लेख – सूर्य ‘जाणणारा’ माणूस!

– दिलीप जोशी ([email protected])

गोष्ट सन 1957 मधली. दोन मराठी तरुण उच्च शिक्षणासाठी बोटीने इंग्लंडला निघाले होते. त्या काळात जगभरच्या विमानांची उड्डाणं मिनिटामिनिटाला होत नव्हती. बरेच महत्त्वाकांक्षी विद्यार्थी बोटीनेच ‘विलायतेला’ म्हणजे इंग्लंडला जात असत.

त्या दोघांचा तोपर्यंत परस्परांशी परिचय नव्हता. दोघेही एकाच देशात आणि एकाच विद्यापीठात शिक्षणासाठी जातोय हे लक्षात आलं आणि त्या क्षणापासून त्यांची मैत्री झाली. ते दोन तरुण म्हणजे विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. शशिकुमार चित्रे. गेल्या 11 जानेवारीला डॉ. शशिकुमार चित्रे यांचं चौऱ्याऐशीव्या वर्षी निधन झालं. मित्राच्या जाण्याची दुःखद वार्ता समजताच प्रा. नारळीकरांना तो काळ आठवला असेल.

सातत्याने सूर्याचा ‘शोध’ घेणारे, या ताऱ्यांच्या अंतरंगाचा अभ्यास करून त्यावर संशोधन करणारे चित्रे काळाच्या पडद्याआड गेले आणि सूर्य खऱ्या अर्थाने जाणणाऱ्या जागतिक कीर्तीच्या एका ज्येष्ठ अभ्यासकाला आपण दुरावलो. त्यांचं जाणं ही देशातील खगोल अभ्यास विश्वाची मोठीच हानी आहे.

प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या चित्रे सरांशी परिचय झाला तो खगोल अभ्यास वर्गाच्या निमित्ताने 1985मध्ये. मुंबईच्या लोकविज्ञान संघटनेने ‘हॅली’ धूमकेतू येण्याच्या पार्श्वभूमीवर, जनसामान्यांपर्यंत खगोलशास्त्र्ााची माहिती पोचावी यासाठी एक सोपा अभ्यास वर्ग घेतला. त्याच्या आयोजनात सहभागी होता आलं आणि त्यावेळी ‘टीआयएफआर’मध्येच कार्यरत असलेल्या विशालाक्षी यांनी या अभ्यासवर्गाच्या समापनाच्या दिवशी चित्रे सरांना प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची विनंती केली. सर आले आणि त्यांनी सोप्या मराठीत आम्हा नवशिक्या खगोल अभ्यासकांना उत्तम मार्गदर्शन केले.

बराच काळ इंग्लंड आणि अमेरिकेत गेल्यामुळे मराठीत भाषण करण्याचा सराव नव्हता तरी सरांनी सर्वांना समजेल अशा शब्दांत अभ्यास विषय मांडला. एवढंच नव्हे, तर परदेशातून परतल्यावर, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये त्यांनी अनेक व्याख्यानंही दिली. इंग्लिश भाषेवर त्यांचं प्रभुत्व तर होतंच, पण त्यांची इंग्लिश बोलण्याची शैलीही नैसर्गिकरीत्या इंग्लिश झाली होती. त्यांचं भाषण ऐकत राहावं असं वाटायचं. अर्थात केवळ भाषा सौंदर्यच नव्हे तर ज्ञानवैभवानेही त्यांचं भाषण परिपूर्ण असायचं.

हाती माईक घेऊन मंचावर इकडून तिकडे फिरत, सभागृहातल्या प्रत्येक श्रोत्याला सर आपल्याशीच बोलतायत असं वाटावं अशा पद्धतीने ते भाषण करत असत. त्यात वैज्ञानिक विषय मांडणीसह नर्मविनोदही असायचा. एका कार्यक्रमानंतर त्यांना म्हटलं, ‘‘सर, तुमच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञानाचा मला हेवा वाटत नाही. कारण माझा त्या क्षेत्रातला अभ्यास नाही… पण तुमच्या इंग्लिश भाषण-संभाषणाचा मात्र वाटतो. कारण मी पत्रकार आणि विविध भाषाप्रेमी आहे, पण माझं शालेय शिक्षण मुंबईच्या महापालिकेच्या मराठी शाळेत झालंय…’’ सरांनी एकवार रोखून पाहिलं आणि ते हसून म्हणाले, ‘अरे माझ्या शिक्षणाची सुरुवातही मुंबई महापालिकेच्या मराठी शाळेतून झाली होती. ते केंब्रिज वगैरे फार नंतर…’

ते नेहमीच असं मोकळेपणाने बोलत. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना कधी दडपण येत नव्हतं. आमच्या ‘खगोल मंडळा’च्या आरंभीचे प्रमुख पाहुणे चित्रे सर होते आणि 2019मध्ये प्रदीप नायक लिखित ‘तारांगण’ पुस्तकाच्या इंग्लिश आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळीही तेच प्रमुख अतिथी होते. त्यानंतर मंडळात एवढा मोठा कार्यक्रम झाला नाही आणि गेलं वर्ष तर ‘कोविड’ सावटाखालीच गेलं. 1994मध्ये आमच्या बदलापूर विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातही ते ‘सूर्यग्रहणे’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी आवर्जून आले होते. आमच्या अनेक तरुण सभासदांनी पुढे खगोल हाच विषय उच्च शिक्षणासाठी निवडला. चित्रे सरांकडे गेल्यावर ते अशा विद्यार्थ्यांना आस्थेने मार्गदर्शन करत असत. अनेक खगोल संमेलनात त्यांची भेट होत असे.

1995मध्ये खग्रास सूर्यग्रहणाच्या निमित्ताने आम्ही मराठीतल्या ‘खगोलवार्ता’बरोबरच इंग्लिशमध्ये ‘टोटॅलिटी’ नावाचं मासिक वर्षभर चालवलं. त्यावेळी पहिल्याच अंकासाठी प्रा. शशिकुमार चित्रे या सौर-संशोधकाची (सन – सायण्टिस्ट) मुलाखत प्रदीप आणि मृणाल यांनी घेतली. सूर्य या आपल्या ताऱ्याचं अंतरंग. त्यात चाललेल्या घडामोडी, त्यांच्या गाभ्यात हायड्रोजनचं हिबीयमध्ये रूपांतर आणि निर्माण होणारी प्रचंड ऊर्जा तसंच सौरकंपनं, सूर्याच्या वायुरूप आकारमानात सातत्याने होत असलेलं स्पंदन (व्हॉबलिंग) अशा अनेक विषयांवर सरांनी विचार मांडले. त्या संध्याकाळी मुलाखत सुरू असताना ‘टीआयएफआर’मधील त्यांच्या केबिनच्या खिडकीतून, समुद्रात अस्ताला जाणारा सूर्य दिसत होता. त्यांच्याकडे निर्देश करत सर उद्गारले, ‘तो माझा प्रेरणास्रोत आहे!’ साक्षात सूर्यापासून प्रेरणा घेणारा हा तेजस्वी संशोधक! पद्मभूषण डॉ. शशिकुमार चित्रे यांच्या जाण्याने एका व्यासंगी संशोधकाचा अस्त झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या