आभाळमाया – ‘गडबडीची’ ग्रहमाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक  [email protected]

तशी विश्वरचना बऱ्यापैकी ‘शिस्तबद्ध’ असते. विश्वातील अब्ज-अब्ज ताऱ्यांपैकी अनेकांभोवती असलेल्या आपल्या सौरमालेसारख्या रचना आपापल्या गतीने फिरत असतात. एकूणच विश्व इतकं गतिमान आहे की, 13.8 अब्ज वर्षांपूर्वी ‘बिग बँग’च्या (श्री महाप्रसारण) क्षणी त्याची निर्मिती झाली तेव्हापासून बहुतेक ग्रह त्यांच्या त्यांच्या जनक ताऱ्याभोवती रीतसर फिरत आहेत. आता एखादा चुकार एकलकोंडा ग्रहसुद्धा असतो म्हणा. पण तो एकलकोंडय़ा माणसासारखाच अपवाद.

पण एक गंमत माहीत आहे का? आपण जे विश्व पाहतो, म्हणजे जे आपल्याला डोळ्यांनी, दुर्बिणींनी, अवकाशी दुर्बिणींनी स्वच्छ ‘दिसतं’ ते आहे एकूण विश्वाच्या केवळ 4 टक्के. उरलेल्या विश्वात 23 टक्के ‘कृष्णद्रव्य’ (डार्क मॅटर) आणि 73 टक्के कृष्णऊर्जा किंवा ‘डार्क एनर्जी’ भरलेली आहे. विश्वाच्या या विशेषत्वांचा अभ्यास सुरू आहेच. परंतु त्यातील ‘गंमत’ ही की, आपलं अस्तित्व एका विश्वारंभीच्याच ‘वैश्विक दोषा’तून निर्माण झालंय.

विश्वनिर्मितीच्या काळात वेगाने निर्माण होणाऱ्या मूलकणांची (पार्टिकल्स) आणि न-मूलकण (अॅन्टीपार्टिकल्स) यांची संख्या समान होती तोपर्यंत त्यांची परस्परांत टक्कर होऊन ते नष्ट होत होते. मात्र त्यातील काही मूलकणांच्या अधिक उत्पत्तीमुळे जे शिल्लक राहिले त्याचंच रूप म्हणजे अब्जावधी दीर्घिका. प्रत्येक दीर्घिकेतले अब्जावधी तारे, त्याभोवतीचे अब्जावधी ग्रह, त्यातला एक आपला सूर्य आणि पृथ्वी.सर्वात शेवटी हे सारं छोटय़ाशा मेंदूद्वारे जाणून घेऊ शकणारे आपण. बरं, इतकी सगळी गोळाबेरीज एकूण विश्वाच्या केवळ 4 टक्के! आपल्या वैश्विक अस्तित्वाची मोजदाद नॅनो-नॅना कणांपेक्षाही नगण्य असेल. थोडक्यात काय तर विश्वारंभीच्या एका शिस्त मोडलेल्या ‘दोषा’चं आपण ‘प्रतीक’ आहोत की काय असं वाटवं!

एरवी मात्र या सगळ्या दीर्घिकांचं परस्परांपासून दूर जाणं, दीर्घिकेच्या केंद्रकाभोवतीच अनेक ‘सूर्यां’चं आणि त्याभोवतीच्या ग्रहमालांचं फिरणं, या सगळ्या अगदी वेळापत्रकी (टाइमबाऊन्ड) गोष्टी आहेत. आता एखाद्या ताऱ्याभोवतीच्या ग्रहमालेचंच उदाहरण पहा. बहुतेक (99 टक्के) ताऱ्यांभोवती असणाऱ्या ग्रहमालांची पद्धत (पॅटर्न) सारखीच असते. म्हणजे ताऱ्याच्या जवळून फिरणारे ग्रह घट्ट कवचाचे असतात, तर दूरचे ग्रह वायुरूप प्रकारचे आणि घट्ट गाभा बाळगून राहतात.

