या उद्देशाने सरकार विविध उपक्रम राबवीत आहे. त्यात देशभरात  विविध ठिकाणी ‘एकतेसाठी दौड’ (रन फॉर युनिटी) आयोजित केली जात आहे. नर्मदा नदीच्या साधू बेटावर सरदार सरोवर धरणाजवळ त्यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. गुजरातमध्ये स्थित हा 182 मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.

महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकारविरुद्ध सुरू केलेल्या  असहकार आंदोलनात भाग घेण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलांनी आपल्या वकिलीचा त्याग केला. हिंदुस्थानचा राज्यकारभार पाहण्याकरिता  इंग्रज सरकारने सप्टेंबर  1946 साली स्थापन केलेल्या सरकारमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी गृहमंत्री या नात्याने हिंदुस्थान-पाक फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली. नेहरूंऐवजी पटेल पंतप्रधान झाले असते तर कश्मीर प्रश्न निर्माण झाला नसता असे म्हटले जाते, परंतु पटेल पंतप्रधान होऊ शकले नाहीत याची काही  कारणे निश्चितच आहेत. एकतर ते नेहरूंपेक्षा 15 वर्षांनी मोठे होते व त्यांची  तब्येतही बरी नव्हती. तशात म. गांधींचा खून झाला व ते अधिक खचले व डिसेंबर 1950 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

आजच्याच दिवशी 41 वर्षांपूर्वी म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 ला भारतरत्न आणि देशाची ‘आयर्न लेडी’ इंदिराजींचा दुर्दैवी अंत झाला. देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगळं वळण देणारा बँक राष्ट्रीयीकरणाचा धाडसी निर्णय घेऊन व पहिला अणुस्फोट करून इंदिराजींनी आपण लढाऊ राजकारणी असल्याचे दाखवून दिले होते. त्यानंतर 1971 मध्ये पाकिस्तानने आक्रमण केल्यावर भारतावर दडपण आणण्यासाठी अमेरिकेने आपले सातवे आरमार प्रशांत महासागरामधे तैनात केले होते. मात्र इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या या कृतीला भीक न घालता पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली होती. या त्यांच्या करारी, निडर, दृढनिश्चयी, वेळ आल्यास कठोर निर्णय घेण्याच्या स्वभावामुळेच  त्यांना भारताची ‘आयर्न लेडी’ म्हटले जाते. त्यांनी आपली सत्ता वाचविण्यासाठी देशावर आणीबाणी लादल्याने त्यांना सत्ता गमवावी लागली हा त्यांच्या कारकीर्दीवर डाग असला तरीही संघर्ष करून त्या पुन्हा सत्तेवर आल्या.1969 मधील त्यांनी केलेले मोठय़ा खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण,1974 मध्ये पोखरण येथे केलेला पहिला अणुस्फोट आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करीत जिंकलेले 1971चे भारत – पाक युद्ध या महत्त्वाच्या घटनांची नोंद घेत त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने गौरविण्यात आले. या ‘आयर्न लेडी’चा शेवट मात्र अतिशय दुर्दैवी पद्धतीने व देशावर विपरीत परिणाम  करणारा झाला. माणसाला काही अघटित घडणार असल्याचे संकेत मिळतात का? मृत्यपूर्वी 30 ऑक्टोबर  1984 ला दुपारी इंदिरा गांधी यांनी जे भाषण केलं होतं ते नेहमीप्रमाणे त्यांचे सल्लागार एच. वाय. शारदा प्रसाद यांनी बनवलं होतं, पण प्रत्यक्षात भाषण करताना त्यांनी तयार केलेलं भाषण बाजूला ठेवून वेगळंच भाषण केलं. त्या म्हणाल्या होत्या, ‘‘मी आज इथं आहे, पण उद्या नसेनही. मला याची काळजी नाही. मी आनंदी आणि मोठं जीवन जगले आहे आणि मला याचा अभिमान आहे की, मी माझं आयुष्य तुम्हा लोकांच्या सेवेत व्यतीत केलं आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करत राहीन. मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब भारताला बळकट करण्यासाठी खर्ची पडेल.’’ त्यांचे हे शब्द दुर्दैवाने शेवटचेच ठरले. कारण अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात कराव्या लागलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या लष्करी कारवाईने अखेर त्यांचा दुसऱयाच दिवशी बळी घेतला. या कारवाईचा बदला म्हणून 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच दोन शीख अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली. ज्या लष्करप्रमुख जनरल ए. एस. वैद्य यांनी या ऑपरेशनचे नेतृत्व केले होते त्यांची सेवानिवृत्तीनंतर पुण्यामध्ये हत्या करण्यात आली. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ची किंमत इंदिराजींना आपले बलिदान देऊन मोजावी लागली. या दोन्ही ‘भारतरत्नां’चे विनम्र अभिवादन.