आभाळमाया – ‘तारांकित’ आपण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक 

विश्वनिर्मितीच्या  आरंभीच्या क्षणीच वस्तुमानाचे महाप्रसारण (ग्रेट एक्स्पॅन्शन) होऊ लागले आणि त्यातून तेजोमेघांनी आकार धारण केला. त्यातून मग ताऱ्यांनी खच्चून भरलेल्या दीर्घिका (गॅलॅक्सी) तयार झाल्या. या दीर्घिकांमध्ये अनेक घटक होते. अब्जावधी तारे, त्यांपैकी काहींच्या भोवती असलेल्या ग्रहमाला, धूमकेतू, एकटे-दुकटे इतस्ततः भटकणारे अशनी (महापाषाण) किंवा छोटय़ा-छोटय़ा उल्का. या सर्व प्रकारांची जत्रा एकेका दीर्घिकेत ठासून भरलेली असते.

त्यातच असतात आपल्या सूर्यासारखे तारे. आपल्या आकाशगंगा दीर्घिकेत आपली सूर्यमाला दीर्घिकेच्या एक लाख प्रकाशवर्षे व्यासामध्ये केंद्रापासून केवळ 30 हजार प्रकाशवर्षे अंतरावर म्हणजे खूपच जवळ आहे. 25 कोटी वर्षांत ती या केंद्रकाभोवती एक परिक्रमा पूर्ण करते. हे केंद्रक म्हणजे एक शक्तिशाली कृष्णविवर आहे. आपल्यासाठी ‘जनक’ असलेला सूर्य तसा सामान्यच तारा. आपल्या दीर्घिकेत त्यापेक्षा कितीतरी महाकाय तारे आहेत.

पाच अब्ज वर्षांपूर्वी एका तेजोमेघातून जन्माला आलेला सूर्य आता मध्यमवयीन झालेला आहे. आणखी पाच अब्ज वर्षांनी तो कायमचा मावळेल आणि त्याचं श्वेत खुजामध्ये रूपांतर होईल. तोपर्यंत मात्र म्हणजे सूर्याच्या अंतिम मावळतीची प्रक्रिया सुरू होईपर्यंत आणखी साडेतीन-चार अब्ज वर्षे तरी सूर्याचं तेज आणि ऊर्जा आपल्याला जगण्याची ऊर्मी देत राहणार आहे. तोपर्यंत पृथ्वीवर किती वेळा नवनवी जैविक उक्रांती होईल? हा प्रश्नच आहे.

आपण ‘तारांकित’ आहोत असे म्हणण्याचं कारण असं की, सूर्यापासूनच संपूर्ण ग्रहमाला निर्माण झाली. हायड्रोजन आणि त्याचं रूपांतर हिलियममध्ये करणारी तप्त भट्टी सूर्याच्या गाभ्यात आहेच. त्यातूनच निर्माण झालेला प्रकाश रोज उजाडल्यावर सवाआठ मिनिटांत आपल्यापर्यंत येत असतो. त्याचबरोबर सूर्यामध्ये इतर अनेक जड मूलद्रव्यं आणि संयुगंसुद्धा आहेत. ज्या तेजोमेघातून सूर्याचा जन्म झाला, त्यावेळी तेजोमेघाचे आकुंचन होत काही हजार वर्षांमध्ये या तेजोमेघाच्या केंद्राचे तापमान 3 हजार अंश सेल्सिअस (किंवा केल्विन) झाले. सूर्यजन्म होत असताना त्यातून निसटलेले जे वस्तुमान होते, त्यातील जड मूलद्रव्यं आणि वायू वगैरेंमधून आपल्यासकट सारे ग्रह आकाराला आले. सूर्याच्या केंद्रकाचे तापमान 1.5 कोटी अंश सेल्सिअस झाल्यावर त्यातील हायड्रोजनचे ज्वलन सुरू झाले आणि आज आपल्याला दिसतो तो सूर्य तळपण्यास सुरुवात झाली.

