वैश्विक – दाहक परी संजीवक!

1742

पंधरा कोटी किलोमीटर अंतरावर सूर्य नावाचा तारा गेली पाच अब्ज वर्षे तळपतो आहे. तो तिथे आहे म्हणून आपण इथे पृथ्वीवर आहोत. मुळात पृथ्वी आणि आपली सारी ग्रहमालाच सूर्यामुळे अस्तित्वात आलेली आहे. असा तो तेजोनिधी लोह नव्हे वायुगोल! तोसुद्धा तप्त वायूचा गोलक. सगळे ग्रह एकत्र केले तर त्यांचं वस्तुमान सूर्याच्या तुलनेत केवळ दोन टक्के भरेल एवढा त्याचा विस्तार. दारव्हेकरांच्या गीतात वसंतराव देशपांडे गातात ‘कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती, दाहक परि संजीवक अणुरेणु उजळिती.’ हे तंतोतंत खरे आहे. या कोटी कोटी किरणांना सेकंदाला तीन लाख किलोमीटर वेगाने पृथ्वीवर यायला सवा आठ मिनिटे लागतात.

सूर्याच्या ऊर्जेवर आपली सृष्टी जन्मते, जगते. असा हा ‘जनक’ तारा जवळून दिसतो कसा, भासतो कसा त्याचा शोध घेण्यासाठी हिंदुस्थानचे ‘आदित्य’ यान जाणारच आहे; परंतु सध्या 2018 मध्ये ‘नासा’ने सूर्याकडे धाडलेले वैज्ञानिक ह्युजिन पार्कर यांच्या नावाचे ‘पार्कर सौर यान’ गतवर्षीच्या अखेरीस डिसेंबरमध्ये सूर्यापासून 2 कोटी 40 लाख किलोमीटरवर जाऊन त्याचा वेध घेऊन लागले. या क्षणोक्षणी अग्निप्रकाश उधळणाऱया ताऱयाच्या अंतरंगात डोकावण्याचं धाडस ‘पार्कर’ यानाने केले आणि त्याला सूर्याबद्दलची म्हणजे सौर वाऱयाविषयीची (सोलार विन्ड) अद्भुत माहिती मिळाली.
सूर्याच्या गाभ्यात हायड्रोजन वायूचं हिलियम वायूत रूपांतर करणारी विराट नैसर्गिक अणुभट्टीच आहे. या प्रक्रियेमुळे ? गाभ्यात सुमारे दीड कोटी सेल्सिअस (किंवा खरे तर दीड कोटी केल्विन) एवढी अतिप्रचंड ऊर्जा निर्माण होते. एवढे या ताऱयाचे अंतर्भागातले तापमान. त्यांचं पृष्ठभागावरचे तापमानही सरासरी 6 हजार सेल्सिअस इतके असते. त्यापैकी काही भागातील तापमान चार ते तीन हजार सेल्सिअसपर्यंत कमी आढळते. या भागालाच ‘सौरडाग’ (सनस्पॉटस्) असे म्हणतात. आपल्याला ते दुर्बिणीला सोलार फिल्टर बसवून किंवा सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन भर दुपारी सहज पाहता येतात. मात्र या सौरडागांचेही कमी-जास्त असण्याचे कोष्टक असते. तेवढे ठाऊक असायला हवे.

तर ‘पार्कर’च्या संशोधनाची गोष्ट. या यानाने सूर्याच्या खूप जवळ जाऊन जे निरीक्षण नोंदले त्यातली महत्त्वाची बाब म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाभोवती असलेल्या प्रभामंडलातून निर्माण होणारे सौर वारे जे काही वातावरणीय उपद्व्याप घडवतात त्यापैकी त्यांच्या झोताने निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड) आपले कृत्रिम उपग्रह आणि पृथ्वीवरची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा यांना त्रासदायक ठरते.
ते कसे ते लक्षात घेण्याआधी सूर्याचे प्रभामंडल (करोना) म्हणजे काय ते जाणून घेऊ. सूर्य हा स्वयंप्रकाशी, तेजस्वी तारा असल्याने त्याच्या पृष्ठभागाबरोबरच्या बाजूलाही सभोवती ऊर्जेचे वलय असते. तेच प्रभामंडल. एरवी सूर्यतेजात ते सोलार-फिल्टर वापरूनही दिसत नाही, पण सूर्याचा मधला तेजोगोल बरोबर झाकला गेला की हे प्रभामंडल मस्त दिसते. कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत ते बघता येते, पण जनसामान्यांना सौर प्रभामंडल बघण्याची संधी खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी असते. आम्ही 1980 आणि 1995 च्या ग्रहणात असं प्रभामंडल (करोना) डोळे भरून न्याहाळला. ऑगस्ट 1999 आणि जुलै 2009 मध्येही हिंदुस्थानातून खग्रास सूर्यग्रहण दिसले, पण दिवस पावसाळय़ाचे असल्याने काही निरीक्षकांनाच सूर्याच्या प्रभामंडलाचे दर्शन घडले.

या प्रभामंडलात जे सौर वारे निर्माण होतात ते सौरमालेत पसरतात. प्रभामंडलाच्या प्रकाशऊर्जेतील भारित (चार्जड् पार्टिकल) अणूंचा वेग आणि आंदोलन होत असताना तयार होणारे सौर वारे पुढे विरून जातात एवढे ज्ञान होते, परंतु ‘पार्कर’ यानाला जाणवले की, हे सौर वारे काही वेळा इतकी उसळी घेतात की, हवेत वेगात उडवलेल्या नाण्यासारखे चुंबकीय क्षेत्रही स्वतःभोवती गिरकी घेते. या प्रकाराला ‘स्विच बॅक’ असे म्हणतात. असे तीक्र सौर वारे आपण अवकाशात सोडलेले उपग्रह आणि त्यावरील यंत्रणेत बाधा आणतात. पृथ्वीवरच्या रेडिओ, इलेक्ट्रॉनिक संदेशवहनातही अडथळा निर्माण करतात. सौर वाऱयांचा हा आकस्मिक ‘सन्’ताप आणि इतरही गोष्टी अधिक जवळून जाणून घेण्यासाठी ‘पार्कर’ यान सूर्यापासून अवघ्या 60 लाख किलोमीटरवर जाणार आहे. तेव्हा ‘दाहक परी संजीवक’ असलेल्या भास्कराच्या उग्रपणामागचे रहस्य आणखी काही प्रमाणात उलगडेल.

> [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या