लेख – शिस्तप्रिय राजकारणाचा वस्तुपाठ

>> अनिकेत कुलकर्णी

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री, मराठवाडय़ाचे भगीरथपुत्र असा ज्यांचा गौरवाने उल्लेख होतो त्या शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा 14 जुलै रोजी समारोप होत आहे. महाराष्ट्राच्या चढणघडणीत स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचे योगदान मोठे आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील सिंचनाच्या बाबतीत शंकरराव यांचे नाव विशेष करून घेतले जाते. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख!

विकासाचे व्हिजन आणि शिस्तप्रिय वर्तन यांचा वस्तुपाठ देणाऱया राजकीय नेत्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. त्यांच्या पिढीत अशा नेत्यांची फारशी वानवा नव्हती, पण आता मात्र तशा नेत्यांची कमतरता तीक्रतेने जाणवते आहे.

शंकरराव चव्हाण 50 वर्षे राजकारणात सतत कोणत्या ना कोणत्या उच्च पदावर होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पाटबंधारेमंत्री, केंद्रात गृहमंत्री, पाटबंधारेमंत्री यांसह विविध खात्यांची मंत्रीपदे त्यांनी भूषविली. मात्र एवढय़ा प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांच्या दिशेने बोट दाखविले जाईल असे कुठलेही अनियमित काम त्यांच्याकडून झाले नाही. मग आरोपाचा प्रश्नच वेगळा. प्रदीर्घ काळ सत्तेत राहूनही सत्तेचा गर्व त्यांनी कधी गेला नाही.

निष्कलंक चारित्र्य, निःस्पृह वृत्ती, शिक्षणाविषयाची आस्था हे गुण शंकररावांमध्ये आले ते त्यांचे वडील भाऊराव चव्हाण यांच्या संस्कारामुळे. स्वतः भाऊराव अत्यंत निःस्पृह होते. चांगले संस्कार लाभले तरी ते संस्कार आत्मसात करून आयुष्यभर त्या संस्कारांची अंमलबजावणी करणारे नेते हल्ली फार विरळ झाले आहेत. शंकरराव चव्हाण अशा विरळ नेत्यांपैकी एक होते. त्यांची राहणी, विचारसरणी सगळे काही ‘बोले तैसा चाले’ अशी होती.

शंकररावांच्या समकालीन काही नेत्यांना शंकररावांबद्दल आदर कमी आणि आकस जास्त होता. शंकररावजींचा करारी बाणा, स्पष्टवक्तेपणा त्यास कारणीभूत होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रादेशिक असमतोलाचा आणि विकासाच्या अनुशेषाचा वाद नेहमीच होत आला आहे. त्यातून सत्तेच्या राजकारणात समज-गैरसमजही निर्माण झाले. अर्थात शंकरराव चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठवाडय़ाच्या इतिहासात विकासाची कामे केली.

शंकररावांची राजकारणातील सुरुवात पराजयाने झाली. इ.स. 1952 मध्ये ते हदगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते. अर्थात त्यावेळी शंकररावही निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक नव्हते. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठाRना त्यांनी तसे सांगितलेही होते. पण पक्षश्रेष्ठाRचा आदेश म्हणून शंकररावांनी ही निवडणूक लढविली होती. त्यावेळी हदगावचे तत्कालीन नेते माधवराव वायफनेकर यांनी बंडखोरी केली व ते शंकररावांविरुद्ध उभे राहिले. शंकररावांना निसटता पराभव स्वीकारावा लागला.

हदगावचे अपयश ही यशाची पहिली पायरी होती, हे त्यानंतरच्या यशाने सिद्ध करून दाखविले. 1952 च्या अपयशानंतर शंकररावांना राजकारणात अपयश कधीच पहावे लागले नाही. निजामाविरुद्ध त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात दिलेले योगदान आणि त्यांचे विकासाचे व्हिजन यास जनतेने भरभरून प्रतिसाद देऊन 1952 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत जनतेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले.

शंकररावांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी पाटबंधारेमंत्री म्हणून केलेले काम अतिशय महत्त्वाचे आहे. मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. येथील शेती निसर्गावर अवलंबून होती आणि वर्षानुवर्षांपासून येथील शेतकरी पावसाच्या लहरीपणामुळे खचला होता. शंकररावांनी या भागातील पाण्याच्या दुर्भिक्षाची कारणमीमांसा केली आणि शेतकऱयांच्या दुरवस्थेला पावसाचा लहरीपणा नव्हे तर पाण्याच्या नियोजनाचा अभाव हे आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला व मराठवाडय़ात धरणे बांधण्याची योजना तयार केली व ती तंतोतंत अमलात आणली. आज जायकवाडी, विष्णुपुरीसह येलदरी, मानार, सिद्धेश्वर, पूर्णा, निम्न तेरणा, नांदुर मधमेश्वर, लेंडी, पैनगंगा आदी प्रकल्पांमुळे मराठवाडा सुजलाम् झाला आहे, त्याचे श्रेय शंकररावांना द्यावे लागेल.

जायकवाडी प्रकल्प हा शंकररावांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि या प्रोजेक्टला विरोधही होता, पण हा विरोध शंकररावांनी प्रबोधनाने नष्ट केला आणि अखेर हा प्रकल्प पूर्ण झाला. 18 ऑक्टोबर 1965 रोजी जायकवाडी प्रकल्पाचे लोकार्पण तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. 2909 दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या या जलसिंचन प्रकल्पामुळे संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, नगर या जिल्हय़ांतील 2 लाख 78 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली.

जलसिंचनाच्या प्रकल्पांनी महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् केला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीनंतर शंकररावांनी या प्रकल्पाच्या वितरणव्यवस्थेतही कठोरपणे सुसूत्रता आणली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शंकररावांनी राज्यातील प्रत्येक विभागासाठी एक कृषी विद्यापीठ स्थापन केले. 1972 मध्ये त्यांनी कृषी उद्योग महामंडळाची स्थापना केली.

शंकररावांनी राज्यात ज्या हिमतीने, निर्धाराने विकासकामे केली त्याची पावती काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठाRनी त्यांना केंद्रात बोलावून दिली. केंद्रातही पाटबंधारे, गृह, नियोजन आदी विभागांचे मंत्री म्हणून काम करण्याची मिळालेली संधी शंकररावांनी केंद्रातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी उपयोगात आणली. शंकरराव यांना त्यांनी जलसंधारणासंदर्भात केलेल्या कामामुळे ‘महाराष्ट्रातील जलक्रांतीचे जनक’ असे संबोधले जाते. महाराष्ट्राच्या या जलभगीरथाने केवळ राज्यच सुजलाम् सुफलाम् केले नाही तर केंद्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांनी केलेल्या जलसंपदा आणि जलसंधारणाच्या कार्याची माहिती आणि महत्त्व लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांच्या नावाचा ‘जलभूषण’ पुरस्कार राज्य शासनातर्फे यंदापासून जलसंपदा, जलसंधारण आणि पाणी पुरवठय़ाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱया लोकांना देऊन गौरव करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या