ठसा – अजित नरदे

876

शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते, साखर डायरीचे संपादक, साखर उद्योगाचे गाढे अभ्यासक अजित नरदे यांच्या निधनाने शेतकरी चळवळीमध्ये  पोकळी निर्माण झाली. अजित नरदे यांनी खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन करत जी. एम. तंत्रज्ञानाचा वापर करावा, शेती क्षेत्रातील खुल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी त्यांनी आपली मते परखडपणे मांडली. शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी चळकळीत कार्यरत असताना त्यांचा साखर उद्योगावरील गाढा अभ्यास वाखाणण्याजोगा होता. त्यांनी साखर डायरीच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण साखर कारखानदारीचा लेखाजोखा संग्रहित केला होता. आजही साखर डायरीतील संग्रहाचे या उद्योगाला मार्गदर्शन होत आहे. साखर उद्योगातील नेमक्या दुखण्यावर बोट ठेवत आपल्या लिखाणातून त्यांनी स्पष्टपणे केळोकेळी प्रहार केला. अजित नरदे यांचे वडील नागेंद्र हे जयसिंपूर येथील स्वातंत्र्यसैनिक. स्वातंत्र्यढय़ात अनेक वेळा ते वेगवेगळ्या जेलमध्ये गेले. इंग्रजांविरुद्ध देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे आणि लढणारे जाज्वल्य कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. आपल्या वडिलांसारखेच क्रांतिकारी, पडद्यामागे राहून आणि प्रसिद्धीपासून चार हात लांब राहून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे बीटी कापसाच्या लागवडीला सरकारने 2002 साली परवानगी दिली. त्यामुळे हिंदुस्थानात कापसाचे उत्पादन वाढले. हिरव्या बोंडआळीला प्रतिकार करण्याची क्षमता असलेले हे बियाणे शेतकऱ्यांना वरदान ठरले. हे बियाणे वापरायला मिळाले पाहिजे यासाठी शेतकरी संघटनेने संघर्ष केला. यामध्ये अजित नरदे यांचा मोठा वाटा आहे. विविध आघाडया सांभाळणारे अष्टपैलू आणि अनन्यसाधारण असे हे व्यक्तिमत्त्व होते.

  • मेधा पालकर
आपली प्रतिक्रिया द्या