
>> वैश्विक, [email protected]
गेल्या 14 ऑक्टोबरला अमेरिका खंडाच्या उत्तर आणि दक्षिण भागात सूर्यग्रहण एका मोठय़ा निरीक्षण-पट्टय़ावर फार छान दिसलं. त्याचं प्रक्षेपण जगभर झालं. संध्याकाळी आठनंतर ते आपल्या वेळेनुसार, हिंदुस्थानातून ‘पाहता’ आलं खरं, पण त्याच वेळी 15 जानेवारी 2010 रोजी सकाळच्या वेळी आपल्या देशातल्या कन्याकुमारी येथून जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं. त्यावेळी झालेला आनंद अक्षरशः गगनात मावत नव्हता. आमच्या खगोल मंडळातर्फे सुमारे दोनशे अभ्यासक आणि प्रेक्षकांना घेऊन आम्ही कन्याकुमारी येथे गेले होतो. खरं तर जेव्हापासून आपला हा खगोलीय कॉलम सुरू झालाय तेव्हापासून खगोल विज्ञानातल्या कितीतरी गोष्टी सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न केला. गेल्या चाळीस वर्षांत जे अवकाश रात्र-रात्र जागून वाचलं आणि भर दिवसाचेही काही विलोभनीय खगोल-आविष्कार बघितले ते शब्दात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गेल्या 14 ऑक्टोबरच्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचं सविस्तर वर्णन करायचं होतं, पण काही इतर महत्त्वाचे विषय समोर आले आणि हा विषय जरासा मागे पडला. आता आपल्याकडे सूर्यदर्शन तेजस्वी स्वरूपात होत आहे. तेव्हा सूर्यासह पृथ्वी-चंद्र यांचा एकत्रित आविष्कार कसा होतो ते पाहू या. पुढचं कंकणाकृती सूर्यग्रहण आपल्याकडून प्रत्यक्ष पाहण्यासाठी मात्र तरुण पिढीने 21 मे 2031 पर्यंत तयारी करायला हरकत नाही.
आम्ही 2010 मध्ये कन्याकुमारी येथून जे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिलं त्याचा लखलखीत ‘कंकणसूर्य’ कालावधी आठ ते नऊ मिनिटांचा होता. त्यामुळे भरपूर फोटो काढता आले. व्हिडीओ चित्रणही करता आलं. तो ठेवा आमच्याकडे आहे. 14 ऑक्टोबरला अमेरिकेतून दिसलेल्या ग्रहणाची ‘कंकणसूर्य’ स्थिती सहा ते सात मिनिटेच होती. पण त्यांना आपल्या सगळ्या गोष्टी ‘ग्रेटेस्ट’ असल्याची जाहिरात करता येते ही एक गंमतच.
तर चंद्र आणि सूर्यग्रहणं घडतात ती पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्या परस्पराभोवती फिरण्याने. पृथ्वी सूर्याभोवती तर चंद्र पृथ्वी आणि सूर्याभोवती फिरतो. पृथ्वी नसती तरी चंद्र थोडय़ा वेगळ्या कक्षेत सूर्याभोवती फिरत राहिलाच असता एवढं त्या जनक ताऱयाचं गुरुत्वाकर्षण प्रभावी आहे. चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या छायेत येतो, पण प्रकाशाचा स्रोत असलेल्या सूर्यावर ‘सावली’ पडणं शक्य नाही. मात्र चंद्र – पृथ्वी – सूर्य यांच्यातील स्थानबदलाच्या खेळामुळे सूर्याला चंद्र ‘झाकोळताना’ दिसतो. त्याचं गणित सोप्या शब्दांत सांगायचं तर पृथ्वी ते चंद्र या अंतरापेक्षा, पृथ्वी ते