ठसा – श्याम देशपांडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

साहित्य, वाचन आणि सांस्कृतिक चळवळीत वयाच्या सत्तरीतही सक्रिय असणारे श्याम देशपांडे साहित्य वर्तुळात श्यामराव नावाने सर्व सुपरिचित होते. त्यांच्या अकाली जाण्याने या चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे. विदर्भाची जन्मभूमी असलेले श्याम मराठवाडय़ात वाढले बहरले. वयाची सत्तरी गाठली असली तर उत्साह मात्र तारुण्याला लाजवेल असाच होता. आपल्या लक्षणीय कामाने ग्रंथसखा, ग्रंथमित्र ही आपली ओळख निर्माण केली. पुस्तकाच्या दुकानात बसून ते केवळ पुस्तक विक्रेताच नव्हते तर साहित्यिक वाचकांना जोडणारा दुवा होते. मराठवाडय़ातील वाचन आणि ग्रंथ चळवळीशी त्यांचा घनिष्ट संबंध होता. वेगवेगळय़ा विचारधारेची मानसे त्यांनी जोडली. पुस्तकावर तर त्यांचे भरभरून प्रेम होते. पुस्तकांचा विषय निघाला की प्रत्येकाच्या डोळय़ासमोर श्यामरावांचेच नाव समोर येत असे. सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर असोत की, सुधीर रसाळ, नाही तर प्राचार्य रा. रं. बोराडे असोत, नव्या आणि जुन्या पिढीतील लेखकांशी त्यांचा उत्तम स्नेह होता. मराठवाडा साहित्य परिषदेशी त्यांचा स्नेह होता. मसापचे पदाधिकारी म्हणून त्यांना कार्य करण्याची संधी मिळाली.

यवतमाळ जिल्हय़ातील पोहडूळ हे जन्मगाव असलेले देशपांडे शिक्षणाच्या निमित्ताने मराठवाडय़ात आले. संभाजीनगरात सरस्वती भुवन कला, वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी घेतली. मात्र सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा हा पुस्तक ग्रंथचळवळीकडे अधिक होता. विद्या बुक्समध्ये त्यांनी सुरुवातीच्या काळात नोकरी केली. तिथेच त्यांना श्यामराव ही आपुलकीची ओळख मिळाली. संभाजीनगर शहरातील विद्या बुक्स हे पुस्तकाचे दुकान साहित्यिक, कवींच्या भेटीचे एक ठिकाण बनले. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ते पुण्याच्या राजहंस या प्रकाशन संस्थेत दाखल झाले आणि राजहंस प्रकाशनचे संभाजीनगर हे विक्री केंद्र पुढे त्यांनी नावारूपाला आणले. विद्या बुक्समध्ये होणाऱया लेखकांच्या गप्पांचे ठिकाण नंतर बदलून राजहंस प्रकाशनच्या समर्थनगर येथील कार्यालयात कधी आणि कसे गेले ते कुणालाच कळले नाही. श्यामरावांच्या राजहंस कार्यालयात दर रविवारी त्यांचा सेवानिवृत्तांसाठी ‘संडे क्लब’ बघता बघता बराच फेमस झाला. संडे क्लबमध्ये महिन्याच्या रविवारी विविध क्षेत्रांतील सेवानिवृत्त मंडळी, लेखक, कवी, विचारवंत गप्पाटप्पा, संवादासाठी एकत्र येऊ लागले. मान्यवरांच्या मुलाखती, वाचलेल्या पुस्तकावर चर्चा असे उपक्रम आयोजित करण्यात श्यामरावांचा सक्रिय पुढाकार आणि सहभाग असायचा. डॉ. ऋषिकेश कांबळे, संजय आर्वीकर, धनंजय चिंचोलीकर, शाहू पाटोळे, दासू वैद्य, प्रवीण बर्दापूरकर, जनशक्ती चळवळीचे श्रीकांत उमरीकर ही नव्या पिढीतील मंडळी या उपक्रमाशी जोडली गेली. नव्या आणि जुन्या लेखक मंडळींचे हे गप्पांचे ठिकाण पुस्तकाचे दुकान आता श्यामरावांच्या अचानक निघून जाण्याने खऱया अर्थाने पोरके झाले आहे.

खरे तर श्यामरावांना वाणिज्य शाखेतही उत्तम करिअर करता आले असते. पण ते ग्रंथ व्यवहार व साहित्य चळवळींशी जोडले गेले. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील पहिल्यांदा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांची नजर श्याम देशपांडे या साहित्य वाचन चळवळीतील हाडाच्या कार्यकर्त्यांकडे गेली. त्यांनी देशपांडे यांना मसापच्या कार्यकारिणीत सहभागी केले. नंतर साहित्य महामंडळाचेही सदस्य केले. श्यामराव मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध उपक्रमात, संमेलनात तसेच विविध अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्ताने उपक्रमात सहभागी होत असत. संमेलन मसापचे असो नाही तर अखिल भारतीय असो. पुस्तक प्रदर्शनानिमित्ताने ते सहभागी असत. मुक्त पत्रकार म्हणून त्यांनी विविध संमेलनाचे वृत्त संकलनही केले. एवढय़ा सर्व आघाडय़ांवर काम करीत असतानाच त्यांनी आपल्यातील चोखंदळ वाचकही जपला. कोणत्या अभ्यासक्रमाचे कोणते पुस्तक कुठे मिळेल याची सविस्तर माहिती श्यामरावांकडे असायची, पण त्याचसोबत साहित्य क्षेत्रात कोणत्या लेखकाची कोणती पुस्तकं गाजतात याची खडान्खडा माहिती त्यांना असायची. म्हणूनच ते अनेकांसाठी माहिती केंद्र असायचे. राजहंस प्रकाशन संस्थेत ते रुजू झाल्यानंतर त्यांनी मराठवाडय़ात व्यवसाय तर वाढवला. पण त्याचबरोबर त्यांनी मराठवाडय़ातील अनेक चांगल्या लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी दिलीप माजगावकर यांना सुचवले. रसाळ सरांकडे पाठपुरावा करून त्यांनी त्यांचे उत्तम ललित, व्यक्तिमत्त्व लेखाचे ‘लोभस’ हे पुस्तक राजहंसकडे सोपवले. अलीकडच्या पिढीतील नवीन लेखक रमेश रावळकर यांचे ‘टिश्यू पेपर’ हे पुस्तक सुचवले. श्यामरावांच्या सततच्या पाठपुराव्यातून राजहंस प्रकाशनातून ही दोन्ही महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली. असे हे श्याम देशपांडे अजातशत्रू, कलासक्त व पुस्तकप्रेमी होते, असे रसाळ सर म्हणतात, तर पुस्तकाचे ठिकाण आता पोरके झाले आहे, असे नरेंद्र चपळगावकर म्हणतात. नाना आणि बापू अशी ओळख असणारे नरेंद्र चपळगावकर आणि सुधीर रसाळ यांच्याशी तर श्यामरावांचा घरगुती, कौटुंबिक जिव्हाळा होता. श्यामराव ग्रंथसखा आणि अनेकांचे ग्रंथमित्र होते. त्यांच्या निधनाने ही पुस्तकांची चळवळ आता पोरकी झाली आहे. ग्रंथाचे घर आता तर रिक्त झाले आहे.