वैश्विक – कंकणसूर्य!

वर्षं संपता संपता 26 तारखेला एक विलोभनीय अवकाशस्थ घटना भरदिवसा घडत आहे. ती आहे कंकणाकृती सूर्यग्रहणाची. यापूर्वीचं कंकणाकृती सूर्यग्रहण 15 जानेवारी 2010 रोजी दक्षिण हिंदुस्थानातून दिसलं होतं. त्यावेळी संक्रांत आणि पोंगळ या सणाच्या दिवशी हे ग्रहण आलं होतं. हिंदुस्थानातून त्यावेळी ते अनेक वर्षांनी दिसत होतं. ‘खगोल मंडळा’तर्फे आम्ही मुंबईहून सुमारे दोनशे खगोलप्रेमींसह कन्याकुमारी येथे गेलो आणि तिथल्या विवेकानंद केंद्राच्या वसाहतीतून आम्ही सर्वांनी एक विलक्षण क्षण अनुभवला.

आज अशी सुसंधी पुन्हा दक्षिण हिंदुस्थानातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहणाऱयांना लाभत आहे. मुंबईतून हे ग्रहण खग्रास स्वरूपात दिसेल. कोणतंही सूर्यग्रहण, डोळय़ांचं रक्षण करणाऱया खास चष्म्यातून पाहायचं असतं हे मात्र विसरू नका. एक्स-रे फिल्म किंवा काळी काच याचा वापर नको. कारण सर्वांत महत्त्वाचे आपले डोळे. त्यात चुकूनही सूर्याची प्रखर किरणं शिरली तर त्यांचं नुकसान होऊ शकतं. तेव्हा डोळय़ांची काळजी जरूर घ्या.
एकदा डोळय़ांचं रक्षण करणारा खास चष्मा मिळाला की मग सूर्यग्रहणाचा आनंद अजबच. त्यातही खग्रास सूर्यग्रहण सर्वश्रेष्ठ. 16 फेब्रुवारी 1980 रोजी हिंदुस्थानातून सुमारे 80 वर्षांनी दिसलेलं खग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा योग आला होता. कर्नाटक-आंध्रच्या सीमेवरील रायपूर येथे जगभरच्या खगोलप्रेमींची वैज्ञानिक जत्राच भरली होती. आपल्याकडे त्यावेळी तशी जागृती नव्हती. नंतर 1986 मध्ये आलेल्या हॅलीच्या धूमकेतूने तशी जागृती घडवली. शिवाय नंतरच्या काळात 1995, 1999, 2009 आणि 2010 मध्ये खग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहणांनी देशवासीयांना सूर्याचं प्रभामंडल, डायमन्ड रिंग आणि कंकण असं मनोहारी दृश्य दाखवलं.

आता आज पुन्हा दक्षिण हिंदुस्थानातून मंगलोरपासून, कोइमतूर, उटी या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता हे तीन मिनिटांचं कंकणाकृती ग्रहण दिसणार आहे. अनेक खगोलप्रेमी दक्षिण हिंदुस्थानातील उटी या थंड हवेच्या ठिकाणी निघालेत. 2010 चं कंकणाकृती सूर्यग्रहण सुमारे नऊ मिनिटांचं होतं. त्यामुळे काही काळ ढगांचं ‘ग्रहण’ लागूनही सूर्यकंकण स्पष्ट दिसलं. यावेळी वेळ कमी आहे आणि आभाळ निरभ्र असावं अशी अपेक्षा आहे.
चंद्र जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या बरोबर मध्ये एका सरळ रेषेत येतो तेव्हा चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकलं जातं. ते पूर्णपणे झाकलं गेलं नाहीतर खंडग्रास सूर्यग्रहण दिसतं, परंतु सूर्यबिंब संपूर्ण झाकलं गेलं तर ‘खग्रास’ सूर्य पाहायला मिळतो. केवळ याचवेळी सूर्याचं तेजस्वी प्रभामंडळ दिसू शकतं.
चंद्र-पृथ्वी या अंतराच्या पृथ्वी-सूर्य हे अंतर 400 पट असून सूर्याचा आकार चंद्राच्या 400 पटच आहे. या वैश्विक योगायोगामुळे चंद्र आकाराने लहान असूनही एखाद्या अमावास्येला सूर्यबिंब पूर्णपणे झाकतो. सूर्यग्रहण अमावास्येलाच होतं हे लक्षात ठेवायचं.

अर्थात, चंद्राचं पृथ्वीपासूनचं सरासरी अंतर 3 लक्ष 84 हजार किलोमीटर असलं तरी तो पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. ज्या अमावास्येला चंद्र-पृथ्वी व सूर्याच्या एका सरळरेषेत असताना ‘उपभू’ म्हणजे जवळच्या स्थितीत असतो तेव्हा होणारे खग्रास सूर्यग्रहण जास्त वेळाचे असते. मात्र एखाद्या अमावास्येला सूर्य-चंद्र-पृथ्वी एका सरळरेषेत येऊनही चंद्र अपभू म्हणजे पृथ्वीपासून दूर असल्यास त्याचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी ते सूर्यबिंबाच्या मधोमध आलं की सूर्य सोन्याच्या बांगडीसारखा म्हणजे ‘कंकणाकृती’ दिसू लागतो. 26 डिसेंबरला तसंच घडेल. यावेळी कंकणसूर्याचा वेळ मात्र फारच कमी आहे.

खग्रास किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण पृथ्वीवरच्या ठरावीक पट्टय़ातूनच दिसतात त्याला टोटॅलिटी बेल्ट म्हणतात. म्हणूनच अशी ग्रहणं पाहायला विशिष्ट ठिकाणी जावं लागतं. यावेळी तिथे जाता आलं तर उत्तमच, अन्यथा महाराष्ट्रातून खंडग्रास ग्रहण दिसेल. ते पाहायचं तर आधी खास चष्मा मिळवा. डोळय़ांची काळजी घ्यावी हे पुन्हा एकदा लक्षात ठेवा. नुसत्या डोळय़ांनी सूर्याकडे क्षणभरही बघू नका. खास चष्म्यातून मात्र तो छान दिसेल!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या