प्रासंगिक – शिवराज्याभिषेकाचा नेत्रदीपक सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विलास पंढरी

छत्रपती  शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके 1596 आणि विक्रम संवत 1730. शिव शकही याच दिवशी सुरू झाले. या कालगणनेनुसार यंदा सन 2022, श्री शालिवाहन शके 1944, विक्रम संवत 2078 असून शिवराज शक 348 आहे. म्हणजेच आज या ऐतिहासिक स्फूर्तिदायी घटनेला 348 वर्षं झाली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रत्येक दिवस काही ना काही घडामोड घडवणारा होता. त्यांचे जीवन समजण्यासाठी हा प्रत्येक दिवस साजरा केला तरी कमीच पडेल. आज म्हणजे 6 जूनला 348 वा शिवराज्याभिषेक दिन आहे. दरवर्षी महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने साडेतीनशे वर्षांपूर्वी  हा ऐतिहासिक सोहोळा कसा झाला होता हे पाहणे उद्बोधक ठरेल.

मराठी तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1932 ला रायगडावर सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला आणि हिंदवी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तमाम मराठी समाजासाठी ही महत्त्वाची घटना होती. शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने चालू होती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून शिवराज्याभिषेकासाठी काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास करून माहिती जमा केली. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून लोकांना आमंत्रण देण्यात आले होते. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित  होते.

शिवाजी राजांनी सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले व त्यानंतर विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन केले. ते रायगडाला 12 मे 1674ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नसल्याने चार दिवसांनी ते प्रतापगडावरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सवा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि स्नान करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात महाराजांचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या आसनावर शिवाजी महाराज बसले. आठ प्रधान विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्याच जलकुंभातील पवित्र जलाने शिवाजी महाराजांवर अभिषेक करण्यात आला. राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकुन चिन्हांनी सजवलेले होते. 32 मण सोन्याचे त्यावेळी 14 लाख रुपये मूल्य असलेले भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. ‘शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. पवित्र मंत्रोच्चारात सोन्या-चांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषाने आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ’शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना याप्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे दान केली. समारंभ संपल्यावर शिवाजी महाराज पहिल्यांदा जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवे झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले. हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्याचा नेत्रदीपक सोहोळा संपला.

 शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ‘राज्याभिषेक शक’ ही स्वतःची नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी व मराठी लिपीतील नाणी चलनात आणली. पूर्वीची मोगलकालीन पद्धतीची लेखनपद्धती बदलून हिंदू पद्धतीची लेखनपद्धती विकसित करून मराठी भाषा शुद्धीकरण सुरू केले. परकियांच्या तावडीतून सोडविलेल्या गडकोट किल्ल्यांना पूर्वी असलेली मराठी नावे दिली. राज्याभिषेकानंतर परकीय सत्ताधिशांविरुद्ध आक्रमणे, मोहिमांचा धडाका लावला. त्यांची लढाई शक्तिशाली मोगल सत्ताधीश, दक्षिणेतील आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्याबरोबरच गोव्यातील पोर्तुगीज, सुरतेत पाय रोवून बसलेले इंग्रज व फ्रेंच, जंजिऱ्याचा सिद्धी जौहर अशा सर्वांशी होती. शिवाजीं महाराजांनी या सगळ्या शत्रूंचा संपूर्ण शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यांच्या बलस्थानाबरोबरच कच्च्या दुव्यांचाही विचार केला आणि आपल्या कुशल सेनापतीत्वाखाली स्वराज्यासाठी वाहून घेतलेल्या मावळ्यांच्या मदतीने सर्व शत्रूंना नामोहरम करून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.