सूर्य हे अंतर सुमारे 400 पट आहे. तसंच सूर्यबिंबाचा व्यास चंद्रबिंबाच्या 400 पटच आहे. त्यामुळे आपल्याला प्रचंड आकाराचा सूर्य आणि अगदी छोटा चंद्र यांचे भासमान आकार सारखेच दिसतात. साहजिकच चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या बरोबर मधोमध जेव्हा येतो तेव्हा तो सूर्याला खंडग्रास किंवा खग्रास ‘ग्रहण’ लावू शकतो. यापैकी सूर्य त्याच्या जागीच आहे. परंतु त्याभोवती परिक्रमा करणारी पृथ्वी आणि चंद्र यांच्या परस्परातील स्थानबदलामुळे हा नैसर्गिक आविष्कार आहे. चंद्रग्रहण पृथ्वीच्या प्रचंड सावलीमुळे बराच काळ बघता येते. मात्र सूर्यग्रहणकाळात चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये काही मिनिटांपुरताच येऊ शकतो. तसं ग्रहण लागल्यापासून सुटेपर्यंत दोन-तीन तास जातात, पण सूर्याची खग्रास पिंवा पंकणाकृती स्थिती फारच कमी काळ राहते. जास्तीत जास्त 11 मिनिटे दिसू शकते. त्यातही खग्रास सूर्यग्रहणापेक्षा पंकणाकृती सूर्य अधिक काळ पाहायला मिळतो.
अर्थात त्यासाठी तुम्ही 125 ते 160 किलोमीटर रुंदीच्या ग्रहण – निरीक्षण मार्गावर नेमके कुठे आहात यावर ही गोष्ट ठरते. ‘एक्लिप्स पाथ’वर मध्यभागी असल्यास ग्रहण जास्त वेळ पाहण्याची संधी लाभते. या पट्टय़ाबाहेरच्यांना मात्र खंडग्रास सूर्यच दिसू शकतो. आम्ही 1980, 1995, 1999, 2007 आणि 2015, 2019 आणि अनेक खग्रास आणि पंकणाकृती सूर्यग्रहणं पाहिली. आधीची चार ‘खग्रास’ तर शेवटची दोन पंकणाकृती होती. 1980 ते 2020 हा काळ हिंदुस्थानवासीयांसाठी सूर्यग्रहणांची वैज्ञानिक पर्वणी देणारा होता. चंद्र, जेव्हा सूर्याला ग्रहण लावतो तो दिवस प्रत्येक वेळी अमावास्येचाच असतो हे लक्षात घ्या. म्हणजे अवसेच्या चंद्राचं काळय़ा गोलातील रूप आपण सूर्याआड आलेलं पाहात असतो. त्यामुळे अमावास्येला चंद्र ‘गुप्त’ होत नाही हेही सिद्ध होतं. आता, प्रत्येक खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र-पृथ्वी अंतर सारखंच नसतं. चंद्र पृथ्वी-सूर्याच्या मधोमध आला तरी पृथ्वी-चंद्र अंतर खूप कमी असलं तर ‘खग्रास’ सूर्यस्थितीचा काळ वाढतो तो फारच लांब गेला तर चंद्रबिंब सूर्याला झाकू शकत नाही. ते सूर्यबिंबाच्या मधोमध आले की त्याभोवती मागच्या सूर्याचे तेजस्वी ‘कडे’ किंवा ‘कंकण’ दिसते. त्यामुळे कंकणाकृती सूर्यग्रहण पाश्चात्य देशात ‘रिंग ऑफ फायर’ म्हणूनही ओळखले जाते. एरवी त्यासाठी इंग्लिश शब्द आहे, ‘अॅन्युलर’ एक्लिप्स किंवा कंकणाकृती ग्रहण. यापुढे हिंदुस्थानातून खग्रास सूर्यग्रहण देशाच्या उत्तर भागातून 20 मार्च 2034 रोजी दिसेल तर कंकणाकृतीसाठी 21 मे 2031ची संधी गमावली तर 23 जुलै 2093 ची वाट पाहावी लागेल.





























































