आभाळमाया : … आता स्पेस पोर्ट!

484

>> दिलीप खोलगडे

1903 मध्ये राइट बंधूनी इंजिन असलेलं जगातलं पहिलं विमान उडवलं. त्यांच्या ‘फ्लायर’ या विमानाचं ते उड्डाण अवघ्या एकूणसाठ सेकंदांचं होतं. परंतु त्यानेच इतिहास घडवला. माणसाला यांत्रिक ‘पंख’ लाभले. आता अवघं आकाश त्याच्या या पंखांच्या बळावर त्याला व्यापून टाकायचं होतं. संशोधनाच्या क्षेत्रात गमीतिमानता हा एक महत्त्वाचा गुण असतो. एका गोष्टीचा ‘शोध’ लागला की, ती अधिक प्रगत करण्यासाठीचे प्रयत्न अनेक जण करू लागतात. अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या स्मिथसॉनियन संस्थेत राइट बंधूंचं हे विमान जतन करून ठेवलंय. आपल्याकडे शिवकर बापूजी तळपदे यांनी प्राचीन तत्त्वावर विमानसदृश वस्तू उडवण्याचा यशस्वी प्रयत्न मुंबईच्या चौपाटीवर केल्याची नोंद आहे. पण माणसासह उड्डाण करणारं राइट बंधूंचं फ्लायरच पहिलं. गगनाला गवसणी घालण्याच्या संकल्पना, कविकल्पना त्यापूर्वीही होत्याच. त्यातूनच ‘उडण्याची’ जिद्द धरून आकाशगामी यानं अवतरली. आज ती लाखो प्रवाशांना इकडून-तिकडे नेतायत. विमान प्रवासाने जग जवळ आलं.

1957 मध्ये पहिला उपग्रह अवकाशात गेल्यावर केवळ पृथ्वीवरून दिसणारं ‘आकाश’ ही उड्डाणमर्यादा राहिली नाही. स्पेस किंवा अवकाश हा शब्द वारंवार कानावर येऊ लागला. अवकाशयानांच्या उड्डाणातून जाणवू लागला. अवकाशात गेलेला पहिला प्रवासी रशियाचा युरी गागारिन आणि पृथ्वीबाहेरच्या भूमीवर पहिलं पाऊल ठेवणारा माणूस नील आर्मस्ट्राँग हे आता जगात सर्वांनाच ठाऊक आहे.

विमानांचा वेग वाढवत ती ‘सुपरसॉनिक’ म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक अशी ‘स्वनातीत’ करण्याचा यशस्वी उपक्रम ‘कॉन्कॉर्ड’ विमानांनी पाव शतक राबवला. पुढे तो एका अपघातानंतर बंद पडला. परंतु हा वेग-ध्यास काही कमी झाला नाही. पृथ्वीवर ‘हायपरलूप’ तंत्रज्ञान यशस्वी झालं तर विमानंही मागे पडतील. मुंबई-पुणे अंतर वीस मिनिटांत आणि मुंबई-न्यूयॉर्क-लंडन कदाचित तीन-चार तासांत असा वेगवान प्रवास झाला तर दिवसभरात पृथ्वी प्रदक्षिणा करून घरी परतता येईल!

त्यावर प्रयोग सुरू असतानाच अवकाशातील चंद्र-मंगळाकडे डोळे लागलेल्या माणसाने आता या मोहिमांचा केवळ संशोधनात्मक नव्हे तर व्यावसायिक विचार कृतीत आणायला सुरुवात केली आहे. त्यातला पहिला टप्पा आहे साहसी जनसामान्यांना ‘स्पेस’ किंवा अवकाशात फिरवून आणणं. एलॉन मस्कच्या ‘स्पेस एक्स’ यांनी त्यासाठी चंग बांधला आहे. इतरही अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरत आहेत.

याचाच परिणाम म्हणून आता जगात ‘स्पेस-पोर्टस्’ तयार होणार आहेत. सध्याच्या जगात आधुनिक आणि खर्चिक गोष्टींचा आरंभ अमेरिकेला परवडतो. त्यामुळे या गोष्टी तिथे आधी सुरू होतात. आताही न्यू मोक्सिकोच्या वाळवंटात जगातला पहिला ‘स्पेस पोर्ट’ उभारला जातोय. ‘पोर्ट’ या शब्दाचा पारंपरिक अर्थ बंदर. बोटींची ने-आण करणारी आणि विश्रांतीची जागा म्हणजे पोर्ट. पुढे विमानं आल्यावर विमानोड्डाणाच्या जागेसाठीही तोच शब्द वापरला गेला. फक्त बोटींच्या बंदराला वॉटर पोर्ट म्हणत नव्हते. हवाई वाहतुकीच्या स्थानकाला मात्र ‘एअरपोर्ट’ म्हटलं गेलं. हिंदीमध्ये तर ‘जहाज’ या शब्दावरून विमानालाच ‘हवाई जहाज’ असं नाव मिळालं.

आता या ‘पोर्ट’ कल्पनेचा विस्तार होत असून एअरपोर्टपेक्षा पुढचा टप्पा गाठणार्‍या अवकाश प्रवासाच्या वाहतुकीचं ठिकाण म्हणून स्पेस पोर्ट ओळखलं जाईल. एकेकाळी हौशी उड्डाणं करणार्‍या एका ‘पोर्ट’चं रूपांतर आता ‘व्हर्जिन-गॅलॅक्टिक’च्या स्पेसपोर्टमध्ये रुपांतरित होतंय. तेथून भावी काळात अवकाशयानांची उड्डाणं होतील. ती पर्यटकांसाठी असतील. त्याचं उद्घाटन 15 ऑगस्टला झालं. पैसे भरून अवकाशोड्डाण करू इच्छिणाऱयांसाठी ही सुविधा असेल.

यामध्ये मिशन कंट्रोल, पायलटची जागा आणि ग्राहकांसाठी लाऊन्ज (मोकळी जागा) असेल. कॅफेटेरिया आणि इतर सुखसोयींनी युक्त अशा या स्पेस पोर्टची जाहिरात तेथे येणार्‍या ‘व्हिजिटर्स’मुळे होईल. ही नुसती सुरुवात आहे. यथावकाश ‘स्पेस’मध्ये जाऊ इच्छिणार्‍या पर्यटकांची मानसिक तयारी यातून होऊ शकेल. पुरेशा प्रशिक्षणानंतर हौशी मंडळींना ‘स्पेस’मध्ये कधी नि कसं न्यायचं याचं शेडय़ूल अजून जाहीर झालेलं नाही. त्याची पूर्वतयारी म्हणून हे स्पेस पोर्ट आकाराला आलंय. गेल्या पन्नास-साठ वर्षांत स्पेसक्राफ्ट, कॉम्प्युटर, सेलफोन, डिजिटल डेटा, सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल असे अनेक वैज्ञानिक शब्द सामान्यांच्या शब्दकेशात रुजले. एकेकाळी फोन आला तेव्हा ‘फोन घेतला’ आणि फोन झाल्यावर ‘फोन ठेवा’ म्हणायची सवय या यंत्राने लावली. आता सेलफोन ‘ठेवण्याची’ गरज नसते तरी तसं बोललं जातं हा सवयीचा परिणाम तसंच या ‘पोर्ट’चं एअरपोर्टसारखा ‘स्पेस पोर्ट’ शब्द पुढच्या पिढय़ांना अगदी रोजच्या जीवनातला वाटेल. काळाबरोबर विज्ञान आणि आपल्या जीवनशैलीत घडणारा बदल आता अधिक वेगाने घडणार आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या