आभाळमाया : वाढती ग्रहसंख्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>वैश्विक, [email protected]

गेल्या काही वर्षांत ‘हबल’ अवकाश दुर्बिणीने आपल्या आकाशगंगेतील दूरस्थ ताऱयांभोवती फिरणाऱया अनेक ग्रहांचा शोध लावला आहे. त्यापैकी पंचवीस-तीस तरी पृथ्वीसारखे वसाहतयोग्य असावेत असं म्हटलं जातं, परंतु तिथे सूक्ष्म सजीव किंवा जीवसृष्टी आहे की नाही याचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत. हा शोध अखंड सुरू राहणार आहे. एकेका दीर्घिकेत शंभर ते दोनशे अब्ज तारे असतील तर त्यांच्यापैकी अनेक ताऱयांना ग्रहांचं कुटुंब लाभलेलं असायला काहीच हरकत नाही. अशा एखाद्या ग्रहावर सजीव असणं अशक्य नाही हे आपण आपल्या स्वतःच्या पृथ्वीवरील अस्तित्वावरून सांगू शकतो. सबंध विश्वात फक्त एका पृथ्वीवरच योगायोगाने सजीवसृष्टी बहरली असं मानायचं तर इतर हजारो ग्रहांवरही तसा ‘योगायोग’ घडू शकतो किंवा घडलाही असेलच असं मानायला जागा आहे. अर्थात ते निःसंशय सिद्ध झाल्याशिवाय वैज्ञानिक शिस्तीत बसणारं नाही.

परंतु आपल्या विराट विश्वाचं साकल्याने आकलन होण्याचा काळही फार मोठा नाही. आधुनिक खगोलशास्त्र्ा आणि यंत्रयुगाचा मेळ घालून अवकाशगामी वाहनं तयार झाली त्याला साठेक वर्षे झालीयत. या सहा शतकांतली जगभरची अंतराळ संशोधनाची प्रगती लक्षणीय असली तरी विश्वाचा एकूण आवाका लक्षात घेता ती फारच कमी आहेत. अजूनही हे संशोधन बाल्यावस्थेत आहे. आणखी पाचशे हजार वर्षांनी विश्वरचनेतील असंख्य कोडी उलगडलेली असतील.

एका बाजूला विराट विश्वाचा शोध घेताना संपूर्ण पृथ्वी आणि त्यावरचे सर्व सजीव यांचा तरी पूर्वपरिचय आपल्याला झाला आहे का? तसं शंभर टक्के म्हणता येणार नाही. त्यातही संशोधन सुरूच आहे. म्हणजेच संशोधन अव्याहतपणे सर्व क्षेत्रांत करत राहावं लागतं. पृथ्वीवरील अनेक ‘नव्या’ कीटकांचा परिचय आपल्याला अधूनमधून होत असतो.

सूर्याभोवती फिरणाऱया ग्रहांबद्दलही तसंच काहीसं आहे. पूर्वी आपल्याकडच्या ‘नवग्रह’ स्तोत्रात ‘नऊ’ ग्रह होते. त्यापैकी सूर्य हा तारा, चंद्र हा उपग्रह आणि राहू-केतू हे पृथ्वी-चंद्राच्या कक्षांचे छेदनबिंदू असल्याचं सिद्ध झालंय. आधुनिक विज्ञान जी ग्रहमाला म्हणते तिचे सभासद म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून. आता ही ‘अष्टग्रही’ झाली. पूर्वी ‘प्लुटो’ला ग्रह मानलं होतं, पण त्याच्या कक्षेत इतर अशनी वगैरे असल्याने त्याचं ग्रहपद 2004 मध्ये रद्द होऊन तो खुजा ग्रह (ड्वार्फ प्लॅनेट) ठरला हे आपण पूर्वीही जाणून घेतलंय.

मंगळ आणि गुरूमध्ये एका ‘ग्रहा’ची जागा होती. तिथे जो अशनींचा पट्टा आहे तिथे एकेकाळी ग्रह असल्याचा कयास आहे. तसेच प्लुटोच्या पलीकडे असलेल्या किपर पट्टय़ातही बरेच अशनी भटकत असून त्यापैकी काही आकाराने खूप मोठे आहेत. आता प्लुटोच्या पलीकडचा ग्रह शोधताना ‘ग्लोबिन’ नावाचा प्लुटोसारखाच खुजा ग्रह सापडल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.

अवघ्या 300 किलोमीटर व्यासाचा हा ‘ग्लोबिन’ 2015 मध्येच संशोधकांना पहिल्यांदा दिसला होता. त्याचं तांत्रिक नाव ‘टीजी 387’ असं असून असे तीन खुजे ग्रह आतापर्यंत सापडले आहेत. ‘ग्लोबिन’ हा आपल्या सूर्यमालेच्या अगदी टोकाच्या कक्षेतून फिरणारा खुजा ग्रह आहे.

हा ग्रह शोधणाऱया पथकापैकी स्कॉट शेफर्ड म्हणतात की, ‘ग्लोबिन’ सूर्यापासून 2300 ‘ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट’ अंतरावर आहे. ‘ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट’ किंवा ‘एयू’ म्हणजे सूर्य ते पृथ्वी हे 15 कोटी किलोमीटरचं अंतर. 15 कोटी गुणिले 2300 एवढय़ा किलोमीटर दूरवरून ग्लोबिन आपला सूर्याभोवती फिरतो.

सूर्याच्या एवढय़ा दूर असल्याने त्याची कक्षा अर्थातच प्रचंड आहे. त्यामुळे या खुजा ग्रहाला सूर्य परिक्रमा करायला 40 हजार वर्षे लागतात याचा अर्थ ग्लोबिनचं एक वर्ष आपल्या चाळीस हजार वर्षांइतकं असतं त्याची कक्षा इतकी लांब वर्तुळाकार आहे की, ग्लोबिन सूर्याला ‘जवळ’ असतो तेव्हा 65 ‘एयू’ अंतरावर येतो आणि दूर असताना 2300 एयूपर्यंत जातो.

विस्मयकारी विश्वातल्या या दूरच्या वाटल्या तरी आपल्याच सौर कुटुंबातल्या म्हणजे ‘अगदी जवळच्याच’ घडामोडी आहेत. मात्र आपल्या सौर कुटुंबातील पृथ्वीला आणखी छोटीमोठी भावंडं आपल्याला अज्ञात आहेत ते नव्याने एखाद्या ग्रहाचा शोध लागल्यावर समजतं. अवकाशस्थ दुर्बिणी तर हे काम यांत्रिकपणे करतातच,  पण पृथ्वीवरच्या दुर्बिणींना डोळे लावून बसलेले संशोधक सततचा ध्यास घेऊन विश्वाच्या अंतरंगाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात. ‘ग्लोबिन’ किंवा ‘खटय़ाळ’ या टोपणनावाने सापडलेला हा खुजा ग्रह त्यापैकीच. तसे आणखी किती सापडतात पाहायचं.