
>> विवेक दिगंबर वैद्य
श्रीसाईबाबांची समाधी, पूर्वीच्या साठेवाडय़ातील श्रीसाईंचे गुरुस्थान, येथील गोड चवीच्या पानांचा कडुनिंबाचा वृक्ष, श्रीसाईंनी प्रत्यक्ष वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय, संस्थानचे कार्यालय, ग्रंथ व देणगी विभाग तसेच गावामधील खंडोबा मंदिर (जेथे साई पहिल्यांदा आले) या व अशा साई-सहवासाने पवित्र झालेल्या स्थानाचे माहात्म्य जाणून ‘दर्शन’ घेतले की शिर्डीवारी खऱया अर्थाने सफळ व संपूर्ण होते.
शिर्डी क्षेत्रस्थानी आल्यावर साईभक्तांना पहिल्याप्रथम ओढ लागते ती साईबाबांच्या समाधी दर्शनाची. साईंच्या वात्सल्यमूर्तीचे प्रेमळ दर्शन डोळय़ात साठवले की सर्व भक्तांची पावले साईंच्या वास्तव्याने पावन झालेल्या शिर्डी परिसरातील अन्य वास्तूंकडे वळतात. परंतु, शिर्डीमध्ये दाखल झाल्यावर श्रीसाईबाबांचे दर्शन कशा रीतीने घ्यावे याविषयी कै. नानासाहेब चांदोरकर, कै. रा. ब. मोरेश्वर प्रधान वगैरे श्रेष्ठ भक्तांनी तत्कालीन साईभक्तांसोबत चर्चा करून एक शास्त्रशुद्ध पद्धत संमत केली होती, ती पुढीलप्रमाणे आहे.
‘श्रीसाईदर्शनार्थ शिर्डी येथे आल्यावर गुरुस्थानी कडुनिंबाच्या झाडाखाली असलेल्या साईबाबांच्या गुरूंच्या समाधीचे दर्शन घ्यावे व प्रदक्षिणा घालावी. पुढे द्वारकामाई येथे जाऊन बाबांच्या साक्षात रंगविलेल्या प्रतिमेचे व अखंड प्रज्वलित धुनीचे दर्शन घ्यावे. त्या नंतर चावडीमध्ये जाऊन गादीवर ठेवलेल्या साईपादुकांना नमस्कार करावा. पुढे बुट्टी वाडय़ातील श्रीबाबांच्या समाधीचे अन् भव्य मूर्तीचे दर्शन घ्यावे. शेवटी लेंडीबागेत जावे व तेथील नंदादीप पाहून बाबांच्या बसण्याने पवित्र झालेल्या निंबवृक्षाला व पिंपळवृक्षाला प्रदक्षिणा घालावी.’
अशा रीतीने अपार माहात्म्य लाभलेल्या या शिर्डीतील ‘पाच’ पवित्र स्थानांना भेट देण्याचा क्रम साईसहवासातील प्रमुख भक्तगणांनी त्याकाळी निश्चित केला होता; परंतु सद्यस्थितीत भक्तांच्या अतोनात गर्दीमुळे हा क्रम साधणे सहजशक्य नसले तरीदेखील श्रीशिर्डी यात्रेचे साफल्य प्राप्त करावयाचे असेल तर श्रीसाईंच्या सहवासाने पावन झालेल्या वरील ठिकाणांना आवर्जून आणि अगत्यपूर्वक भेट द्यावी.
गुरुस्थान – शिर्डी येथे गेल्यावर बाबांच्या गुरुस्थानाचे दर्शन घेतल्याशिवाय परतणे योग्य नाही. गुरुस्थानी डावीकडे कोपऱयात लेखशिलेवर मराठीत ‘हे आपल्या गुरुरायाचे स्थान असे साईबाबा म्हणत’ असे लिहिलेले आहे. त्यामागे बाबांची मूर्ती आहे. मध्यभागी चांदीच्या देव्हाऱयात शिवपिंडी व बाबांची तसबीर आहे. उजवीकडे प्रसिद्ध निंबवृक्ष व त्याखाली बाबांच्या पादुका आहेत. गुरुस्थान व निंबवृक्षाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात तसेच ऊद जाळावा असा प्रघात आहे. बाबा गुरुसमाधीसमोर दर गुरुवारी, शुक्रवारी ऊद जाळावयास सांगत असत.
श्रीसाईसमाधी – साईभक्त गोपाळराव बुटी यांनी त्यांना झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार 1916 ते 1918 या दोन वर्षांच्या कालावधीत बाबांच्या सूचनेनुसार श्रीमुरलीधर मंदिर बांधले. दुमजली, तिसऱया मजल्यावरील चुनेगच्ची, काळय़ा दगडाच्या भिंती, भरपूर खोल्या आणि प्रशस्त दिवाणखाने अशा स्वरूपाचा हा भव्य ‘बुटीवाडा’ पुढे ‘साईसमाधी’ म्हणून प्रसिद्धीस आला. ‘जिच्या तुर्बतीतून हाडे बोलतात’ अशी साईमाऊली या वाडय़ात समाधीरूपाने स्थिर आहे. शिल्पकार तालीम यांनी साकारलेल्या श्रीसाईंच्या संगमरवरी मूर्तीची स्थापना येथे सन 1954 मध्ये करण्यात आली. आज सोन्याच्या लखलखत्या प्रभावळीत झळकणारी श्रीसाईमूर्ती येथे भक्तदर्शनार्थ विराजमान आहे.
