लेख – शिक्षणाचा ओनामा

737
marathi-school

>> दिलीप जोशी ([email protected])

पुढच्या पिढय़ा ज्ञानवंत होण्याची आस बाळगून माणसांच्या जगात प्राचीन काळी ‘शिक्षण’ देण्याची सुरुवात झाली. पृथ्वीवरच्या अनेक भागांतील, अनेक संस्कृतींमधलं शिक्षण हे त्या त्या काळाला अनुसरून होतं. जगात अनेक ठिकाणी विशाल शिक्षण केंद्रे उदयाला आली. हिंदुस्थानात बिहारमधलं नालंदा आणि आता पाकिस्तानात असलेलं तक्षशीला ही आपल्याकडची जगप्रसिद्ध विद्यापीठं. मध्यपूर्वेपासून ते पूर्व आशिया आणि चीनमधले विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी येत असत असं म्हणतात. इजिप्तमध्येही अलेक्झॅन्ड्रिया येथे समृद्ध वाचनालय होतं. जगभरचे तरुण विद्यार्थी कष्टदायक प्रवास करून तेव्हाही ज्ञानार्जनासाठी दूरवर जात होते.

युरोपात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाल्यावर तिथे आधुनिक शिक्षणपद्धतीने वेग घेतला. उद्योगापासून शेतीपर्यंतचे विषय विद्यापीठात कोणालाही शिकता येऊ लागले. हिंदुस्थानात ब्रिटिशांची सत्ता स्थिरावल्यावर त्यांनी त्यांची शिक्षण पद्धत येथेही आणली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत झालेल्या सायबर क्रांतीने जग जवळ तर आणलंच, पण कोणालाही कुठलाही विषय ‘ऑनलाइन’ शिकण्याची सोय झाली. असं असलं तरी शाळा, कॉलेजातील शिक्षणाचं महत्त्व कमी झालं नाही. एकोणिसाव्या शतकात आपल्याकडे सध्या आहेत तशा शाळा सुरू झाल्या. त्यांच्या अभ्यासक्रमात नंतर बदलही होत गेला, परंतु शिक्षणाचे महत्त्व सर्वांनीच ओळखलं. महाराष्ट्रात समाजसुधारकांनी प्रत्येकाने कालसुसंगत शिक्षणसंपन्न होण्यावर भर दिला.

एकेकाळी लिहिण्या-वाचण्याची मक्तेदारी समाजातील विशिष्ट वर्गाकडे होती. तो काळ इतिहासजमा झाला. देशातील शिक्षण संस्था वाढू लागल्यावर सर्वंकष शिक्षण सर्वांना उपलब्ध झाले. तरीही आपल्या अवाढव्य देशातील प्रचंड लोकसंख्या केवळ ‘साक्षर’ करण्यासाठीही खूप प्रयत्न करावे लागले. सरकार आणि स्वयंसेवी संस्था तसंच शिक्षणप्रसाराचं क्रत घेतलेल्या व्यक्तींनी अथक प्रयत्न केले. आजमितीला हिंदुस्थानातील सुमारे 75 टक्के लोक साक्षर आहेत. यामध्ये केरळ राज्य आघाडीवर असून तिथे 93 टक्के लोक साक्षर आहेत, तर बिहारमध्ये सर्वात कमी म्हणजे 63 टक्क्यांच्या आसपास.

येत्या काळात ही परिस्थिती बदलेल. आपल्याकडे 6 ते 14 वर्षांपर्यंतच शिक्षण सरकारी शाळांत मिळतं. प्राथमिक शिक्षणापर्यंत शाळेत जाणाऱ्यांची टक्केवारी 75 टक्के आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी कॉलेजात जाणाऱ्यांची संख्या सुमारे 25 टक्के असून देशात 900 विद्यापीठे आणि 40 हजार महाविद्यालयं आहेत. मुलांप्रमाणेच मुलीही मोठय़ा प्रमाणावर शिक्षण घेत असून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये देदीप्यमान यश मिळवणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे.

शिक्षणाचा ‘ओनामा’ म्हणजे आरंभ खरं तर घरीच नकळत होत असतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मातृभाषेत, त्यातील बोलीभाषेत जगाचं ज्ञान होऊ लागतं. नाती समजू लागतात. व्यक्तींची, वस्तूंची नावं समजतात. प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल जागृत करणाऱ्या त्या वयात सभोवतालच्या वातावरणात घडणाऱ्या कित्येक गोष्टी मनात ठसत असतात आणि त्यातून आपोआप काहीतरी समजतं. मात्र ते ‘समजतं’ ते योग्य की अयोग्य आणि योग्य काय ते कसं समजून घ्यावं याचं ज्ञान देण्यासाठी शिक्षकाची गरज असते. आरंभकाळात घरची माणसंच ते काम करतात, पण विशिष्ट विषयाचं म्हणजे अगदी संगीत, नृत्याचंही शिक्षण घ्यायचं तर ‘गुरू’ची गरज भासतेच.

ज्ञानाची दारं उघडली की, त्या विराट खजिन्यातील आपल्याला काय हवं आणि कोणतं ज्ञान घेण्याची आपली क्षमता आहे हे कधी स्वतःला तर कधी योग्य मार्गदर्शनाने जाणता येतं. ‘ऍप्टिटय़ूड’ किंवा मनाचा ‘कल’ लक्षात घेऊन आवडीच्या विषयात घेतलेलं शिक्षण आनंददायी ठरतं. त्यातून उत्कर्ष साधता येतो. त्याचबरोबर आपण जे शिकतो त्यापेक्षा वेगळं काही शिकणाऱ्यांच्या ज्ञानाविषयी आदर बाळगणे हेसुद्धा शिक्षणाने समजायला हवं. ‘विद्या विनयेन शोभते’ हे सतत लक्षात ठेवलं तर कोणत्याही ‘डिग्री’चा अहंभाव मनात उरणार नाही. खूप शिकलेल्या विद्वान वैज्ञानिकांपासून ते कलाकारांपर्यंत अनेक मोठय़ा व्यक्ती विनयशील असल्याचा अनुभव येतो तेव्हा त्यांच्याकडून आपल्यालाच खूप काही शिकता येतं.

शिक्षण हे एखाद्या ‘पदवी’नंतर संपत नसतं. खरं तर ते कधीच संपत नाही. बदलत्या जगात नित्यनवीन काही घडत असतं. आपल्या कल्पनेत नसलेल्या ‘शिक्षणा’चा उदय आणि प्रभाव पाहायला मिळतो. आम्ही कॉलेजात जाईपर्यंत कॉम्प्युटर ही परदेशातली विस्मयकथा वाटायची. सेलफोन वगैरे गोष्टी तर फार दूरच्या, परंतु नंतरच्या दोन दशकांत त्यांनी जग व्यापलं. पाटी-पेन्सिलींची जागा ‘टॅब’नी घेतली. शिक्षण पद्धती आमूलाग्र बदलली. मात्र शिक्षण घेण्याची आस आणि तारतम्याने त्यातून काय निवडावं याची क्षमता हा मानवी मेंदूचा गुण. तो सर्वांठायी सारखाच असतो. त्यामुळे नित्यनव्या शिक्षणाचा ‘ओनामा’ कोणत्याही वयात होऊ शकतो. शंभर टक्के शिक्षित होण्याकडे आपली वाटचाल वेगाने सुरू राहावी.

आपली प्रतिक्रिया द्या