आपल्याच सूर्यमालेचेच उदाहरण घेऊ. सूर्यापासूनचे क्रमाक्रमाने बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे चार ग्रह अगदी घट्ट दगडी पृष्ठभागाचे दिसतात. मंगळापलीकडचे गुरू, शनी, युरेनस, नेपच्युन मात्र वायुरूप (गॅसिअस) मानले जातात. त्यामुळे त्यांच्यावर माणसाला वस्ती करणं शक्य नाही. बुध भयंकर उष्ण, शुक्र सल्फर कार्बनच्या ढगांनी वेढलेला असल्याने वस्तीच्या दृष्टीने तोही निरुपयोगी. राहता राहिला मंगळ. तो मात्र जवळपास आपल्या पृथ्वीच्या आकाराचा कठीण पृष्ठभागाचा वस्ती करण्यासाठी आवाक्यातला असल्याने माणसाची ‘नजर’ त्याकडे वळली आहे. चंद्र-मंगळावर पर्यटक पाठवण्याच्या गप्पा अधून-मधून घडत असतात.

याला अपवाद असणारी एक ग्रहमाला सापडली आहे. खगोल संशोधकांना बुचकळ्यात टाकणारी हीच ती ‘गडबडीची’ किंवा ‘बेशिस्त’ ग्रहमाला! तिचं वैज्ञानिक नाव एलएचएस-1903 पृथ्वीपासून ही ग्रहमाला 116 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. आपल्या ग्रहमालेतला शुक्र किंवा नेपच्युनचा उपग्रह ट्रायटन फक्त स्वतःभोवती उलट गतीने कसे फिरतात त्याविषयी आपण वाचलंय. परंतु ही नव्याने सापडलेली ग्रहमाला विचित्रच वाटावी अशी आहे. काही ग्रहमालांमधील ग्रह त्यांच्या ताऱ्यांच्या सापेक्ष उलट फिरतातही, पण आधी ‘रॉकी’ (दगडी) घट्ट आणि नंतर गॅसिअस (वायुरूप) ग्रह असण्याची ग्रहमालांची शिस्त कोणी मोडली नव्हती. म्हणजे आपल्याला या ‘गडबडीच्या’ ग्रहमालेची माहिती नव्हती.
गुरूसारख्या काही वायुयुक्त ताऱ्यांच्या ग्रहमाला ‘वक्र’ गतीने फिरण्याचं कारण ‘ग्रॅव्हिटेशनल स्पॅटरिंग (किंवा गुरुत्वीय विखुरणे) दुसरं कारण या ग्रहमालांमधल्या परस्पर टकरींमुळे त्यांच्या गतीत उलटफेर आला असावा. ‘डिस्टो’ हा गुरूएवढा, स्वतःभोवती उलटगतीने फिरणारा मोठा ग्रहसुद्धा नोंदला गेलाय. पण साऱ्या ग्रहमालेतच अस्ताव्यस्तपणा म्हणजे अजबच!

एम-ड्वार्फ या लाल-खुज्या (रेड ड्वार्फ) ताऱ्याभोवती ही चमत्कारिक ग्रहमाला असून तिचा शोध युरोपीयन स्पेस एजन्सीच्या चॉप्स उपग्रहावरच्या निरीक्षणातून लागली. या लाल खुज्याभोवतीच्या पाच ग्रहांची ‘इनसाइड आउट’ किंवा उलट-सुलट आहे. त्यांची रचना अशी की, ताऱ्यापासूनचे दोन ग्रह दगडी (घट्ट) नंतरचे दोन वायुरूप इथपर्यंत ठीक. पण नंतर पाचवा ग्रह पुन्हा दगडी हे असं कसं घडलं? अभ्यासकांना वाटतं की, या ताऱ्याला आधी चारच ग्रह असतील, पाचवा ‘दगडी’ ग्रह स्थलांतरित होऊन आला आणि या ‘लाल-खुज्या’च्या गुरुत्वाकर्षणाने पकडून ठेवला. दुसरा तर्क असा की, शेवटच्या दगडी ग्रहाला एखाद्या ग्रहमालाबाह्य वस्तूची जोरदार धडक बसून त्यावरचं वायुरूप वातावरण उधळून लावलं गेलं असावं. म्हणून शेवटचा ग्रह अकल्पितपणे आता घट्ट दिसतो. किऑप्स या दुर्बिणीचं काम आपल्या सूर्यमालेपलीकडच्या ताऱ्यांच्या ग्रहमाला शोधण्याचं आहे आणि त्यात त्यांना ही ‘विचित्र’ ग्रहमाला सापडलीय. विश्वात अशी आणखी किती वैचित्र्यं असतील कोणास ठाऊक! त्यांचा ठाव माणूसच घेणार!