शिवमंदिरांच्या राज्यात – अंबेजोगाईतलं शिवसान्निध्यं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीती मेहेंदळे

काही गावं इतकं काही स्वतःशी बाळगून असतात की, त्याचा मागोवा घेता घेता आपण त्यात नकळत गुंतत जातो. अंबेजोगाई असंच एक महाराष्ट्रातलं ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्टय़ा समृद्ध गाव. समृद्ध अशासाठी की, इथे शक्तिपीठांइतकंच महत्त्व पावलेली अनेक कुळांची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध अंबेजोगाई देवी आहे. देवीचं जुनं मंदिर आधुनिकीकरणात प्राचीन स्थापत्य वैभव गमावून बसलं आहे ही खेदाची बाब आहे खरी, पण तिला फेर धरून आजही आपल्या अस्तित्वाची नोंद घ्यायला लावणारी एकाहून एक प्राचीन शिवमंदिरं इथे पाय घट्ट रोवून आहेत. 

मराठवाडय़ातला बीड जिल्हा तसाही प्राचीन. एकेक सरस मंदिरांसाठी आणि हेमाडपंथी स्थापत्यासाठी खास ओळखला जातो. अंबेजोगाईतही खोलेश्वर, अमलेश्वर, सकलेश्वर, काशीविश्वेश्वर, रामेश्वर, माणकेश्वर आणि बऱयाच शिवमंदिरांची देखणी उपस्थिती आहे.

यादव काळातलं खोलेश्वर मंदिर म्हटलं की, तिथला ठसठशीत यादवकालीन संस्कृतमधला शिलालेख आठवतो. शिलालेखावरून त्याचा काळ शके 1162 असा निर्देशित केला गेला आहे. यात सिघण यादवाचा उल्लेख आहे.  मंदिर एका चार फूट उंच जोत्यावर आहे. मुखमंडप, मंडप, दोन अर्धमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना दिसते. इथली जवळपास सगळीच मंदिरं चालुक्य-यादव काळातली दिसतात. चालुक्यांच्या स्थापत्य शैलीचा वारसा काही प्रमाणात यादव स्थपतींनी जोपासलेला दिसतो. याचं एक उदाहरण म्हणजे खोलेश्वरातले स्तंभ. ते कोरीवकामाच्या दृष्टीनं आणि स्तंभशैलीच्या दृष्टीनं अतिशय साधे आहेत.

  अंबेजोगाई गावाच्या उत्तरेस अमलेश्वर हे निसर्गरम्य परिसरात एक शिवमंदिर आहे. याच्या बाह्यभिंतींवर खूप प्रमाणात कोरीवकाम आहे. तळाशी गजथर दिसतो. असेच सिंह आणि अश्व दिसतात. वाघ आणि वाघीण यांची रतिक्रीडा  कोरलेली दिसते. नृत्यमग्न गणेशाचे सुंदर शिल्प तसेच वामन अवताराचे सुंदर शिल्प दखल घेण्याजोगे आहे. अशा तऱ्हेचं कोरीवकाम हे इथलं वैशिष्टय़ आहे. मुख्य भागावर अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत. निरनिराळ्या यक्षिणी, गणेश, पार्वती, महिषासुरमर्दिनी, शिव यांच्या मूर्ती दिसतात. या मंदिराच्या पूर्वेला एक प्रवेशद्वार आहे, पण मुखमंडप नाही. तो कदाचित पूर्वी असावा, पण पुन्हा बांधताना पडला असावा. गर्भगृह चौरसाकृती असून आश्चर्य म्हणजे ललाटबिंबावर शिवपरिवारातली मूर्ती नाही. त्याच्या द्वारपट्टीवर फक्त दोन शिवमूर्ती कोरलेल्या दिसतात. अंतराळाच्या छतावर उत्कृष्ट कोरीवकाम आहे. त्यावर नृत्यमग्न शिव, महिषासुरमर्दिनी, अंधकासुर वध अशा काही मूर्ती कोरलेल्या दिसतात.

गावापासून उत्तरेस टेकडीवर सकलेश्वर शिवालय दिसते. याचा मुखमंडप पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. फक्त पायाच्या अवशेषांवरून त्याचं अस्तित्व जाणवतं. 28 स्तंभ आणि रंगशिळा यावरून मंडपाची रचना कशी असेल याची कल्पना करता येते. एकूण मंदिरात 32 स्तंभ आहेत. त्यातले रंगशिळेवर असलेले सर्वात जास्त कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. या स्तंभांवरील शिल्पपट्ट अप्रतिम आहेत. यादव स्थापत्यशैलीचा अप्रतिम आविष्कार सकलेश्वरात दिसतो.

याखेरीज अजूनही वैशिष्टय़पूर्ण शिवमंदिरं अंबेजोगाई  गावात फिरताना आढळतात. रामेश्वराचं हेमाडपंथी  मंदिर त्याच्या  समोर असलेल्या बारवेमुळे लक्षात राहतं. छप्पर नसलेलं भग्न अवस्थेतलं माणकेश्वर, गाभाऱ्यातील उघडं पडलेलं शिवलिंग, मोठासा  नंदी आणि काही तुटके खांब यांच्या जोरावर आपलं अस्तित्व कसंबसं सांभाळत आहे. अमलेश्वराच्या रस्त्यावर भांडेश्वर आहे. योगेश्वरी मंदिरावरून एक रस्ता थेट लेण्यांकडे जातो. हत्तीखाना, जैन लेणी, आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी तसेच ‘पासोडी’कार संत दासोपंत यांची समाधी असे अनमोल थांबे घेत घेत आपण थेट नागनाथ मंदिरापाशी चढत येतो. इथे सुंदरसा धबधबा आहे आणि नागनाथाचं प्राचीन मंदिर आहे.

अमृतेश्वर, काशीविश्वेश्वर ही अशीच अजून नमूद करण्यासारखी विशेष शिवालयं इथे मौजूद आहेत. शिवाला भोळा, कृपासिंधू, तारणहार देव मानले जाते आणि इतकी शिवालयं एका ठिकाणी असणं यामागे निश्चित काही योजना असणार. जशा राजवटी बदलत गेल्या, राजे बदलले तसे स्थापत्याचे आविष्कार दाखवणारी मंदिरं त्यांनी बांधली असावीत. आज हा अमूल्य वारसा जतन करायला हवा, त्याचबरोबर त्याची महतीही सांगितली जायला हवी.

[email protected]