सोलापूरची ओळख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सीमंतिनी चाफळकर

नरसिंग गिरजी मिल म्हणजे एन.जी. मिल अर्थात सोलापुरात कधीकाळी असणाऱ्या अनेक कापड गिरण्यांपैकी एक एवढीच या मिलची ओळख नाही. सोलापूरच्या सांस्कृतिक, औद्योगिक इतिहासात या मिलचे महत्त्वाचे स्थान आहे. ही फक्त गिरणी नाही तर सुबक कोरीव काम असलेली चार मजली भव्य वास्तू आहे. कलोनियल इंडो बरोक शैलीचा उत्तम नमुना असलेली संपूर्ण देशातील ही एकमेव मिलची इमारत असावी.

प्रत्येक शहराची एक ओळख असते. ही ओळख तेथील संस्कृती, माणसं, परंपरा अशा अनेक घटकांमुळे बनते. अनेकदा एखाद्या वास्तूलाही शहराची ओळख बनण्याचा बहुमान मिळतो. त्या शहराशी, गावाशी ‘त्या’ वास्तूचे नाते एवढे घट्ट असते की ती एक ऐतिहासिक ठेवाच बनून जाते आणि जेव्हा या ठेव्याच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो तेव्हा ते गाव, शहर, तेथील माणसं भेदाच्या भिंती ओलांडून त्या वास्तूच्या संरक्षणासाठी उभे ठाकतात. सध्या अशीच एक स्वाक्षरी मोहीम सोलापुरात सुरू आहे आणि ती सुरू आहे ‘एन. जी. मिल’साठी. ‘एन. जी. मिल वाचवू’ या नावाने सुरू असलेल्या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एन. जी. मिल म्हणजे नरसिंग गिरजी मिल. सोलापुरातील एक महत्त्वाची कापड गिरणी. राज्यातील इतर असंख्य गिरण्यांप्रमाणे ती मागील दीड दशकापासून बंदच आहे. मात्र फक्त एक कापड गिरणी एवढेच तिचे सोलापूर शहराशी नाते नव्हते. सोलापूरच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक इतिहासात एन. जी. मिलचे स्थान महत्त्वपूर्ण राहिले आहे.

महाराष्ट्रात मुंबई, नागपूर नंतर कापड गिरण्यांचे शहर म्हणून उल्लेख केला जातो तो सोलापूरचा. एकेकाळी या कापडगिरण्या सोलापूरच्याही जीवनदायिनी होत्या. गिरणी कामगार ही संस्कृती येथेही रुजली होती. मात्र 80 च्या दशकात जो इतर शहरांतील कापड गिरण्यांचे आणि तेथील कामगारांचे झाले तेच सोलापुरातील या उद्योगाचेही झाले. हा संपूर्ण उद्योगव्यवसाय बंद पडला. नरसिंग गिरजी मिल ही या बंद पडलेल्या गिरण्यांपैकीच एक. 1898 ते 2002 असा तिचा एकूण प्रवास. ही मिल उभी राहिली ती आधुनिक सोलापूर शहराचे शिल्पकार अप्पासाहेब वारद यांच्या नेतृत्वाखाली. सोलापुरातील स्थानिक व्यक्तीने पुढाकार घेऊन स्थापन केलेली ही पहिली मिल होती. आजही तीन पिढ्या मिलशी संबंध असलेली हजारो कुटुंबे सोलापुरात आहेत. वारदांचे भागीदार म्हणून हैदराबादचे गिरजी घराणे सामील झाले. पुढे वारदांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांनी गिरणी सांभाळली.

