ठसा – सतीश लक्ष्मण चाफेकर

751

>>जयेंद्र लोंढे ([email protected])

शाळेत शिकण्याच्या अन् खेळण्याबागडण्याच्या वयात अर्थातच 11व्या वर्षी सतीश लक्ष्मण चाफेकर यांच्यामध्ये कलावंतांच्या सह्या घेण्याची आवड निर्माण झाली. 1969 सालापासून सुरू झालेला हा प्रवास आता 2020 म्हणजेच 51 वर्षे अविरतपणे सुरूच आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे महाराष्ट्र, हिंदुस्थानसह जागतिक स्तरावरील दिग्गज व्यक्तींच्या दहा हजारांपेक्षा जास्त सह्यांचा संग्रह तयार झाला आहे हीदेखील वाखाणण्याजोगी बाब.

सतीश चाफेकर हे ठाण्यातील एम. एच. हायस्कूलचे विद्यार्थी. तिथे ओपन थिएटर असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर त्यांना अरुण सरनाईक, काशीनाथ घाणेकर, निळू फुले ही स्टार मंडळी दिसायची. तेव्हा सतीश चाफेकर त्यांच्या मित्रांना सांगायचे, मी आज अमुक या व्यक्तीला पाहिले. मात्र मित्रांचा त्यांच्यावर विश्वास बसायचा नाही. त्यामुळे पुरावा म्हणून त्यांना सही घेण्याची सवय लागली. तिथपासून सुरू झाला त्यांच्या सह्यांच्या संग्रहाचा प्रवास.

सतीश चाफेकर यांनी बीकॉम, बीए, एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. एका छोट्याशा कंपनीत त्यांनी कामही केले. त्यानंतर 24 वर्षे गरीब विद्यार्थ्यांना कोणतीही फी न घेता शिकवणी दिली. त्यामुळे असंख्य कुटुंबाला त्यांच्याकडून मोलाची मदत मिळाली. हे कार्य केल्याचे त्यांना समाधान आहे.

सह्यांच्या संग्रहामुळे हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात त्यांना ओळख मिळाली. फॅन्स तयार झाले. त्यामुळे आता कोणतीच इच्छा राहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आनंदी आयुष्य जगतोय. निवृत्तीनंतर रेडिओवर क्रीडा वार्तांकन करीत असल्याचेही ते म्हणाले.

डोंबिवलीतही म्युझियम

डोंबिवलीतील एका फ्लॅटमध्ये त्यांनी स्वतचे म्युझियम तयार केले आहे. तेथेही आतापर्यंत 160 सेलिब्रिटींनी आवर्जून उपस्थिती दाखवली आहे. अमोल सराफ यांनी हे संग्रहालय स्केचिंग करून उत्तमरीत्या सजवले आहे.

संग्रहातील दिग्गज व्यक्ती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, डॉन ब्रॅडमन, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, गॅरी सोबर्स, विवियन रिचर्डस्, रॉजर फेडरर, रोनाल्डो, सेरेना विल्यम्स, जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग, शॉन पोलॉक, ऍलन डोनाल्ड, स्टीव वॉ, के. एस. पुआ, बियो बोर्ग.

हिंदुस्थान – दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये काही वर्षांपूर्वी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना खेळवला गेला. या लढतीला सतीश चाफेकरही गेले होते. याचदरम्यान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वानखेडे स्टेडियमवर आले. चाफेकर त्यांच्याजवळ गेले आणि साहेब आपली सही हवीय असे नम्रपणे सांगितले. पण त्याप्रसंगी तिथे प्रचंड गर्दी असल्यामुळे त्यांनी नंतर देतो सही असे सांगितले. काही क्षणानंतर बाळासाहेबांची गाडी बाहेर येत आहे हे दिसल्यानंतर चाफेकर यांची धावपळ झाली. ज्या बॅटवर बाळासाहेबांची सही हवी होती ती बॅट एका झाडावर चढून उंचावली. तितक्यात बाळासाहेबांनी ड्रायव्हरला सांगून गाडी थांबवली आणि मला गाडीत बोलावले. त्यांनी बॅटवर सहीही केली आणि फोटोही काढला. याप्रसंगी शिवसेनाप्रमुखांचा मोठेपणा प्रकर्षाने दिसून आला. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. माझे स्वप्नही पूर्ण झाले.

आपली प्रतिक्रिया द्या