महाराष्ट्राची क्रिकेट क्वीन

35

>> जयेंद्र लोंढे

आयसीसीकडून मिळालेल्या पुरस्कारानंतर स्मृती मंधाना आणखी चमकदार खेळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. अपेक्षा वाढल्यात याची जाणीव तिला आहे. देशाला वर्ल्ड कपही तिला जिंकून द्यायचा आहे. महाराष्ट्राची ही क्रिकेट क्वीन त्यात यशस्वी होवो हीच सदिच्छा!

मुंबईसह महाराष्ट्राने हिंदुस्थानलाच नव्हे जागतिक क्रिकेटला मौल्यवान क्रिकेटपटू दिलेत. अजित वाडेकर, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर यांसारख्या अद्वितीय मुंबईकरांनी देशाचा झेंडा सातासमुद्रापार दिमाखात फडकवलाय. एकीकडे मुंबईतील पुरुषांनी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करीत आपले नाणे खणखणीत वाजवले, मात्र महाराष्ट्रातील महिला क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवता आलेला नव्हता. तथापि अलीकडील काळात मुंबईसह महाराष्ट्रातून एकापेक्षा अशा सरस महिला क्रिकेटपटू नावारूपाला येत आहेत. पूनम राऊत, अनुजा पाटील, जेमीमा रॉड्रिग्स ही त्यापैकी काही नावे. हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने मात्र एक पाऊल पुढे टाकून आपली ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राचीच नव्हे हिंदुस्थानी क्रिकेटची ‘स्टार’ खेळाडू म्हणून ती ओळखली जात आहे. गेल्या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू तसेच वन डेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून आयसीसीने तिला गौरवले आहे. आयसीसीच्या दोन मानाच्या पुरस्कारासाठी निवड झालेली ती पहिलीच हिंदुस्थानी खेळाडू ठरलीय.

स्मृती मंधानाचा जन्म 18 जुलै 1996 साली मुंबईत झाला, पण ती दोन वर्षांची असताना तिचे कुटुंब सांगली येथे स्थलांतरित झाले. वडील व भाऊ हे जिल्हास्तरीय क्रिकेट खेळत असल्यामुळे तिलाही या खेळाची ओढ वाटू लागली. आपसूकच तिची पावलेही या खेळाकडे वळली. वयाच्या नवव्या वर्षी महाराष्ट्राच्या 15 वर्षांखालील तसेच वयाच्या 11 व्या वर्षी महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील संघातून खेळणाऱया स्मृती मंधानामध्ये असलेल्या क्रिकेटमधील अफाट गुणवत्तेची यावरून प्रचीती येते.

पश्चिम विभागीय 19 वर्षांखालील वन डे स्पर्धेत तिने हिंदुस्थानी महिला क्रिकेट इतिहासातील नव्या विक्रमाला गवसणी घातली. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने गुजरातविरुद्धच्या लढतीत 150 चेंडूंत 224 धावांची संस्मरणीय खेळी साकारली. याप्रसंगी वन डे लढतीत द्विशतक झळकावणारी ती पहिलीच हिंदुस्थानी महिला क्रिकेटपटू ठरली होती. यानंतर तिने मागे वळून बघितले नाही. 2013 मध्ये वन डे तसेच ट्वेण्टी-20 आणि 2014 मध्ये तिने कसोटी क्रिकेटमध्ये श्रीगणेशा केला. वन डेत तीन खणखणीत शतके व तेरा दमदार अर्धशतके आणि ट्वेण्टी-20 त सहा शानदार अर्धशतके झळकावत तिने देशासाठी मोलाची कामगिरी बजावलीय.

जेमतेम 22 वर्षांच्या स्मृती मंधाना हिच्या खांद्यावर हिंदुस्थानी महिला संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. लहान वयामध्ये तिच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली असली तरी तिच्या खेळातून कोणताही दबाव दिसून येत नाही. मुंबईतील खेळाडूंमध्ये असलेला ‘बेडर’पणा तिच्या देहबोलीतून जाणवतो. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या बलाढय़ देशांतील खेळाडूंना भिडायचे हेच तिला माहीत आहे. संघाला सोबत घेत विजयासाठीच मैदानात उतरायचे असा तिचा बाणा असतो.

हिंदुस्थानने गेल्या काही काळामध्ये क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलीय. यामध्ये तिच्या फलंदाजीचाही मोलाचा वाटा आहे. तिच्या फलंदाजीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ती फक्त नेटवरच सराव करीत नाही, तर हॉटेलमधील रूममध्येही फलंदाजीचे कसब आत्मसात करीत असते. याला म्हणतात ‘शॅडो पॅक्ट्रिस’. या सरावात चेंडू आपल्याजवळ नसतो. फक्त बॅटने हालचाली करायच्या. त्यामुळे आपल्या फलंदाजी तंत्रात सुधारता होते.

स्मृती मंधाना ही डावखुरी फलंदाज. त्यामुळे नजाकत ही तिच्या फलंदाजीत असेल हे वेगळे सांगायला नको. डेव्हिड गॉवर, ब्रायन लारा यांसारख्या स्टायलिश फलंदाजांपैकी ती एक. तिने मारलेले बॅकफूट कट, कव्हर ड्राईव्ह हे तर डोळ्यांचे पारणे फेडतात. फिरकीपटूंना पुढे जाऊन मारलेले फटके तर लाजवाबच. ती आपल्या आक्रमक फटकेबाजीने ओळखली जात आहे. अनुभवी खेळाडू मिताली राजच्या खांद्याला खांदा लावून ती फलंदाजी करते हे विशेष. सलामीला येऊन हिंदुस्थानला आश्वासक सुरुवात करून देण्यात ती तरबेज.

आयसीसीकडून मिळालेल्या पुरस्कारानंतर स्मृती मंधाना आणखी चमकदार खेळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. अपेक्षा वाढल्यात याची जाणीव तिला आहे. देशाला वर्ल्ड कपही तिला जिंकून द्यायचा आहे. महाराष्ट्राची ही क्रिकेटक्वीन त्यात यशस्वी होवो हीच सदिच्छा!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या