गिरणीची मुख्य इमारत भव्य व चार मजली आहे. दर्शनी बाजूवर बसाल्ट दगडातील कोरीव काम संपूर्ण देशात एकमेव म्हणता येईल असे आहे. त्यात वेगवेगळ्या रंगाच्या दगडांचा व नाजूक विटांचा वापर केल्याने सौंदर्य आणखी वाढले आहे. चुन्यातील नक्षीदार कामही मोठया प्रमाणात आहे. परिसरात इतर अनेक छोटया मोठया इमारती, गोदामे आहेत. अतिथीगृहे, कर्मचारी वसाहती.. त्यातील अनेक अतिशय सुंदर रीतीने बांधली आहेत. कमानींची तीन मजली विहीर जी गिरणीच्या पूर्वीपासून तिथे असावी व तिच्या काठावर मारुती मंदिर अतिशय प्रेक्षणीय जागा आहे. याशिवाय भव्य प्राचीन वृक्ष, तीन प्रचंड पाण्याच्या टाक्या व विटांत बांधलेली चुन्याच्या गिलाव्याची उंच रेखीव चिमणी हेही आहे. इथल्या अतिथिगृहात लोकमान्य टिळकांपासून बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांपर्यंत अनेक लोकोत्तर व्यक्ती राहून गेल्याचे उल्लेख आहेत.

2002 नंतर महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात गिरणीचा परिसर आहे. दोन वर्षांपूर्वी तिथे गारमेंट पार्क उभारण्याची घोषणा झाली व अलीकडे म्हाडाला जागा विकण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. या मिलच्या वास्तूचा समावेश सोलापूर शहराच्या हेरिटेज वास्तूंच्या ग्रेड एक प्रकारात आहे. 1898 साली बांधली गेलेली मिलची मुख्य इमारत कलोनियल इंडो बरोक शैलीचा उत्तम नमुना समजली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात, किंबहुना संपूर्ण देशात इतके उत्तम दगडी कोरीव काम केलेली मिलची इमारत ही एकमेव आहे. तिचे आंतरराष्ट्रीय मानकानुसार जतन संवर्धन केल्यास देशी-विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरेल इतकी तिची योग्यता वास्तुकला, ऐतिहासिक व तांत्रिक निकषावर आहे. मिल परिसरातील वास्तूंचे जतन संवर्धन करून पुन्हा उपयोगात आणून नवे जीवन देणे, पर्यावरण, इतिहास व संस्कृती या सर्व दृष्टीने उचित ठरणार आहे. तसेच हा भाग शहराच्या मध्य भागात असल्याने या ठिकाणी प्रदर्शन व संमेलन संकुल (EXHIBITION – CONVENTION CENTER ) कला संकुल, वस्त्रोद्योग वस्तुसंग्रहालय तसेच उद्यान म्हणून विकसित केल्यास शहराच्या नागरिकांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त व शहराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरणार आहे. म्हणून ‘इंटॅक’ या नागरिकांच्या सहभागातून ऐतिहासिक वारसा जतन-संवर्धन करणाऱ्या संस्थेने पुढाकार घेत एन. जी. मिल प्रकल्पाचाही अभ्यास केला.

सरकारचे आर्थिक नुकसान न होता या मिलचा विकास करणे कसे शक्य आहे, याचा अहवालही संस्थेने राज्य सरकारला दिला आहे. राज्य शासनाने जागा विकताना सदर जागेतील सर्व महत्त्वांच्या वास्तूंचे जतन संवर्धन करण्याची अट ठेवून उर्वरित जागेच्या विकासाचा विचार करावा अशी संस्थेची भूमिका आहे तसेच महानगरपालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून सदर जागेचा विकास योजनेतून करावा अशी संस्थेची मागणी आहे. ही जागा खासगी विकासकामार्फत मूठभर उच्च वर्गीयांकडे न जाता सोलापूरच्या आम जनतेला वापरण्यासाठी विकसित व्हावी अशी सोलापूरकरांची इच्छा आहे. त्यामुळे संस्थेने सुरू केलेल्या ‘एन. जी. मिल वाचवू’ या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. सरकारने राजकारणाच्या व अर्थकारणाच्या पलीकडे जाऊन या परिसराचा सांस्कृतिकदृष्टया विचार करावा व सोलापूरचा एक ऐतिहासिक ठेवा वाचवावा अशी अपेक्षा आहे.

(लेखिका वास्तुविशारद व इंटॅक सोलापूर विभागाच्या समन्वयक तसेच वसाहतकालीन वास्तुकला या विषयाच्या अभ्यासक आहेत.)
[email protected]