आभाळमाया – अवकाश आणि पाणी!

वैश्विक

आज ‘इस्रो’ जे अनेक अवकाशी पराक्रम करत आहे, त्यांची भक्कम पायाभरणी केली ते विक्रम साराभाई यांचे जवळचे सहकारी पद्मभूषण सन्मानप्राप्त एकनाथ चिटणीस यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन झालं. काही दिग्गजांचा परिचय आपल्याला त्यांच्या देहावसानानंतर होतो हे दुर्दैव! अर्थात चिटणीसांसारखे समर्पित संशोधक प्रसिद्धीचा विचार कधीच करत नसतात. आपण जे कार्य हाती घेतलंय, त्यात सिद्धी कशी प्राप्त करता येईल, याचाच विचार सतत त्यांच्या मनात असतो.

कोल्हापूरमध्ये बालपण गेलेले एकनाथ चिटणीस पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. तिथे भौतिकशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास करून संशोधन कार्य करावं यासाठी त्यांनी अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स  इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी)  प्रवेश घेतला. तिथे संशोधनाचा आनंद मिळत असतानाच त्यांचं कर्तृत्व जाणून विक्रम साराभाई यांनी त्यांना हिंदुस्थानात बोलावलं. आपल्या देशाच्या अनेक समस्या सोडवायच्या तर त्याला विज्ञानाचा आधार लागेल हे साराभाई यांना ठाऊक होतं. एकनाथ चिटणीस यांनी ताबडतोब प्रतिसाद देऊन मायदेशासाठी संशोधन करण्याचा निर्णय घेतला.

रॉकेट प्रक्षेपणासाठी योग्य जागा शोधण्याचं काम सुरुवातीला त्यांच्याकडे आलं. पाचेक महिन्यांत भरपूर भ्रमंती करून चिटणीस यांनी केरळमधील ‘तिरुवनंतपुरम’ (एकेकाळचं त्रिवेंद्रम) या महानगराजवळच ‘थुंबा’ येथील जागा निश्चित केली. ती पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्ताजवळची असल्याने रॉकेट उड्डाणासाठी योग्य होती. सर्वच शास्त्रज्ञ सहकाऱ्यांनी चिटणीस यांच्या जागा संशोधनाला पाठिंबा दिला आणि 1963 च्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकन अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या सहाय्याने. वातावरणाचा अभ्यास करणारे पहिलेवहिले हिंदुस्थानी रॉकेट (अग्निबाण) थुंबा येथून उडाले. त्या वेळी रॉकेटचे भाग कसे बैलगाडी पिंवा सायकलवरून नेले त्याचे पह्टो उपलब्ध आहेत. ते नेटवर जरूर पहा.

असा हा आपल्या रॉकेट प्रक्षेपणाचा आरंभ होता. त्यात त्या वेळी अनेक समस्या आल्याच असतील, परंतु समस्यांना आव्हान समजून त्यावर मात करण्याचा निर्धार ज्यांच्याकडे होता, त्यामध्ये एकनाथ चिटणीस यांचं संशोधन महत्त्वाचं आहे. देशाच्या
रॉकेट सायन्सची पायाभरणी करणारे चिटणीस शतायुषी झाले तेव्हा त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांचे नाव पुन्हा माध्यमांमध्ये आले. आता ते आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्यासारख्या वैज्ञानिकांच्या प्राथमिक संशोधनावरच स्वार होऊन ‘इस्रो’ गगनभराऱ्या घेत आहे हे कोणी नाकारू शकणार नाही.

चिटणीसांसारख्या वैज्ञानिकांनी छोटय़ाशा प्रक्षेपणाने केलेली ‘इस्रो’ची कामगिरी आता भव्य, वजनदार उपग्रह अंतराळात धाडण्यापर्यंत पिंवा एकाच वेळी शंभराहून अधिक उपग्रह अवकाशात पाठविण्यापर्यंत पोहोचली आहे. ‘बाहुबली’ म्हटला जाणारा ‘सीएमएस-03’ हा उपग्रह हे त्याचेच द्योतक आहे.

हा प्रचंड वजनाचा उपग्रह आपण खास नौदलासाठी बनवला आहे. हळूहळू तो पृथ्वी प्रदक्षिणा करत, कक्षा वाढवत पृथ्वीपासून 36,800 किलोमीटर अंतरावर स्थिर केला जाईल. या स्थैर्यामुळे तो आपल्या देशाच्या भूभागावर आणि सागरावर सतत नजर ठेवू शकेल. आता ‘बाहुबली’ नौदलासाठी पूर्वी सोडलेल्या ‘रुक्मिणी’ (जी सॅट-7) या उपग्रहाची जागा घेईल. नौदलाच्या सर्व नौका, पाणबुडय़ा तसेच विमानांशी सतत सुलभ संवाद साधण्यासाठी ‘बाहुबली’ तत्पर असेल.

यासारख्याच रॉकेटद्वारे पुढच्या महिन्यात 6500 किलो वजनाच्या ‘ब्लू बर्ड-6’ अमेरिकन उपग्रहाचे प्रक्षेपणही इस्रो करणार आहे. आपल्या ‘गगनयान’ प्रकल्पातही याच अग्निबाणाचा वापर केला जाईल. ‘बाहुबली’च्या उड्डाणामुळे स्वदेशी, क्रायोजेनिक इंजिनाचीही यशस्वी चाचणी झाली. त्यामुळे ‘भूस्थिर’ (म्हणजे पृथ्वीच्या वेगाशी एकरूप होऊन सतत आपल्याच देशाच्या भूभागावरच्या अंतराळात राहणाऱ्या) उपग्रहांची अवकाश पाठवणी आता आपल्याला सोपी झाली आहे.

या यशाबद्दल ‘इस्रो’चं कौतुक करताना आपल्याला एकनाथ चिटणीस यांच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ वैज्ञानिकांचा विसर पडू नये इतकंच!

[email protected]