
>> वैश्विक – [email protected]
रात्रीचं निरभ्र आकाश न्याहाळण्याचे दिवस आता हळूहळू संपतील. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या आकाशदर्शनाचा आनंद पाच-सात वर्षांपूर्वीपर्यंत मनमुराद घेता यायचा. शेकडो खगोलप्रेमींच्या समूहाने आकाशाखाली रात्रभर बसून पण आकाशाकडे डोळे लावून केलेले शेकडो यशस्वी कार्यक्रम अनेकांना आयुष्याची दिशाही दाखवून गेले. मागच्या काही काळात मात्र जगभरच्या बदलत्या हवामानाने त्यात चांगलाच खोडा घातला. तसा पहिला अनुभव आम्हाला 1998 मध्येच आला होता. सिंह राशीच्या पार्श्वभूमीवर दिसणारा वार्षिक उल्का वर्षाव पाहाण्याचा ‘फेवरेबल’ म्हणजे सर्वोत्कृष्ट काळ त्या वर्षी होता.
आमच्या खगोल मंडळाने जय्यत तयारी केली. सुमारे तीन हजार प्रेक्षकांची अपेक्षा आम्ही करत होतो. आदल्या रात्री वांगणीच्या फिल्डवर पूर्वतयारीसाठी गेलो आणि ताशी 200 ते 250 उल्का आणि ‘फायरबॉल’ची (अग्निगोलक) आतषबाजी पाहायला मिळाली. खूप आनंदात घरी परतलो. दुसऱया दिवशी संध्याकाळपासूनच तिथे लोकांची रीघ लागली. 50 हजार प्रेक्षक जमले.
…आणि रात्री दहाच्या सुमारास अचानक नभ मेघांनी आक्रमिले! साऱया कार्यक्रमावर पाणी पडलं. त्या ‘ग्रॅण्ड फ्लॉप शो’चं चित्रीकरण आजही आमच्याकडे आहे. प्रेक्षक निराश झाले, पण रागावले नाहीत. उलट आमच्या कार्यकर्त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून त्यांनी आमचं कौतुकच केलं. वांगणी ग्रामपंचायतीने तर आमच्या आकाशदर्शन जागेकडे जाणाऱया रस्त्याला ‘तारांगण मार्ग’ असं नावही दिलं.
हा ‘फ्लॉप शो’ एक अपवाद होता. मात्र ‘ग्लोबल क्लायमेट चेंज’मुळे आता ही परिस्थिती वारंवार उद्भवतेय. अनेक कार्यक्रम ढगाळ हवामानामुळे रद्द करावे लागतात. त्यातच यंदा ‘कोरोना’चा कहर झाल्यामुळे सगळेच कार्यक्रम रद्द झालेत. ‘कोरोना’मुळे या महिन्यात घराबाहेर पडूच नका. आकाश जसं निसर्गाच्या लहरीवर बेभरवशाचं ठरत असताना लोक आकाशदर्शनाला का येतात? याचं एकमेव कारण म्हणजे दुर्बिणीद्वारा विराट विश्वात डोकावण्याची मिळत असलेली संधी. शिवाय आमचे अभ्यासक संपूर्ण आकाशाची उत्तम ओळख करून देतात त्यामागचं विज्ञान स्पष्ट करतात.
सर्वसामान्यांना आकाशातल्या अनेक गोष्टी चकित करतात. चंद्रावरचे खड्डे आणि शनि ग्रहाची कडी या तर नेहमीच्याच गोष्टी झाल्या, पण त्यापलीकडे जाऊन कधी ‘जवळ’ येणाऱया मंगळ ग्रहाचं तेजस्वी दर्शन, एखादा सुंदर धूमकेतू आणि अगदी रोज सायंकाळी दिसणारे मानवनिर्मित उपग्रहसुद्धा ‘पाहता’ येतात याचं कुणालाही अप्रूप वाटेलच.
गेल्या अनेक वर्षांत आकाश ‘पाठ’ झालेल्यांना नयनरम्य मृग नक्षत्रामधला लालसर रंगाचा बिटेज्युज किंवा काक्षी अथवा भरत नावाचा तारा चांगलाच परिचित आहे. मुंबईसारख्या महानगरातूनही मृग नक्षत्र बऱयापैकी दिसतं आणि त्यातील तारे न्याहाळता येतात.
तर हा काक्षी तारा ‘लाल? असल्याचं कारण म्हणजे तो मृत्युपंथाला लागलेला ‘रेड जायंट’ आहे. या रक्तवर्णी म्हाताऱयाचं वय झालंय. थोडक्यात तो म्हाताराही झालाय. ताऱयांचंही ठराविक जीवन असतं. आपल्या सूर्याचं आयुष्य दहा अब्ज वर्षांचं. त्यातली पाच अब्ज वर्ष संपली. सूर्य आता पोक्त वयात आलाय. आणखी चार-साडेचार अब्ज वर्षांनी त्याचाही चेहरा लालसर होईल. आकार प्रचंड वाढेल. त्याच्या झपाटय़ात मंगळापर्यंतचे ग्रह येतील. म्हणजे पृथ्वी आलीच.
अशा मृत्युपंथाला लागलेल्या ताऱयांचा विस्फोट (एक्सप्लोजन) ‘पाहायला’ मिळणं कठीणच. परंतु सध्या आकाशात मृगातील ‘काक्षी’ आणि वृश्चिक राशीतला ‘ज्येष्ठा’ हे तारे विस्फोटाच्या उंबरठय़ावर उभे आहेत. अर्थात तिथे जे घडेल ते आपल्याला प्रकाशवर्षाच्या हिशेबाने दिसणार. ‘काक्षी’ तारा आपल्यापासून सुमारे 600 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. याचा अर्थ तिथला विस्फोट आपल्या 600 वर्षांनी दिसेल. आता दिसला तर तो 600 वर्षांपूर्वीच झालेला असेल.
आपल्या आकाशातल्या ताऱयांपैकी काक्षी हा 10 वा तेजस्वी तारा आहे. अशा विस्फोट होणाऱया ताऱयांचं वस्तुमान आणि वय खूप कमी असतं. ‘काक्षी’चं वय सुमारे 90 लाख वर्षे. त्यातली 80 लाख संपली. म्हणजे त्याचा अंतकाळ जवळ आला असावा म्हणून 2018 पासून तो ‘मंद’ दिसू लागल्यावर अभ्यासक कोडय़ात पडले. पण नंतर लक्षात आलं की त्याचं मंदावणं हे अवकाशस्थ धुळीच्या प्रचंड ढगामुळे आहे. म्हणजे तिथेही ‘ढगाळमाया’ आहेच! हळूहळू तो पुन्हा तेजस्वी होतोय. या महिन्यात तो साधारण रात्री नऊच्या सुमारास मृग नक्षत्राबरोबरच छान दिसेल. ‘कोरोना’ची आपत्ती टळून घराबाहेर पडण्याची परवानगी मिळाली तरच बाहेर पडा. अन्यथा शक्य असल्यास खिडकीतूनच मृगदर्शन घ्या. ‘सर सलामत तो पगडी पचास’ आधी पृथ्वीवरच्या माणसांची काळजी घेऊ. आकाश नंतर पाहू. सध्या पश्चिमेला खिडकी असेल तर तेजस्वी शुक्र जरूर पहा.




























