सूर्यापासून मिळालेली सारी मूलद्रव्यं सर्व ग्रहांवर आहेत आणि आपल्या पृथ्वीवरच्या सजीव आणि निर्जीवांमध्ये असणारी सर्व घटक द्रव्यं त्याचाच भाग असल्याने एक प्रकारे आपले अस्तित्व तेजोमेघांकित किंवा ‘तारांकित’ आहे. आज आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर आपण विश्वाचं अंतरंग शोधण्यात आणि या ग्रहावर तंत्रक्रांती आणण्यात यशस्वी झालो आहोत. ज्या मेंदूतून हे सारं आकलन झालं त्याची निर्मिती ताऱ्यातून अप्रत्यक्षपणे प्राप्त झालेल्या मूलद्रव्यांमधूनच झाली आहे.

पृथ्वीवर सापडणारे विविध धातू आणि इतर सर्व गोष्टी या ग्रहाला जन्मजात मिळाल्या आहेत. त्यात कधीकाळी असंख्य धूमकेतू आणि अशनींनी भर टाकली असली तरी तेसुद्धा सारे सूर्यनिर्मितीच्या प्रक्रियेतूनच जन्मले असल्याने ही सौर देणगीच आहे.

मग प्रश्न असा पडेल की, सूर्याच्या जन्मकाळातीलच उर्वरित द्रव्यामधून ग्रहांचा जन्म झाला असेल तर ते ‘तारे’ का झाले नाहीत? त्याचं उत्तर असं की, तारा जन्माला येण्यासाठी लागणारं ठरावीक आपल्या सूर्याच्या 80 टक्के तरी वस्तुमान आकुंचित होऊन आणि गाभ्यात पुरेशी उष्णता तयार होऊन हायड्रोजनचं हिलियममध्ये रूपांतर शक्य नसतं. तारा अब्जावधी वर्षे या घुसळणीतून ऊर्जा आणि प्रकाश निर्माण करतो, तर ग्रह कालांतराने थंड होत जातात.

तसं झालं नसतं तर वायुरूप गोलकांवर जीवसृष्टी निर्माण होऊ शकली नसती. त्यातही आणखी अनेक कसोटय़ा आणि ‘अटी’ आहेतच. अगदी आपल्यासारखी जीवसृष्टी निर्माण व्हायची तर अशा ग्रहाचं (पृथ्वीचं आहे तसं) स्थान त्या ग्रहमालेत विशिष्ट ठिकाणी हवं. त्याशिवाय पृथ्वीसारखं पाणी आणि कठीण कवच यांचा संगम हवा. जिवांना जगवणारे वायू आणि ती जीवसृष्टी ‘धरून’ ठेवणारं योग्य गुरुत्वाकर्षणही हवं.

त्यामुळेच आपल्या ग्रहमालेतले सर्वच ग्रह सूर्यापासून जन्मले असले आणि त्यातले बुध, शुक्र, मंगळ कठीण पृष्ठभागाचे असले तरी त्यांना जीवसृष्टीच्या परीक्षेत यश मिळालेलं नाही. गुरूपासून पुढचे ग्रह वायुरूप असल्याने आणि सूर्यापासून अतिदूर अंतरावरून फिरत राहिल्याने त्यांनाही जीवसृष्टीचा मान मिळालेला नाही.

म्हणूनच, ‘तारांकित’ असल्याचं केवळ आपणच सांगू शकतो. ‘ब्रह्मांडी ते पिंडी’ अशी खरं तर संपूर्ण प्रक्रिया. त्यांची जाणीव झाल्यावर अल्पशा स्वार्थापासून विराटाचा विचार करण्याचीही आस प्रत्येकाच्या मेंदूत निर्माण झाली तर या दुर्मीळ जीवसृष्टीचं कल्याण होईल. ते खरं आपलं ‘तारांकित’ वागणं असेल, पण…!

[email protected]