बाबांच्या आरतीला (विशेषतः माध्यान्ह आरतीला) येथे बरीच गर्दी असते. तिचे तसे महत्त्वही आहे. यावेळी बाबांचे स्नान तसेच भक्तांचे पूजाविधी, अभिषेक आटोपलेले असतात. बाबांची मूर्ती आणि समाधी रंगीत वस्त्र, हारफुलांनी सजलेली असते. मस्तकावर सोन्याचा मुकुट ठेवलेला असतो. त्या अलौकिक साईदर्शनार्थ समाधीच्या चबुतऱयाजवळ जागा मिळविण्यासाठी भक्तांची लगबग उडते.
द्वारकामाई – द्वारकामाईतील मुख्य आकर्षण म्हणजे सतत पेटणारी धुनी, खांबाजवळील उदीपात्र व कोठूनही पाहता बाबा आपल्याकडेच पाहत असल्याचा भास घडविणारे साईंचे हुबेहूब चित्र. बाबा देहधारी असल्यापासूनचा पाण्याचा माठही द्वारकामाईत पाहावयास मिळतो.
अब्दुलबाबांची झोपडी – द्वारकामाईकडून चावडीकडे जाताना उजव्या हाताला अब्दुलबाबांची झोपडी आहे. अब्दुलबाबा हे साईबाबांचे निस्सीम भक्त होते. बाबा शिर्डी येथे प्रत्यक्ष सगुणावतारात नांदत असताना अब्दुलबाबा यांनी बाबांची सेवा केली. बाबांनी देह त्यागल्यानंतरही ते समाधी परिसरात सेवा करीत असत. गुरुसमाधीपाशी शिष्याचीही स्मृती स्थापन व्हावी हेच या जागेचे माहात्म्य आहे.
चावडी – साईबाबा येथे एक दिवसाआड रात्री येत असत आणि सकाळी काकड आरती झाली की पुन्हा द्वारकामाई येथे जात असत. श्रीसाईसच्चरित्रातील अनेक प्रसंग चावडी आणि द्वारकामाईत घडलेले आहेत. श्रीसाईबाबांच्या परमेश्वरीय वास्तव्याच्या आणि आठवणीरूप अस्तित्वाच्या खुणा नांदत्या ठेवणारी ही वास्तू आजदेखील प्रत्येक साईभक्ताच्या श्रद्धेचे स्थान-माहात्म्य जपून आहे.
लेंडीबाग – साईंच्या समाधी मंदिरापाशी ही लेंडीबाग आहे. पूर्वी येथून लेंडी नावाचा नाला वाहत असे. बाबांनी या नाल्यालगतच ही बाग वसवली. लेंडीबागेतील झाडांना ते स्वतः पाणी देत असत. रावबहादूर प्रधान यांनी ही बाग विकत घेऊन साईचरणी अर्पण केली. पुढे, कै. तात्या कोते पाटील व सगुण मेरू नाईक यांनी भक्तांच्या मदतीने येथे उत्तम पद्धतीने बाग उभारून विहीर (वापी) बांधली. लेंडीबागेमध्ये प्रवेश करण्याआधी उजवीकडे श्रीसाईंचे सेवेकरी अब्दुलबाबा, तात्या कोते पाटील तसेच सत्पुरुष नानावल्ली यांची समाधी आहे. लेंडीबाग येथे सतत नंदादीप पेटत असतो. येथेच बाबांचा सहवास लाभलेले निंब आणि पिंपळवृक्षही आहेत. त्यांना प्रदक्षिणा घालून समोर पूर्वेकडे असलेल्या औदुंबराखालील श्रीदत्तात्रयांचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे. त्याच्या पाठीमागे साईभक्त मेघा आणि श्यामसुंदर (बाबांचा घोडा) याची समाधी आहे. साईंच्या या नित्य बैठकीच्या जागी नित्य नंदादीप तेवत असतो.
श्रीसाईबाबांची समाधी, पूर्वीच्या साठेवाडय़ातील श्रीसाईंचे गुरुस्थान, येथील गोड चवीच्या पानांचा कडुनिंबाचा वृक्ष, श्रीसाईंनी प्रत्यक्ष वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय, संस्थानचे कार्यालय, ग्रंथ व देणगी विभाग तसेच गावामधील खंडोबा मंदिर (जेथे साई पहिल्यांदा आले) या व अशा साई-सहवासाने पवित्र झालेल्या स्थानाचे माहात्म्य जाणून ‘दर्शन’ घेतले की शिर्डीवारी खऱया अर्थाने सफळ व संपूर्ण होते.



























































