नाद- मराठी- मी डोलकर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

‘मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्जाचा राजा; घर पान्यावरी बंदराला करतंय ये-जा’ हे लतादीदी आणि हेमंत कुमार यांच्या स्वरातलं गाणं आठवा. पावसाळय़ाच्या आरंभी या पाण्याच्या गाण्याचं स्मरण उचितच. या मोसमात आकाशातून जलवर्षाव होईल…नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागतील आणि समुद्रालाही उधाण येईल. यावेळी ‘दर्याचा दरारा मोठा’ कसा असतो ते जाणवेल. ‘डोंगरलाटां’चं रौद्ररम्य रूप पाहायला मिळेल. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या शांता शेळके यांच्या या कोळीगीतासाठी हेमंत कुमार यांचा ‘दर्या’सारखा धीरगंभीर स्वरच गरजेचा होता. त्याने योग्य परिणाम साधलाय.

वाराणसी येथे 1920 मध्ये जन्मलेल्या हेमंत कुमार मुखोपाध्याय यांचं मूळ गाव बंगालमधलं बहारू. तिथून हे कुटुंब कालांतराने कोलकाता येथे आलं. हेमंतदांचं बालपण-शिक्षण सारं कोलकात्यामधलंच. यादवपूरच्या विद्यापीठात या हुशार विद्यार्थ्याने इंजिनीअरिंगसाठी प्रवेशही घेतला होता, परंतु त्याच्यापुढे तीन पर्याय होते. अर्थात अंतर्मनातले. लेखनाची आवड होती. लघुकथा लिहिल्या तर छापल्याही जात होत्या, पण त्याचबरोबर गोड गळय़ामुळे गाण्याचीही अनिवार ओढ होती. शेवटी इंजिनीअरिंग अर्ध्या वाटेवर सुटलं, लेखन थांबलं आणि हेमंत कुमार नावाचा एक गायक हिंदुस्थानला मिळाला. वयाच्या सतराव्या वर्षी हेमंतदांची पहिली बंगाली गाण्याची रेकॉर्ड प्रसिद्ध झाली. आता मागे वळून बघायची गरज नव्हती. गाण्याबरोबरच ते संगीतही देऊ लागले. ‘प्रिया बाधावी’ या बंगाली चित्रपटाला दिलेलं त्यांचं संगीत लोकप्रिय झालं.

त्यानंतर देशपातळीवर त्यांचा स्वर घुमला तो हिंदी सिनेसृष्टीमधून. 1931 नंतर ‘बोलू’ लागलेल्या चित्रपटाला पार्श्वगायनाचं तंत्रही लवकरच लाभलं आणि गोड गळय़ाच्या अनेक गायक-गायिकांचं भलं झालं. त्यांच्या कलेला न्याय मिळाला. हेमंतदा यांनी ‘इरादा’ चित्रपटासाठी आवाज दिला. त्यानंतर या स्वराने अनेक संगीत दिग्दर्शकांचं लक्ष वेधून घेतलं. तसा 1940 मध्येच बंगाली चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचा एस. डी. बर्मन यांच्याशी परिचय झालाच होता. पुढे इतर अनेक संगीतकारांकडे त्यांची गाणी सजली. ‘बीस साल बाद’, ‘खामोशी’ अशा चित्रपटांना हेमंतदांनी अप्रतिम संगीत दिलं. तसंच ‘नागीन’मधल्या त्यांच्या ‘तन डोले मेरा मन डोले’ या लतादीदींच्या स्वरातील गाण्याने रसिकांना डोलायला लावलं.

‘बीस साल बाद’मधली ‘बेकरार  करके हमे यूं न जाइये’ किंवा ‘जरा नजरों से कह दो जी’ ही गाणी प्रचंड गाजली. ‘सीआयडी’मधलं ‘है अपना दिल तो आवारा’ अशी गाणीही तरुणांना आपली वाटू लागली. याशिवाय ‘न तूम हमें जानो…’, ‘याद किया दिल ने कहां हो तुम’सारखी लतादीदींबरोबरची युगलगीतं किंवा ‘ये रात ये चांदनी फिर कहां,’ ‘ये नयन डरे डरे’, ‘तुम्हारा इन्तजार है, पुकार लो’, ‘तेरी दुनिया मे दिल लगता नही’ अशी कितीतरी गाणी… आजही ती कुठूनही कानावर पडली की, सध्या चाळीस ते ऐंशी वयोगटातल्या लोकांना मोहून टाकतात. या प्रत्येक गाण्यातला हेमंतदांचा गाभाऱ्यातून आल्यासारखा घुमणारा स्वर भारून टाकतो.

हिंदीमध्ये हेमंतदांचं खास स्थान होतंच, पण त्यांनी बंगाली, भोजपुरी, आसामी, गुजराती अशा अनेक भाषांमधली गाणी गायिली. मराठीतही त्यांच्या नावे आठ-दहा गाणी आहेत. विशेष म्हणजे त्यातील बहुतेक गण्यांना आजही तितकीच लोकप्रियता  मिळते. ‘मी डोलकर’ हे त्याचंच उदाहरण, परंतु जी गाणी फारशी ठाऊक नाहीत ती नेटवरून जरूर ऐका. एक वेगळाच आनंद मिळेल.

‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’ हे सुधीर मोघे यांचं गाणं पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील हे गीत आजही तितकंच ताजं वाटतं. हे युगलगीत आशाताईंबरोबरचं आहे. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटाचं संगीत ‘आनंदघन’ म्हणजे लता मंगेशकर यांचं आहे. त्यातील शांता शेळके लिखित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या गाण्यात  पाच स्वर आहेत. लता, मीना, उषा, हृदयनाथ आणि आरंभीच्या चार ओळी हेमंत कुमार यांच्या स्वरातल्या. त्यासाठी आवश्यक तो धीरगंभीर स्वर लतादीदींना हेमंतदांच्या गळय़ातच जाणवला.

‘तुझे असून तुजपाशी, परि जागा चुकलासी’ हे मधुसूदन कालेलकर यांचं आणि शंकरराव कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं हेमंत कुमार गातात. ‘दर्यावरी रं तरली होरी रं’ हे शांताराम नांदगावकर यांचं गाणं आणि संगीत प्रदीप-विलास यांचं. तसंच ‘प्रीत तुझी मनमोहिनी’ या वंदना विटणकर यांच्या हेमंतदांनी गायिलेल्या गाण्याचं संगीतही याच जोडीचं. ‘हा कारवा चालला’ या नांदगावकरांच्या गाण्याला अनिल-अरुण यांनी संगीत दिलंय. ही गाणी क्वचित रेडिओवर लागत असतील. नेटवरून मात्र ऐकता येतील.

हेमंत कुमार यांचं आणखी एक चटकन आठवणारं आणि गाजलेलं गाणं म्हणजे ‘प्रीतीच्या चांदराती घेऊनि हात हाती… ये ना’. शांताराम नांदगावकर यांचं अनिल-अरुण यांनी संगीत दिलेलं हे भावगीतसुद्धा गुणगुणून पहा. अशी ही हेमंत कुमार यांची आठ मराठी गाणी रसिकांच्या आजही आठवणीत आहेत.