लेख – ग्रहतारे अंगणात!

>> डॉ. संजय वर्मा

जेम्स दुर्बिणीने पाठविलेल्या आश्चर्यकारक चित्रांच्या आधारे शास्त्रज्ञ या दुर्बिणीला गोल्डन आय म्हणू लागले आहेत. अंतरिक्षात स्थापित केलेली ही सर्वात शक्तिशाली आणि जटिल इन्फ्रारेड दुर्बीण आहे. अंतरिक्षातील अंतर आणि काळाच्या दृष्टीने सर्वात दूरचे कोपरे मानवजातीने या दुर्बिणीच्या सहाय्याने प्रथमच पाहिले आहेत, असे ‘नासा’च्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तीक्ष्ण टोक आणि त्रिकोणी आकारामुळे ती हॉलीवूडच्या विज्ञानकथा चित्रपटातील वाहनासारखी दिसते.

अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतरिक्ष संस्थेने अंतरिक्षात उभारलेल्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतलेली आकाशगंगा, तेजोमेघ आणि ताऱ्यांची अप्रतिम छायाचित्रे समोर आली, तेव्हा हे अवकाश अधिकच आपलेसे वाटू लागले. नासाने जेम्स टेलिस्कोपमधून घेतलेली काही निवडक छायाचित्रे प्रसिद्ध केली असली तरी ती इतकी स्पष्ट आणि आकर्षक आहेत की, अंतरिक्ष आपल्या अंगणात आल्यासारखे वाटू लागले आहे. ही चित्रे अत्यंत स्पष्ट, मनमोहक आणि सुंदर आहेत, एवढेच या चित्रांचे महत्त्व नाही. आकाशगंगा, मृत ताऱ्यांचे केशरी अस्तित्व आणि निळ्या ताऱ्यांचे हे दृश्य आपल्याला अंतरिक्षाचा जन्म, ब्लॅकहोल, ताऱ्यांचा मृत्यू अशा असंख्य रहस्यांची उकल होण्यास सहाय्यभूत ठरण्याची अपेक्षा आहे.

जेम्स वेब दुर्बिणीने माणसाला अशा ठिकाणी पोहोचविले आहे, जिथे पोहोचण्याचा पूर्वी केवळ अंदाजच लावला जात असे. यातील एक छायाचित्र तर 13 अब्ज वर्षांपूर्वी तयार झालेल्या ताऱ्याचे आहे. आपली पृथ्वी चार अब्ज वर्षे जुनी आहे. त्या पृथ्वीवर विकसित झालेली मानवजात दहा अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या ताऱ्याचे निरीक्षण करण्यास सक्षम बनणे ही कल्पनाच सुखावह आहे. विश्वाच्या उत्पत्तीची रहस्ये जाणून घेण्याच्या किती जवळ आपण येऊन पोहोचलो आहोत याचाही अंदाज यावरून येतो. आणखी एक मुद्दा असा की, सीमांनी विभागलेले जग एकाच व्यासपीठावर उभे राहिलेले पाहायचे असेल तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि जेम्स स्पेस टेलिस्कोप ही त्याची आदर्श उदाहरणे आहेत. जेम्स टेलिस्कोप हे अमेरिकेच्या नासाचे योगदान आहे हे खरे; परंतु युरोपीय आणि कॅनेडियन अवकाश संस्थेचे योगदानही त्यामुळे अधोरेखित होणार आहे.

जेम्स वेब टेलिस्कोप अल्ट्रा हाय रिझोल्युशन इन्फ्रारेड प्रतिमा कॅप्चर करण्यात माहीर आहे आणि या दुर्बिणीने तिच्या लेन्सच्या सहाय्याने अंतरिक्षाचे असे खोल कोपरे समोर आणले आहेत, जे आपल्या डोळ्यात मावूही शकणार नाहीत. भविष्यातील अंतरिक्ष दुर्बिणी आणखी संशोधन आणि आणखी काही बातम्या घेऊन येतील, हे खरे आहे; परंतु आज जेम्सने अवकाशाच्या ज्या भागात प्रवेश केला आहे, त्यात यापूर्वीच्या हबल टेलिस्कोपचेही योगदान आहेच. नासा आणि युरोपीय स्पेस एजन्सीने 1990 मध्ये अंतराळात पाठविलेल्या हबल टेलिस्कोपच्या प्रमुख संगणकाने त्याच वेळी (30 वर्षांपूर्वी) अंशतः काम करणे थांबविले. असे असूनसुद्धा मागील वर्षी 2021 मध्ये संगणक पूर्णपणे बंद पडेपर्यंत हबलने केलेल्या कामाच्या आधारावर या टेलिस्कोपला पृथ्वीचा डोळा म्हटले गेले.

अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन पॉवेल हबल यांचे नाव जिला दिले गेले, अशी ही दुर्बीण त्यांच्या काळात अंतरिक्षात सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलेली एकमेव दुर्बीण होती. पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत स्थापित केलेल्या 13 मीटर लांब आणि 11 हजार किलोग्रॅम वजनाच्या हबलने तिच्या जीवनकालात गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यूनची अतुलनीय छायाचित्रे घेतली आणि त्यांच्या वातावरणातील बदलांचे रहस्य उलगडले. गुरूचे बदलते वातावरण, त्याच्या पृष्ठभागावरील वादळे याविषयी माहिती गोळा करण्याबरोबरच या दुर्बिणीने शनी आणि युरेनसवरील मोसमी वादळांची बारकाईने नोंद केली. गुरूच्या पृष्ठभागावरील प्रचंड लाल ठिपके हे तेथे येत असलेल्या वादळाचे संकेत देतात, हे रहस्य हबलच्या छायाचित्रांनीच उघड केले होते. सूर्यमालेतील विविध ग्रहांच्या हंगामी बदलांचे छायाचित्रण करण्याच्या क्षमतेमुळे हबलला सूर्यमालेचा वेदरमॅन असेही म्हटले गेले. हबलने सूर्यमालेच्या बाहेर आणि पृथ्वीपासून सुमारे 2000 प्रकाश वर्षे दूर असलेल्या नेब्युलाचे छायाचित्र काढून तिची उपयुक्तता सिद्ध केली, परंतु जुनी झाल्यामुळे आणि अप्रचलित संगणकांमुळे हबलने अखेरीस काम थांबविले आणि तिची जागा 10 अब्जांच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतली, जी अनेक बाबतीत अधिक सरस आणि आधुनिक आहे.

अमेरिकेतील नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस, इंजिनीअरिंग आणि मेडिसीनसारखी संस्था दर दहा वर्षांनी एक मजबूत स्पेस टेलिस्कोप तयार करण्याचा सल्ला देत आहे. या संस्थेच्या सल्ल्यानुसार नासाने अवकाशात पृथ्वीसारखा राहण्यायोग्य ग्रह (एक्सोप्लॅनेट) शोधण्याला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी नासाने मोठी दुर्बीण बनवली. यात इन्फ्रारेड, ऑप्टिकल आणि अल्ट्राव्हायोलेट किरण कॅप्चर करून त्यांचे विश्लेषण करणारे सेन्सर असावेत, हा सल्ला नासाने गांभीर्याने घेतला  आणि 25 डिसेंबर 2021 रोजी फ्रेंच गयाना स्पेस सेंटरमधून पृथ्वीपासून साडेनऊ दशलक्ष मैल (15 लाख किलोमीटर) अंतरावर असलेल्या कक्षेत स्थापित करण्यासाठी ही दुर्बीण रवाना करण्यात आली. अंतरिक्षात स्थापित केलेली ही सर्वात शक्तिशाली आणि जटिल इन्फ्रारेड दुर्बीण आहे. अंतरिक्षातील अंतर आणि काळाच्या दृष्टीने सर्वात दूरचे कोपरे मानवजातीने या दुर्बिणीच्या सहाय्याने प्रथमच पाहिले आहेत, असे नासाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या वेधशाळेचा प्रमुख भाग म्हणजे फुलाच्या आकाराचा सोन्याचा मुलामा असलेला बेरिलियम आरसा. या आरशाची रुंदी सुमारे 21.32 फूट (6.4) मीटर आहे. बेरिलियमपासून बनवलेल्या या 18 तुकडय़ांच्या आरशाच्या एका भागावर मे महिन्यात सूक्ष्म उल्काही पडल्या होत्या. तरीही हा संवेदनशील आरसा कोणत्याही अडथळ्याशिवाय छायाचित्रे घेत राहिला.

हबलची उत्तराधिकारी म्हणून जेम्स टेलिस्कोप तयार करण्याचे काम 1989 मध्येच सुरू झाले होते आणि तेव्हा हबलचे प्रक्षेपण होण्यास एक वर्ष बाकी होते, हे या ठिकाणी उल्लेखनीय आहे. खरे तर याच सुमारास शास्त्रज्ञांच्या लक्षात आले होते की, जर ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या तारे आणि आकाशगंगांचा प्रकाश पकडायचा असेल तर पृथ्वीच्या उत्पत्तीची चमक टिपण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर अंतराळातील वेधशाळेची गरज आहे. जेम्स वेब टेलिस्कोपला सर्व वैशिष्टय़ांसह सुसज्ज करण्यासाठीचा खर्च दहा अब्ज डॉलरच्या घरात गेला. त्यामुळे ती इतिहासातील सर्वात महागडी दुर्बीण ठरली. तथापि या निर्मितीसाठी नासाला दोन भागीदार मिळाले. यापैकी युरोपियन स्पेस एजन्सीने 788 दशलक्ष आणि पॅनेडियन स्पेस एजन्सीने 158 दशलक्ष एवढे योगदान दिले. युरोपियन एजन्सीने वेधशाळा आणि उपकरणे सुरू करण्यासाठी खर्च केला, तर कॅनडाने सेन्सर्स आणि इतर उपकरणांवर खर्च केला. एकंदरीत, जेम्स दुर्बिणीमुळे अवकाश आपल्या अंगणात आल्याचाच भास अनेकांना झाला आणि या खर्चाचे चीज झाले.

(लेखक बेनेट विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहेत)